तासगाव प्रतिनिधी/ सांगली प्रतिनिधी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाला निर्देशित करून त्यानंतर कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना तसेच विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नूतन महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विवेक आगवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी संजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात पुढील दोन आठवडे आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनानक आवश्यक कार्यवाही करावी. आठवडी बाजारांवर निर्बंध आणताना जनतेच्या सोयीचाही विचार व्हावा. जनतेला भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांची कमतरता भासू नये याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत असताना जिल्ह्यात १ हजार ३ रूग्ण उपचाराखाली असून त्यापैकी १८१ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८२२ रूग्ण गृहअलगीकरणामध्ये आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच हॉस्पीटलमध्ये कोरोना अनुषंगीक उपचार सुरू आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या काळात आणखी रूग्णांना हॉस्पीटलायझेशनची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेवून शासकीय रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांमध्येही कोरोना विषयक उपचारांची आवश्यक तजवीज ठेवावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच रूग्णांनीही ताप, कणकण यासारखे दुखणे अंगावर न काढता लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून औषधोपचार सुरू करावेत व पुढील धोका टाळावा. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य यंत्रणेने आपली सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी. पुरेशा बेड्सची संख्या, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर इत्यादी सुविधा सज्ज ठेवाव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये टेस्टींगची संख्याही वाढवावी, अशा सूचना कोरोना आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. यामध्ये सद्यस्थितीत जिल्ह्यात पहिला डोस १ लाख ८३२ जणांनी घेतला असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १५ हजार ७१० आहे. याबाबतची अत्यंत तपशिलवार माहिती घेवून लसीची संबंधितांनी भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही ना.पाटील यावेळी केले.