तुळजापूर विकास आराखडा : प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
धाराशिव – तुळजापूर विकास आराखड्याबाबतची गोंधळलेली स्थिती अजूनही कायम असून यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या आदेशालाच खो दिल्याचे समोर आले आहे.
15 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना स्पष्ट निर्देश दिले होते – “सात दिवसांच्या आत नागरिकांना विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन दाखवा आणि बैठक घ्या.” मात्र 16 सप्टेंबरपर्यंत अशी कोणतीही बैठक घेतली गेली नाही. परिणामी, पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिक धीरज कदम पाटील यांनीही याची पुष्टी करत सांगितले की, “आम्हाला अजूनपर्यंत प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बोलावले गेलेले नाही.”
याआधी नागरिकांनी विकास आराखड्याचे प्रेझेंटेशनच दाखवले गेले नसल्याची तक्रार केली होती. आता उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानंतर पालकमंत्री सरनाईक स्वतः याची चौकशी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी होणारी बैठक तुळजापूर विकास आराखड्याच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
15 ऑगस्ट च्या बैठकीत काय घडलं होतं याबाबत थोडक्यात…
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.
विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.
तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.