
धाराशिव : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत मात्र आ. कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे केलेले चोख नियोजन आणि कार्यकर्त्यांशी संपर्काच्या जोरावर जिल्ह्यातील पक्ष मजबूत ठेवला आता त्यात भर पडणार असून ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रामेश्वर शेटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश होणार आहे. हा प्रवेश मुंबई येथे होणार असून दोन्ही नेत्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले असून शिवसेनेला या प्रवेशामुळे मोठे बळ मिळणार आहे.
संजय निंबाळकर तसेच भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांच्या पक्षप्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. या प्रवेशाची माहिती तानाजी जाधवर यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रामेश्वर शेटे हे भाजपमधील सक्रिय आणि दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि राजकीय प्रभाव आहे. ते वकील आघाडीचे जिल्हा संयोजक, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तसेच विधी विभाग, धाराशिव जिल्हा या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे.
संजय निंबाळकर हे देखील सक्रिय राजकारणात असून, जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत आणखी भर पडणार आहे. दोन्ही नेत्यांसोबत त्यांच्या समर्थकांची मोठी संख्या उबाठामध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याने या प्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उबाठाची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात उबाठा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षफूट झाली आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने संघटनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मात्र, या कठीण काळात आमदार कैलास पाटील यांनी पक्षाची ताकद टिकवून ठेवण्याची आणि संघटना पुन्हा उभी करण्याची जबाबदारी प्रभावीपणे स्वीकारली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत, नव्या नेतृत्वाला पक्षाशी जोडत आणि जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करत कैलास पाटील यांनी उबाठाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे.
विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याचे नियोजन करताना कैलास पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन घडवून आणले होते. या दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधलेला संपर्क तसेच जिल्ह्यातील पक्षाची उरलेली संघटना सक्रिय ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे उबाठाच्या गोटात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे पक्षाला मोठ्या राजकीय धक्क्यांचा सामना करावा लागला असताना कैलास पाटील यांनी पक्षाची उरलेली ताकद वाचवण्यासोबतच ती वाढवण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता जिल्ह्यातील प्रभावशाली आणि सक्रिय नेते पुन्हा शिवसेनेच्या गोटात येताना दिसत आहेत.
संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांचा आजचा प्रवेश हा कैलास पाटील यांच्या संघटनात्मक प्रयत्नांना मिळालेला महत्त्वाचा राजकीय प्रतिसाद मानला जात आहे. आगामी काळात आणखी काही दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उबाठामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असल्याने धाराशिवच्या राजकारणात कैलास पाटील यांच्या नेतृत्वाची आणि पक्षबांधणीच्या प्रयत्नांची चर्चा रंगली आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर उबाठासमोर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचे आव्हान कैलास पाटील यांच्यासमोर आहे. त्यातच जिल्ह्यातील अनुभवी आणि प्रभावशाली नेत्यांना पक्षाशी जोडण्यात यश आल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात उबाठाची स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे आजचा पक्षप्रवेश केवळ दोन नेत्यांचा प्रवेश न राहता धाराशिव जिल्ह्यात उबाठाच्या नव्या राजकीय बांधणीची सुरुवात म्हणून पाहिला जात आहे.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त