Home ताज्या बातम्या एमपीएससी विद्यार्थी स्व. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आ. रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट

एमपीएससी विद्यार्थी स्व. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आ. रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट

0
एमपीएससी विद्यार्थी स्व. प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आ. रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट

प्रथमेशच्या मातोश्रींना आर्थिक मदत; घरकुल व निराधार योजनेची कार्यवाही तातडीने करण्याच्या आ. रोहित पवार यांनी दिल्या तहसीलदारांना सूचना

परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता, पेपरफुटी आणि दुष्काळी परिस्थितीवर आ. रोहित पवार यांनी व्यक्त केली चिंता

परंडा (दि. १२ सप्टेंबर) : पुणे येथे दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील त्यांच्यासोबत होते.

आमदार रोहित पवार यांनी प्रथमेशच्या मातोश्री व कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले आणि या कठीण प्रसंगी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी प्रथमेशच्या मातोश्रींच्या हाती आर्थिक मदतही सुपूर्द केली.

कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आ. पवार यांनी परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रथमेशच्या मातोश्रींना घरकुल योजना तसेच निराधार योजनेचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

प्रथमेश अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससीसह स्पर्धा परीक्षांची पुणे येथे तयारी करत होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला मानसिक, शैक्षणिक व आर्थिक ताण गंभीरपणे विचारात घेण्याची आवश्यकता असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले.

“प्रथमेशच्या मृत्यूकडे केवळ आर्थिक तणावाच्या चौकटीत पाहता येणार नाही. स्पर्धा परीक्षा वेळेत न होणे, पेपरफुटीच्या घटना, निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब आणि सातत्याने निर्माण होणारी अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यातच सध्या ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांना घरून आर्थिक आधार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि कालबद्ध परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही आ. पवार यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहोत आणि हा संघर्ष पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

“कितीही कठीण परिस्थिती आली तरी कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. अडचणी एकट्याने सहन न करता कुटुंबीय, मित्र, शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा,” असे आवाहनही आ. रोहित पवार यांनी यावेळी केले.

या सांत्वनपर भेटीवेळी माजी आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद, पंकजनाना बोराडे, रविकांत वरपे, जिल्हा सचिव सुहास ठोंगे, जिल्हा उपाध्यक्ष जोतीराम मिस्किन, तालुकाध्यक्ष किरण करळे, माजी सैनिक विभागाचे तालुकाध्यक्ष सुरेश कुंभार, युवक तालुकाध्यक्ष प्रवीण गरड, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, युवक कार्याध्यक्ष सज्जन गाडगे, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चाबुकस्वार, तालुकाध्यक्ष ऋषिकेश पाटील, ठवरे मेजर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here