पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील विविध कारणासाठी नेहमीच चर्चेत असलेली पारा ग्रामपंचायत चा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यावेळी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी चक्क सहा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे तक्रार करुन मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारा येथे सन 2021- 22 साठी अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेसाठी पारा गावच्या लोकसंख्येनुसार पंधरा विहिरींसाठी पंचायत समितीकडून मंजुरी देण्यात येते. परंतु पारा येथील सरपंच व ग्राम विकास अधिकारी स्वतःचा मनमानी कारभार करत शासन निर्णयाप्रमाणे ठराव न दिल्यामुळे यावर झालेल्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती वाशी यांनी दिलेल्या चौकशी अहवालामध्ये मासिक सभा दि.5/7/2019सिंचन विहिरी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे बाबत ठरावात 152लाभार्थी निवडीची यादी असून संगणकीकृत यादीत 223सिंचन विहिरीसाठी निवड केलेली लाभधारकांची यादी जोडली आहे. संगणक यादीतील नावे मूळ इति वृत्तातील अनु क्रमांकानुसार लिहिले नाहीत. तसेच नियोजन विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक म. ग्रा. रो.2012/प्र. क्र.30/रोहयो दि.17/12/2012 वैयक्तिक विहिरी संदर्भात सुधारित सूचनांनुसार परिशिष्ट कलम 1(4) मधील तरतुदीनुसार ठराव सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी दिलेला नसल्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशी यांनी सिंचन विहिरीचे सर्व प्रस्ताव रद्द केलेले आहेत. यामुळे पारा येथील पंधरा लाभार्थी शेतकऱ्यांचे फसवणूक करून पंचेचाळीस लाख रुपये एवढ्या शासन अनुदानास नुकसान केलेले आहे. या झालेल्या नुकसानीस सर्वस्वी सरपंच व ग्राम विकास अधिकारी हे जबाबदार असल्यामुळे या दोघांवर कारवाई करून बडतर्फ करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भराटे, महेश खोले, उद्धव शेळके, आशाबाई भराटे, प्रियंका शिनगारे, आशाबाई काळे यांनी केली आहे. याची माहितीस्तव प्रत ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद, गट विकास अधिकारी वाशी यांना देण्यात आली आहे.