येरमाळा (ता. कळंब) :
येरमाळा येथील अंगणवाडीची खोली कोणतीही शासकीय परवानगी किंवा निर्लेखन मंजुरी न घेता पाडल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी आणि आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 09 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता येरमाळा गावातील गट क्रमांक 377/254 मधील अंगणवाडीची खोली पाडण्यात आली. सदर अंगणवाडी ही शासनाच्या नावावर चालू असून, कोणतीही प्रक्रिया न राबविता खोली पाडल्यामुळे शासनाचे तब्बल 1,50,000 रुपये इतके नुकसान झाले आहे.
या संदर्भात विस्तार अधिकारी पंचायत समिती कळंब दत्तात्रय त्रंबक साळुंके (वय 55, रा. गौर-वाघोली, ता. कळंब) यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सौ. मंदाकिनी आबासाहेब बारकुल (रा. येरमाळा) आणि राजेंद्र एकनाथ हांडे (ग्रामपंचायत अधिकारी, येरमाळा) यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 324(3), 324(5), भूमी महसूल कायदा कलम 50, 52 तसेच सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.