कामती, दि. २२ : शेतीच्या वादातून कामती खुर्द येथील लमाण तांड्यावर चुलत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पती संजीवकुमार शिंदे यांच्या नावे असलेल्या १२ एकर जमिनीपैकी सहा एकर जमीन परस्पर विकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून सुरेखा सतीश शिंदे, रणजीत सतीश शिंदे आणि रितेश सतीश शिंदे यांनी संगनमत करून संजीवकुमार शिंदे यांची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, सुरेखा शिंदे हिने प्रथम मयताच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर रणजीत शिंदे व रितेश शिंदे यांनी त्यांच्या ताब्यातील तलवारीने हात, गळा आणि डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात संजीवकुमार शिंदे यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीने आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे करीत असून आरोपींच्या शोधासाठी कामती पोलीस ठाण्याची चार तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.
- पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी
- १३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
