कुस्तीच्या मैदानात हनुमंत पुरी हे नाव जरी ऐकलं,तरी अनेक पैलवानांना थरकाप आणि घाम सुटतो अशा या महान पैलवानाची जीवनसंघर्ष व यशोगाथा
……उस्मानाबाद सारख्या कमी पावसाच्या आणि शेतीप्रधान जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यात कंडारी या गावात एक जाणकार व एकेकाळचे पैलवान श्री .नानासाहेब पुरी .यांच्या कुटुंबामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी एक बाळ जन्माला आलं .पुढे त्या बाळाचे नामकरण शक्ती भक्ती आणि युक्ती चे प्रतीक असणारे हनुमान बजरंग बली म्हणजेच हनुमंत पुरी असे ठेवण्यात आले . गोंडस आणि बाळसअसणारा हनुमंत आपल्या गावामध्ये घरामध्ये इकडे -तिकडे फिरू लागला . बागडू लागला .बालपणीच वडिलांनी त्याला कुस्तीचे बाळकडू कंडारीचा तालमीत दिले .शेतीप्रधान कुटुंबात उदारनिर्वाह करून नानासाहेबांनी आपल्या मुलाला पहिलवान बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते .केवळ 5 ते 7 एकर जिरायती जमीन नानासाहेबांचा संसाररूपी गाडा चालवत असे . संसार चालवत असताना त्यांनी हनुमंताला गावातील तालमीत आपल्याबरोबर दररोज नियमितपणे व्यायाम व कुस्तीचे धडे देऊ लागले .आपल्या वडिलांच्या पितृभक्तीवर हनुमंत भाऊ तालमीत सवंगड्यांसोबत कुस्ती सराव करू लागला .शालेय जीवन व कुस्ती यांचा ताळमेळ करून शिक्षण व खेळ यांची सांगड तो प्रभावीपणे घालू लागला .अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीची परिस्थिती असताना नानासाहेबांनी केलेलं हे दांडगे धाडस लोकांना पटत नसे .पण उदंड स्वप्न पाहणारा तपस्वी …. यशस्वी होऊ शकतो या उक्तीचा अनुभव काही काळातच सर्वांना येऊ लागला .हनुमंत पुरी पंचक्रोशीतील गावोगावी यात्रेच्या मैदानात चांगल्या कुस्त्या करू लागला .याचा आनंद नानासाहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागला याचे समाधान हनुमंत पुरी यांना वाटत होते .मैदानामध्ये हे कुस्ती करताना कुस्तीतील काही तंत्र व कौशल्य यावर हनुमंताची चांगली पक्कड होती . हनुमंतला आता गावात कोणी मोठा जोडीदार उरला नव्हता ,तेव्हा नानासाहेब स्वतः लंगोट लावून आपल्या पोरास कुस्ती सराव देऊ लागले . त्याच वेळेस गावातील काही नामवंत व माजी पैलवान मंडळीनी हनुमंताला कोल्हापूर या ठिकाणी पाठवण्याचा सल्ला दिला .मुलाला पैलवान करायचे तर आहेच पण आर्थिक अडचण खूप मोठी होती . नानासाहेबांच्या हातावर पैसा नसायचा आणि सतत आर्थिक चणचण असायची . ठामनिर्णय आणि आणि जिद्द यामुळे माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो ! याची प्रचिती नानासाहेबांना आली .हनुमंतला कोल्हापुरास पाठविण्याचे ठरले . त्यारात्री नानासाहेबांना रात्रभर झोप नव्हती . हनुमंत पैलवान होईल का ?पैसे पुरतील का ? आपला निर्णय योग्य आहे का ? यामुळे त्यांचा जीव कासावीस होत होता . बेचैन वाटत होते . पण मनाचा हिय्या करून त्यांनी दुसऱ्या दिवशी खाजगी सावकाराकडून पैसे घेवून हनुमंताला कुस्तीची पंढरी म्हणजेच कोल्हापुरमधील शाहुपुरी तालमीत मोठ्या मनाने आणि जड अंतकरणाने सोडले .
हनुमंत आता कोल्हापुरात खूप जिद्दीने आणि कष्टाने कुस्ती मेहनत करू लागला .भरपूर व्यायाम करू लागला . वडलांनी छातीचा कोट करुन पाहिलेले स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी आणि आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तो अतोनात खडतर कष्ट करत होता .कुस्तीतील विविध कौशल्य डावपेच तंत्र यासह आपली शक्ती युक्ती व दम वाढवण्यासाठी तो सतत कुस्ती या विषयी विचार करत होता .खरोखरच कुस्तीसाठी आपलं जीवन अर्पण करण्यासाठी आणि आपल्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हनुमंताने अतिशय हलाखीचे आणि कष्टाचे जीवन कोल्हापूरमध्ये हे निश्चित केले .कुस्ती म्हणजेच कुस्ती एवढच हनुमंताला आपल्या वडिलांनी दिलेला वसा आणि वारसा जपण्यासाठी तो प्राण कंठात पर्यंत येईल एवढी मेहनत तो करत होता .खरंतर हनुमंताला आपल्या घरची परिस्थिती आणि वास्तविकता माहित होती . वडिलांनी दिलेले पैसे काहीच महिने पुरले . पुढची कुस्ती मेहनत कशी करायची आता ? आर्थिक कुमक ही संपली होती .तेव्हा हनुमंताला घरचा रस्ता पकडावा लागणार होता . आपली कुस्ती संपणार का ?याचं दुःख हनुमंतला होत होतं यातूनच तो उदास आणि निराश झाला होता . कुस्तीवेड त्याला गप्प बसू देत नव्हते . पण फाटलेला खिसा हे ही जगाची रीत दाखवत होती प्रत्यक्ष जीवन वेगळे होते .ज्या बालवयात मुलाने बागडायचं खेळायचं !
स्वप्नाच्या दुनियेत रमायचं !
गावामध्ये फिरायचं !
मुक्तपणे जगायचं !
आईच्या कुशीत झोपायचं ! बापासोबत फिरायचं !
आजोबा सोबत गप्पा करायच्या !
त्याच वयामध्ये हनुमंतला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला या कुस्तीने शिकवली . कोवळया मनाचं पोर फक्त कुस्ती हीच संकल्पना घेऊन आपलं संपूर्ण जीवन त्याला अर्पण करण्यास तयार होतं त्यावेळेस त्याच्या हातातून काही तरी ऐतिहासिक गोष्ट झाल्याशिवाय रहात नाही हा कुस्तीचा इतिहास आहे . ज्याला आपली परिस्थितीची जाणीव आणि उणीव कळाली तोच भविष्यामध्ये उज्ज्वल आणि यशस्वी होऊ शकतो ! ! याचाच अनुभव प्रत्यक्ष हनुमंताच्या बाबतीत सर्वांना येत होता . बालवयात हनुमंताला खूप खूप वेदना होत होत्या .कष्ट सोसावे लागले .एवढेच नाही तर पैलवान होण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती नाही पण वडिलांच स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी एका मोठ्या पैलवानांचा .ज्ञानेश्वर धंगेकर यांचा स्वयंपाकी होण्याचं ठरवलं . पण हार मानून आपल्या गावचा रस्ता झाला नाही /कुस्ती सोडली नाही . पैलवान ज्ञानेश्वर धंगेकर यांनी हनुमंतला आपल्या छोट्या भावाप्रमाणे वागणूक दिली .पैलवान होण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे सिंहाचा वाटा उचलला .दोघांचा स्वयंपाक करून हनुमंत आता कुस्ती मेहनत करू लागला . हनुमंत इतरांपेक्षा जास्तच मेहनत करत असे प्राणकंटा पर्यंत येणे हे त्याने कित्येक वेळा कुस्ती मेहनत करताना अनुभवले आहे .हनुमंत खऱ्या अर्थाने पैलवान होण्यासाठी पै .ज्ञानेश्वर धंगेकर यांनीमोलाचे मार्गदर्शन आणि त्यांनीच हनुमंताला पुण्यामध्ये हे श्री मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र कात्रज याठिकाणी पाठवले .या ठिकाणी आल्यानंतर हनुमंताला वस्ताद म्हणून ज्ञानेश्वर मांगडे हे भेटले त्यांनी
हनुमानच्या अंगातील शक्ती व दम यांचा पुरेपूर वापर करून त्यांला स्पर्धात्मक कुस्ती करण्यासाठी हनुमंताला खूप असे अनमोल मार्गदर्शन केले .खरोखर पुण्यामध्ये आल्यानंतर हनुमंत भाऊ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये आपलं !आपल्या जिल्ह्याच ! वडिलांचं !नाव चमकवू / गाजवू लागला .महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विविध पैलवानांचा अंदाज घेऊन
विभागीय सचिव पै .वामनदादा गाते यांच्या मार्गदर्शनाखाली तो विविध कुस्त्या जिंकू लागला .त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात खूप सुंदर व चमकदार कुस्त्या करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राभर गाजवलं .
2017 साली वारजे या ठिकाणी 74 किलो वजनी गटात सिल्वर पदक मिळवलं,2018 साली भूगाव या ठिकाणी 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळ्वले ,2019 साली जालना या ठिकाणी 79 किलो वजनी गटात सिल्वर पदक मिळवले,2020 बालेवाडी या ठिकाणी 79 किलो माती विभागात सुवर्णपदक मिळवले,खाशाबा जाधव युवा महाराष्ट्र केसरी आळंदी स्पर्धेत 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले,टॉकीज कुस्ती दंगल मध्ये हे उत्तम प्रतिसाद व सहभाग
असा कुस्ती क्षेत्रामध्ये खडतर कष्टमय आणि मेहनतीचा रस्ता हनुमंत पुरी यांच्या वाट्याला आला. तो त्यांनी यशस्वीपणे कष्टाने .परीश्रमाने आत्मविश्वासाने हसत-खेळत पार पाडली. कुस्ती करत असताना यात्रेतील व स्पर्धेतील विविध मानाच्या या स्पर्धेत त्यांनी खूप मोठं आपलं नाव केलेला आहे . राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 3सुवर्ण व 2 सिल्वर पदकाची कमाई त्यांनी यशस्वीपणे केलेली आहे .याचा आमच्या उस्मानाबादकरांना पूर्णपणे अभिमान व स्वाभिमान आहे .यापुढील त्यांनी लाल मातीची व कुस्तीची अशीच सेवा करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर यावे ..हीच अपेक्षा व सदिच्छा .।
लेखन …
पै.गोविंद नवनाथ घारगे (नितळीकर )
सहशिक्षक . प्रा .शा. रुद्रवाडी
ता .जी . उस्मानाबाद
9421111200