प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांची घोषणा
पंचवीस वर्षे च्या तरूण आमदाराचा विधिमंडळात घुमणार आवाज
तासगाव ( राहुल कांबळे ) तासगाव - कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही निवड जाहीर केली. या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे. अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे समर्थकांबरोबरच राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातून बाजी मारली. या मतदारसंघात स्व. आर. आर. आबा पाटील कुटुंबीयांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी, माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते. राज्याचे लक्ष लागून लागलेला राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २९००० इतक्या मतांनी पराभव केला. देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला. दरम्यान, तासगाव - कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला असला तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून पन्नास उमेदवारही निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची आज निवड करण्यात आली आहे. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज 'एन्ट्री' केली आहे. स्व आर. आर.आबा पाटील यांचे चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाभोवती 'ग्लॅमर' आहेच. मात्र आता देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांचा देशभर नावलौकिक होत आहे. अत्यंत नम्र, अभ्यासू, कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव, वक्तृत्व कौशल्य, साधी राहणी - उच्च विचारसरणी यामुळे रोहित पाटील यांच्याकडे नेहमीच सर्वांचा 'फोकस' असतो. आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत. वय कमी असले तरी अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी बाकावर बसूनही आपला आवाज घुमवतील, यात शंका नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गटनेते पदी आमदार जितेंद्र आव्हाड तर रोहित पाटील यांची आज पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी ,व प्रतोत पदी माळशिरस चे आमदार उत्तम जानकर यांची निवड केली.आम.रोहित पाटील त्यांच्यावर आता पक्षाने अधिकची जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तरुण आमदारांना पुढे आणून आगामी काळात त्यांना राज्याचे भविष्य बनविले जात असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
आमदार रोहित दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ मुख्य प्रतोत पदी निवड करण्यात आल्याचे समजताच तासगाव शहरांमध्ये व मतदारसंघांमध्ये फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.