रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!

0
8

प्रभारी प्राचार्य म्हणतात, ‘मीच विशाखा समितीचा अध्यक्ष’; ही मग्रुरी नव्हे काय?

भाग 2

धाराशिव – नामांकित महाविद्यालयाने महिला छेडछाडीची घटना दाबल्याची पहिली बातमी दैनिक जनमतने समोर आणली. मात्र, या घटनेमध्ये महिलेची, पीडितेची तक्रार नसल्याने ही घटना खरी आहे की खोटी याबाबत शंका वर्तवण्यात येत आहेत. मात्र, शहरातील या नामांकित महाविद्यालयात घडलेली ही घटना दडपशाहीची असून पीडितेवर अन्याय करणारी आहे. रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादावर चालणाऱ्या या महाविद्यालयात पुतण्या प्रभारी प्राचार्य असताना त्याच्या काकाकडून हे कृष्णकृत्य घडलेले असतानाही त्या घटनेला दाबण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ते काका पूर्वी त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि घटना घडली त्या काळात त्यांचे वास्तव्य महाविद्यालयाच्या आवारातच होते. निवृत्त असतानाही त्यांना ते निवासस्थान कसे मिळाले? निवृत्त झाल्यानंतरही त्यांना प्रचंड अधिकार कोणी दिले? त्यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे? हा संशोधनाचा विषय आहे. छेडछाडीच्या घटनेमुळे या काकांना शहरातील बार्शी नाका आणि हातलाई परिसरात चोपदेखील दिला असल्याची चर्चा आहे.

महाविद्यालयाचा परिसर आणि संस्था आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात असलेल्या या मंडळींनी पीडितेवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. मात्र, पीडितेला योग्य न्याय मिळावा आणि अशा घटनांना चाप बसावा, तसेच शहरातील शैक्षणिक वातावरण चांगले राहावे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाविद्यालयात प्राचार्यपदासाठी अनेकांचे ज्येष्ठत्व असताना कमी अनुभव असणाऱ्याला प्राचार्यपद कसे मिळाले, याचा शोध सामाजिक, राजकीय संघटना आणि पालकांनी घेतल्यास उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उकल होणार असून संबंधित संस्थेने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

विशाखा समितीचा मीच अध्यक्ष


ही घटना घडली आहे की नाही याबाबत विचारण्यासाठी प्रभारी प्राचार्यांना संपर्क केला असता त्यांनी ही घटना घडली नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या महाविद्यालयात विशाखा समिती आहे का, असा प्रश्न केल्यानंतर “हो आहे,” असे उत्तर दिले. त्याचे अध्यक्ष कोण आहेत, असे विचारल्यानंतर “मीच या विशाखा समितीचा अध्यक्ष आहे,” असे त्यांनी सांगितले.

विशाखा समिती ही कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याचे तक्रार निवारण करणारी समिती आहे. तिचे अध्यक्षपद हे संस्थेतील महिलेकडेच असणे क्रमप्राप्त असताना प्रभारी प्राचार्यांनी दिलेले उत्तर अजब तर आहेच, पण त्यातून एक वेगळ्याच प्रकारची मग्रुरी दिसून येते.

प्रशासन आता काय कारवाई करणार?


एखाद्या संस्थेत विशाखा समिती अस्तित्वात नसेल तर त्याच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या संस्थेत विशाखा समिती आहे की नाही, हाच संशोधनाचा विषय आहे. जर पुरुष या समितीचे अध्यक्ष असतील तर प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here