Home Blog Page 2

शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार

कामती, दि. २२ : शेतीच्या वादातून कामती खुर्द येथील लमाण तांड्यावर चुलत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पती संजीवकुमार शिंदे यांच्या नावे असलेल्या १२ एकर जमिनीपैकी सहा एकर जमीन परस्पर विकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून सुरेखा सतीश शिंदे, रणजीत सतीश शिंदे आणि रितेश सतीश शिंदे यांनी संगनमत करून संजीवकुमार शिंदे यांची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, सुरेखा शिंदे हिने प्रथम मयताच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर रणजीत शिंदे व रितेश शिंदे यांनी त्यांच्या ताब्यातील तलवारीने हात, गळा आणि डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात संजीवकुमार शिंदे यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीने आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे करीत असून आरोपींच्या शोधासाठी कामती पोलीस ठाण्याची चार तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित

८ कोटींचा निधी मंजूर; नुकसानभरपाई वाटपाचा मार्ग मोकळा

तासगाव प्रतिनिधी

गेल्या १८-१९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिजामाता चौक (भिलवडी नाका) ते विटा रोड बायपास रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींची नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाची मंगळवारी आमदार रोहित पाटील यांच्या ठोस आश्वासनानंतर सांगता झाली.

सन २०२३ च्या अर्थसंकल्पात या बायपास रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रस्त्यासाठी ४५ गटांचा सर्व्हे पूर्ण झाला असून सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे बाकी आहे. त्यापैकी १७ गटांतील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नोव्हेंबर २०२५ मध्येच केली होती. मात्र निधीअभावी नुकसानभरपाईचे वितरण रखडले होते.

शेतकऱ्यांच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही निधी उपलब्ध होत नसल्याने ८ जूनपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनस्थळी माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित कागदपत्रांसह संपूर्ण माहिती आमदार रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

यानंतर आमदार रोहित पाटील यांनी मंत्रालयात तातडीने पाठपुरावा करत ०३/०४ हेडअंतर्गत सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याबाबतची माहिती त्यांनी प्रशासनाला दूरध्वनीवरून दिली. तसेच निधी वर्ग झाल्यानंतर त्यावरील बीडीएस लॉक हटविण्यासाठीही त्यांनी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला. त्यामुळे निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

अधीक्षक अभियंता बुरूड आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या गुरुवारपर्यंत काही शेतकऱ्यांच्या डीडी तयार करण्याचे, तसेच पुढील आठवड्यात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

दरम्यान, आमदार रोहित पाटील व प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी सध्या धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष नुकसानभरपाई वाटपावर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन


धाराशिव, प्रतिनिधी : शिधापत्रिका तसेच पुरवठा विभागाशी संबंधित सर्व सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही एजंट, दलाल किंवा मध्यस्थांकडे कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाने १६ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार केशरी, पिवळी व शुभ्र रंगाच्या पुस्तकी शिधापत्रिका बंद करून त्याऐवजी डिजिटल ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली लागू केली आहे. यानुसार AAY, PHH, APL Farmer, NPH आणि APL White या प्रकारच्या शिधापत्रिका नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पुरवठा विभागातील सर्व कामकाज महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात असून शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नवीन नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका मिळविणे, शिधापत्रिकेची दुय्यम प्रत काढणे तसेच इतर विविध सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध आहेत.
यासाठी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतः अर्ज सादर करावा. आवश्यक शुल्कही शासनाच्या GRAS प्रणालीद्वारे थेट भरता येते. NPH शिधापत्रिकेसाठी ५० रुपये तर APL White शिधापत्रिकेसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच विविध शासकीय प्रमाणपत्रे व योजनांसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्कच भरावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण असल्यास शासनमान्य सुविधा केंद्रांची मदत घेता येईल. मात्र कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा दलालांकडे कागदपत्रे देऊन आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.
नायब तहसीलदार सामाजिक सहाय्य योजना श्री. एम. जी. शिंदे, नायब तहसीलदार महसूल-२ तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती विशाखा बलकवडे आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहून सर्व सेवा अधिकृत माध्यमातूनच घेण्याचे आवाहन केले आहे.

आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान

धाराशिव ( नरोटे आकाश – 9545591355): “आमची लढाई आरएसएससोबत नाही,” असे विधान काँग्रेसचे उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेचे उमेदवार महेश देशमुख यांनी केले असून, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची उमेदवारी महेश देशमुख यांना मिळाली आहे. त्यांनी आज (दि. १ जून) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“भाजपमधील गुंडांच्या टोळीविरोधात आमची लढाई असून, नीट पेपरफुटी आणि महागाईविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत,” असेही ते यावेळी म्हणाले.

धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीचे पुरेसे संख्याबळ नसल्याबाबत प्रश्न विचारला असता, “संख्याबळ येत्या अकरा दिवसांत दिसून येईल. तसेच नाराज गटाशी संपर्क सुरू आहे,” असे महेश देशमुख यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला आ. प्रवीण स्वामी, विश्वास आप्पा शिंदे, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, राष्ट्रवादीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आरएसएसला विरोध नाही, भाजपमधील गुंडांच्या टोळीला विरोध; याचा अर्थ काय?

महेश देशमुख यांनी “आरएसएसला विरोध नाही” हे केलेले वक्तव्य अनेक अन्वयार्थांना वाव देणारे ठरत आहे. निवडणुकीत संघाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. विशेषतः काँग्रेसच्या उमेदवाराने असे वक्तव्य केल्याने भाजपच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मात्र, या विधानाचा सर्वाधिक परिणाम भाजपमधील गटबाजीवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या वक्तव्याचा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तीनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल 252 सदस्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या सदस्यांनी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उमेदवारीसाठी समर्थन दर्शवत सह्याही केल्याचे बोलले जात आहे. यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. दरम्यान, दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा फॉर्म घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी, स्थानिक पातळीवरील हालचालींमुळे त्यांच्या नावाची चर्चा जोर धरताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष आणि इतर स्थानिक प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे कोणत्या नेत्यामागे किती संख्याबळ उभे आहे, यालाच या निवडणुकीत विशेष महत्त्व दिले जाते. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे. त्यासोबतच महायुतीतील विविध गटांमध्ये समन्वय राखण्यात आलेल्या भूमिकेमुळे दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रतिमा संघटनात्मक नेता म्हणून तयार झाल्याचे मानले जाते. दुसरीकडे, बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या नावाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. विशेष म्हणजे, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाला भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील नेते माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडूनही अनुकूलता मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील विविध गटांमध्ये स्वीकारार्ह चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विधान परिषदेसाठी उमेदवारीबाबत अंतिम निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असला तरी, सध्या सुरू असलेल्या हालचालींमुळे दत्ताभाऊ कुलकर्णी हे या मतदारसंघातील प्रमुख चर्चेचे केंद्र ठरत आहेत.

रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!

प्रभारी प्राचार्य म्हणतात, ‘मीच विशाखा समितीचा अध्यक्ष’; ही मग्रुरी नव्हे काय?

भाग 2

धाराशिव – नामांकित महाविद्यालयाने महिला छेडछाडीची घटना दाबल्याची पहिली बातमी दैनिक जनमतने समोर आणली. मात्र, या घटनेमध्ये महिलेची, पीडितेची तक्रार नसल्याने ही घटना खरी आहे की खोटी याबाबत शंका वर्तवण्यात येत आहेत. मात्र, शहरातील या नामांकित महाविद्यालयात घडलेली ही घटना दडपशाहीची असून पीडितेवर अन्याय करणारी आहे. रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादावर चालणाऱ्या या महाविद्यालयात पुतण्या प्रभारी प्राचार्य असताना त्याच्या काकाकडून हे कृष्णकृत्य घडलेले असतानाही त्या घटनेला दाबण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ते काका पूर्वी त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि घटना घडली त्या काळात त्यांचे वास्तव्य महाविद्यालयाच्या आवारातच होते. निवृत्त असतानाही त्यांना ते निवासस्थान कसे मिळाले? निवृत्त झाल्यानंतरही त्यांना प्रचंड अधिकार कोणी दिले? त्यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे? हा संशोधनाचा विषय आहे. छेडछाडीच्या घटनेमुळे या काकांना शहरातील बार्शी नाका आणि हातलाई परिसरात चोपदेखील दिला असल्याची चर्चा आहे.

महाविद्यालयाचा परिसर आणि संस्था आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात असलेल्या या मंडळींनी पीडितेवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. मात्र, पीडितेला योग्य न्याय मिळावा आणि अशा घटनांना चाप बसावा, तसेच शहरातील शैक्षणिक वातावरण चांगले राहावे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाविद्यालयात प्राचार्यपदासाठी अनेकांचे ज्येष्ठत्व असताना कमी अनुभव असणाऱ्याला प्राचार्यपद कसे मिळाले, याचा शोध सामाजिक, राजकीय संघटना आणि पालकांनी घेतल्यास उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उकल होणार असून संबंधित संस्थेने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

विशाखा समितीचा मीच अध्यक्ष


ही घटना घडली आहे की नाही याबाबत विचारण्यासाठी प्रभारी प्राचार्यांना संपर्क केला असता त्यांनी ही घटना घडली नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या महाविद्यालयात विशाखा समिती आहे का, असा प्रश्न केल्यानंतर “हो आहे,” असे उत्तर दिले. त्याचे अध्यक्ष कोण आहेत, असे विचारल्यानंतर “मीच या विशाखा समितीचा अध्यक्ष आहे,” असे त्यांनी सांगितले.

विशाखा समिती ही कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याचे तक्रार निवारण करणारी समिती आहे. तिचे अध्यक्षपद हे संस्थेतील महिलेकडेच असणे क्रमप्राप्त असताना प्रभारी प्राचार्यांनी दिलेले उत्तर अजब तर आहेच, पण त्यातून एक वेगळ्याच प्रकारची मग्रुरी दिसून येते.

प्रशासन आता काय कारवाई करणार?


एखाद्या संस्थेत विशाखा समिती अस्तित्वात नसेल तर त्याच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या संस्थेत विशाखा समिती आहे की नाही, हाच संशोधनाचा विषय आहे. जर पुरुष या समितीचे अध्यक्ष असतील तर प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे गरजेचे आहे.

महिलांचे मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह ८.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर परिसरासह येरमाळा भागात भाविक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडून ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७ ग्रॅम सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाचा समावेश आहे.

तुळजापूर पोलीस ठाण्यात दि. १ मे २०२६ रोजी तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारचे काही गुन्हे जिल्ह्यात नोंद असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

त्यानुसार दि. १५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी येथील पारगाव टोलनाक्यावर कारवाई केली. यावेळी दोन महिला व दोन पुरुषांना स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी तुळजापूर व येरमाळा परिसरात साथीदारांच्या मदतीने महिलांचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत तुळजापूर येथील १ आणि येरमाळा पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनिल शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिरंजीव रमेश शिंदे आणि किरण शेषेराव शिंदे (सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने केली.

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!

तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण व बालाजी आण्णा घोलप यांच्या पुढाकारातून विविध रस्त्यांची पाहणी


वाशी ( प्रतिनिधी)
“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आजही विकासकामांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे काम माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून तेरखेडा जिल्हा परिषद गटातही विकासाची गंगा पोहोचत आहे. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचे शेतरस्ते मोठ्या प्रमाणात करण्यात येतील, असा शब्द आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला होता. तो शब्द आता प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे.
मतांसाठी नव्हे तर समाजकारणाच्या भूमिकेतून निवडणुकीपूर्वीही अनेक शेतरस्त्यांची कामे करण्यात आली होती. आता शासनाच्या माध्यमातून विविध रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येत आहे. दिनांक १५ मे रोजी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण व बालाजी घोलप यांनी पुढाकार घेत तेरखेडा, खामकरवाडी, सटवाईवाडी, कडकनाथवाडी परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी केली.
यामध्ये नॅशनल हायवे ५२ तेरखेडा ते वडजी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते हेडसरी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते बसवेश्वर मंदिर शिवार रस्ता, माणिकदंड रस्ता ते सटवाईवाडी रस्ता तसेच खामकरवाडी ते उंबरगा रस्त्याची पाहणी करण्यात आली. तसेच गोळे शिवार, उकरंडे शिवार, घोलप शिवार, हलकरे शिवारातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करून संबंधित कामांना लवकर गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुक्याचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे, बालाजी हलकरे, कृष्णा माळी, रामलिंग शिंदे, स्वप्निल पोळ, समाधान घोलप, रोहित घोलप यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात

तुळजापूर (प्रतिनिधी):
शिक्षणासाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, तिला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी २० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर ‘पोक्सो’सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीकडे आणखी काही व्हिडिओ असून अनेक प्रतिष्ठित महिलांचे संपर्क क्रमांक त्यात असल्याची माहिती आहे मात्र पोलिस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसून आरोपीला न्यायालयासमोर हजार केल्यानंतर ही माहिती समोर येणार आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तुळजापूर शहरातील एका सायन्स अकॅडमीमध्ये शिकवणीसाठी (क्लासेस) जात होती. याच काळात आरोपी साहिल सलीम शेख (वय २० वर्षे) हा तिचा सतत पाठलाग करत असे. त्याने पीडितेकडे अनेकदा मोबाईल नंबरची मागणी केली, मात्र मुलीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर आरोपीने सोशल मीडियाचा वापर करत ‘स्नॅपचॅट’वर (Snapchat) तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मेसेज करून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

गुंगीचे औषध देऊन अत्याचार


काही काळानंतर, जुने प्रकरण मिटवून घेण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेशी संवाद साधला. तिला विश्वासात घेऊन तो लातूर येथील बसस्थानक परिसरातील एका कॅफेमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेच्या मँगो ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो काढले.

फोटोच्या जोरावर ब्लॅकमेलिंग


अत्याचार केल्यानंतर आरोपी साहिल शेख याने पीडितेच्या फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने त्रास दिला जात होता. अखेर या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस करून कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.

धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!


धाराशिव – तुतारी और कमल एकीच है हे प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आज धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ पहायला मिळाला. जो विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नव्हता, जो विषय आयत्या वेळी मांडला गेला ज्याला सूचक आणि अनुमोदक नसताना गोंधळ झाल्याने हे सत्ताधारी गटाचे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभांमध्ये राष्ट्रवादी शप कडून भाजपला जोरदार विरोध पाहायला मिळाला नव्हता मात्र आजच्या सर्वसाधारण सभेत झालेला विरोध आणि गोंधळ नेमका कोण घडवून आणला याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कागदावर नसलेली कमल आणि तुतारीची युती जास्त काळ टिकणार नसल्याचे यावरून बोलले जात आहे. गणेश नगर येथील पाइपलाइनच्या कामावरून हा गोंधळ झाला असून या गोंधळात अध्यक्ष आणि सचिवांना देखील अर्वाच्य भाषेत बोलले गेल्याने अध्यक्षांनी यावेळेस समज दिली असून पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले. मात्र घडल्या प्रकाराबद्दल अध्यक्षाच्या दालनातील फुटेज आणि दोन्ही बाजूकडून भूमिका स्पष्ट होणार नाही तोपर्यंत गोंधळाचे कारण गुलदस्त्यात राहणार आहे.

शिवसेनेचा सभात्याग
सर्वसाधारण सभेचे इतिवृत लोकांसाठी खुले केले नसल्याने कालच शिवसेनेने तक्रार दिली होती त्यावरून नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी सभात्याग केल्याने सभागृहात फक्त भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमचे एक नगरसेवक यांचीच उपस्थिती होती.