धाराशिव : तुळजाभवानी मंदिर परिसरासह येरमाळा भागात भाविक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडून ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७ ग्रॅम सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाचा समावेश आहे.
तुळजापूर पोलीस ठाण्यात दि. १ मे २०२६ रोजी तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारचे काही गुन्हे जिल्ह्यात नोंद असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार दि. १५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी येथील पारगाव टोलनाक्यावर कारवाई केली. यावेळी दोन महिला व दोन पुरुषांना स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी तुळजापूर व येरमाळा परिसरात साथीदारांच्या मदतीने महिलांचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत तुळजापूर येथील १ आणि येरमाळा पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनिल शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिरंजीव रमेश शिंदे आणि किरण शेषेराव शिंदे (सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने केली.
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त
- परंड्यात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी केला लक्ष्य; ६० किलो कॉपर तार आणि ऑईल चोरीला
