परंडा (भजनदास गुडे) : परंडा तालुक्यातील वाळू घाट लिलाव प्रक्रिया सन २०२५-२६ साठी अखेर मार्गी लागली असून एकूण १० वाळू घाटांचा ई-लिलाव यशस्वीरीत्या पार पडला आहे. सीना आणि उल्फा नदीपात्रातील वाळू उपशासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून या लिलावातून तब्बल ३ कोटी ५ लाख ४३ हजार २१२ रुपयांची सर्वोच्च बोली लागली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या या लिलावात पुणे येथील तिरुपती एंटरप्रायजेस यांनी विक्रमी बोली लावत कंत्राट मिळवले. एकूण ३७ हजार ७३० ब्रास वाळू साठ्याचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे. अटी-शर्तींची पूर्तता झाल्यानंतर करंजा-१ व पिठापुरी या दोन घाटांचा पंचनामा करून संबंधित ठेकेदारास ताबा देण्यात आला आहे. उर्वरित आठ घाटांचे सीमांकन व ड्रोन चित्रीकरण सुरू असून लवकरच सर्व घाट कार्यान्वित होणार आहेत.
अधिकृत वाळू घाट सुरू झाल्यामुळे घरकूल लाभधारक व सामान्य नागरिकांना वाजवी दरात वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरणीय नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घाटाचा सविस्तर पंचनामा व नोंदवही तयार केली जात आहे.
▪ परंड्यात सर्वाधिक नैसर्गिक वाळूसाठा
परंडा तालुक्यात नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणावर वाळू साठा उपलब्ध आहे. सीना नदीपात्रातील ९ व उल्फा नदीवरील १ अशा एकूण १० घाटांमधून वाळू उत्खनन होणार आहे. ९ जून २०२६ पर्यंत उत्खननाची, तर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विक्रीची मुदत ठेकेदारास देण्यात आली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
▪ अवैध वाळू उपशावर प्रशासनाचा लगाम
लिलाव प्रक्रियेमुळे शासनाच्या तिजोरीत ३ कोटी ५ लाख ४३ हजार २१२ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यापूर्वी सीना व उल्फा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. महसूल विभागाने आक्रमक कारवाया करत अवैध वाळू चोरांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकृत लिलावामुळे अवैध उपशाला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
▪ करंजा-१ व पिठापुरी घाटांचा ताबा पूर्ण
महसूल प्रशासनाने करंजा-१ व पिठापुरी घाटांचा कायदेशीर पंचनामा करून ठेकेदारास ताबा दिला आहे. उर्वरित घाटांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व घाट कार्यान्वित केले जातील. “अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर प्रशासनाचे काटेकोर लक्ष राहील,” असे प्रभारी तहसीलदार विजयकुमार बाडकर यांनी सांगितले.
▪ परंडा तालुक्यातील १० वाळू घाटांची माहिती (मंजूर ब्रास)
१) करंजा-१ – १९५२
२) करंजा-२ – २५५७
३) वागेगव्हाण-१ – ६३८१
४) वागेगव्हाण-२ – २७२०
५) लोहारा – ४८४८
६) शिराळा – ७९५०
७) पिठापुरी – ३९५७
८) कपिलापुरी-१ – ३०५७
९) कपिलापुरी-२ – २१८७
१०) आवरपिंपरी – २१२१
एकूण मंजूर परिमाण : ३७,७३० ब्रास
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
