कैलास पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर मात्र मुळ प्रश्न कायम
धाराशिव –
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा अजब दावा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्राधान्यक्रम बदलल्याचा दावा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता त्यामुळे नेमकं खरं कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत जिल्ह्यात सध्या पाणीबाणी सुरू असून यंदाची निवडणूक या पाण्याभोवतीच राहिल अशी शक्यता आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात जो गोंधळ घातला तेव्हापासून सुरू झालेले नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत आ. कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिले मुद्दे खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे ते म्हणाले मात्र आ. कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना केवळ राजकीय उत्तरे दिल्याने मुळ प्रश्न कायम आहेत. धाराशिव कळंब मतदारसंघात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी आणण्याबाबत आ. कैलास पाटील यांनी कोणते प्रयत्न केले असा सवाल सूरज साळुंके यांनी केला मात्र धाराशिव कळंब मतदारसंघात येणारे पाणी उपसा सिंचन क्र.१ मधून येणार की क्र. 2 मधून येणार याबाबत प्रश्न विचारला असता त्याबाबत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर त्यांनी दिले.
आ. कैलास पाटील यांनी सरकारने निधी कमी दिला याबाबत पत्रकार परिषदेत आकडेवारी दिली महाविकास आघाडीच्या काळात केलेली तरतूद आणि वितरीत झालेला निधी याबाबत देखील स्पष्टपणे माहिती दिली मात्र सूरज साळुंके यांनी विद्यमान सरकारने केलेली तरतूद आणि वितरीत केलेला निधी याबाबत लेखी माहिती द्यायला तयार असल्याचे म्हटले मात्र आकडेवारी दिली नाही. आमदार आणि खासदार खोटी माहिती देत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था असल्याचे सूरज साळुंके म्हणाले.
सूरज साळुंके एकाकी?
नवं सरकार स्थापन झाल्यापासून आ.कैलास पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पत्रकार परिषदेला सूरज साळुंके एकाकी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये समन्वय समिती स्थापन झाली होती त्या समितीमधील कोणीही त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके एकटे पडले आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.