उमरगा : (युसुफ मुल्ला)
तालुक्यातील कुन्हाळी येथील एका शिक्षित शेतकरी महिलेने विविध शेती तंत्राचा अवलंब करून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला होता मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन झाल्याने वहातूक व्यवस्था आणि बाजारपेठही बंद झाली, परिणामी गेल्या दहा दिवसापासूनची तोड वाया गेली. मजूरीचा आर्थिक भूर्दंड आणि मेहनतीवरही पाणी पडले. शिवाय पन्नास हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले आहे.
कृषी विभागाच्या अनुदान तत्वावरील पॉलीहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षापासुन वैशाली कैलास आष्टे यांनी जरबेरा फुलाचे उपन्न सुरु केले आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून दहा गुंठे क्षेत्रात जरबेरा फुलाचे उपन्न सुरू झाले होते त्यातून जवळपास तीन लाख रुपये उत्पन्नातुन मिळाले होते.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असताना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करून कमी पाण्यावर अधिक उत्पन्न देणारे पीक घेण्यासाठी कुन्हाळीच्या शेतकरी वैशाली आष्टे यांनी प्रयत्न केला. २०१४ मध्ये साडेबारा लाख रुपये खर्चाचे पॉलीहाऊसची उभारणी करण्यात आली. त्यात कृषि विभागाने सव्वा चार लाखे लाखाचे अनुदान दिले होते. पॉलीहॉऊसमध्ये पहिले उपन्न जेरबेरा फुलाचा निर्णय घेण्यात आला. जेरबेरा फुलाचे रोपाची एकदा लागवड केल्यानंतर त्यातुन तीन वर्ष फुले मिळतात, एका रोपाला वर्षभरात ६५ ते ८० फुले मिळतात. पॉलीहाऊसच्या १० गुंठे क्षेत्रात साधारणतः तीन वर्ष उत्पन्न घेतल्यानंतर सौ. आष्टे यांनी पून्हा एक ऑक्टोबर १०१८ मध्ये पूणे येथून दोन लाख २८ हजार किंमतीची सहा हजार २५० जरबेरा फुलांच्या रोपाची लागवड करण्यात आली. २५ डिसेंबर २०१९ पासून प्रत्यक्ष फुले विक्रीसाठी सुरू झाली. आणि दररोज आठशे ते नऊशे फुलांचे उत्पन्न सुरू झाले. प्रति फुलास दोन ते आठ रुपयापर्यंत दर मिळतो. या फुलांसाठी हैद्राबादची बाजारपेठ आहे. परंतू लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ बंद आहे शिवाय लग्नसराईतच लॉकडाऊन झाल्याने मंगल कार्यालयासह घरासमोरील मोठ्या शामियांत होणारी लग्न थांबल्याने स्टेज सजावटीसाठी लागणारे फुलांची मागणीही थांबली. २० मार्चपासून सर्वत्र बंद असल्याने फुलाची मागणी चक्क घटली, परंतू आलेली तोड तरी थांबवता येत नाही, मजूर फुलाची तोडणी केली. आणि जागेवरच त्या फुलाची नासाडी सुरू झाली आहे. दहा ते बारा दिवसात जवळपास बारा ते चौदा हजार फुले जागेवरच पडून आहेत, साधारणतः तीन रुपये दराने एका फुलाला दर मिळाला असता तरी जवळपास चाळीस ते पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.
—–
” लॉकडाऊनमुळे जेरबेरा फुलाच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. दररोज दोन ते तीन हजार रुपये फुल विक्रीतुन मिळत होते. आता गेल्या बारा दिवसापासुन उठावच बंद झाला आहे. परिपक्व झालेल्या फुलाची तोड तर करावी लागते, दररोज पाचशे रूपये मजूराचा खर्च आहे तो निकामी ठरतो आहे. शिवाय खत, पाण्याची सोय तर नियमित करावी लागते. आता आणखी तीन दिवसाने फुलाची तोड करावी लागते, तीही लॉकडाऊनमुळे वायाच जाणार आहे. – वैशाली आष्टे
—–