उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासीक निर्णय
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न सहकारी साखर कारखान्यांकडील थकीत कर्ज येणेबाकीमुळे मागील २० वर्षांपासून प्रचंड आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. तेरणा, तुळजाभवानी व इतर ३ साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेची साधारण रू.४५०.०० कोटीची थकबाकी येणे असून संपूर्ण कर्जे एन.पी.ए. झालेली आहेत. सदरच्या साखर कारखान्यांकडील थकबाकीमुळे जिल्हा बँकेकडे बँकींग व्यवहार करण्यापुरता देखील निधी उपलब्ध नाही. जिल्ह्यातील ठेवीदार, शेतकरी, शेतमजुर यांचे साधारण रू.४६०.०० कोटीच्या ठेवी जिल्हा बँकेमध्ये जमा आहेत. अशा ठेवीदारांना त्यांना मागताक्षणी त्यांचे गरजेप्रमाणे, मागणीप्रमाणे रक्कम उपलब्ध करून देता येत नाही.
तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना चालू झाल्यास त्यातून जिल्हा बँकेकडे निधीची उपलब्धता होणार आहे. हे दोन्ही कारखाने मागील ८ वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या जप्तीच्या कार्यवाहीमुळे चालू होऊ शकलेले नाहीत. या दोन्ही कारखान्याच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बराचसा वेळ गेलेला आहे. मागील १० वर्षांपासून जिल्हा बँक विविध कोर्टात संघर्ष करीत होती. जिल्हा बँकेने मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, मा.डी.आर.टी., औरंगाबाद, मा.डी.आर.ए.टी. मुंबई येथील प्रलंबीत प्रकरणांमध्ये बँकेच्या बाजुने निकाल प्राप्त करून घेतलेले आहेत. असे असतानाही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडुन सदरील साखर कारखाने भाडेतत्वावर चालविण्यास देण्यासाठी असहकार्याचे धोरण अवलंबिलेले होते. या सर्व परिस्थितीमध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाशी संपर्क करून तडजोडीने दोन्ही कारखाने भाडेतत्वावर देऊन, त्यातुन प्राप्त होणाऱ्या रक्कमेचा प्राधान्याने थकीत भविष्य निर्वाह निधीपोटी भरणा करण्याचे प्रस्ताव सादर करून जिल्हा बँकेने कारखाने भाडेतत्वावर चालवावयास देण्यासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र मिळविले होते. सदरील ना हरकत प्रमाणपत्राची मुदत नोव्हेंबर २०२१ अखेर संपणार आहे. याबाबीचा विचार करून तेरणा व तुळजाभवानी हे दोन्ही साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची कार्यवाही जिल्हा बँकेमार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे.
तुळजाभवानी साखर कारखाना सोलापूर येथील गोकुळ शुगर वर्क्स लि. यांना १५ वर्ष कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्यात आलेला आहे. तसेच तेरणा साखर कारखाना हा भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी, ता. परंडा जि. उस्मानाबाद या कारखान्यास २५ वर्ष कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय आज दि. २५/११/२०२१ रोजी झालेल्या मा. संचालक मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते व सर्व सहमतीने घेण्यात आलेला आहे. आज रोजी तेरणा कारखान्यासंबंधी घेतलेल्या निर्णयामुळे उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील सुमारे ३५००० शेतकरी सभासदांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. तसेच कारखान्याचे कर्मचारी, परिसरातील उद्योजक, छोटे-मोठे व्यवसाईक यांचेसह कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या विविध घटकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
तेरणा व तुळजाभवानी कारखान्याकडून जिल्हा बैंकेस भाडे व इतर मार्गाने वार्षीक साधारण रू.२५ कोटी पर्यंतचे उत्पन्न प्राप्त होणे अपेक्षित आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या विकासास, भरभराटीस चालना मिळेल. आणि बँकचे ठेवीदार, ग्राहक, कर्जदार शेतकरी यांना नजिकच्या कालावधीमध्ये न्याय देण्याचे कार्य जिल्हा बँकेकडून निश्चित होणार आहे. तेरणा व तुळजाभवानी हे दोन्ही कारखाने भाडेतत्वावर चालवावयास दिल्यामुळे जिल्ह्यातील सहकार प्रेमीमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
चांगला निर्णय घेण्यात आला आहे