खुनाचा उलगडा करण्यात तासगाव पोलिसांना यश, तासगाव पोलिसांची प्रभावी कामगिरी सर्व स्तरातून कौतुक
तासगाव प्रतिनिधी तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रोहित सिधू कांबळे (वय २२ रा. मांजर्डे, ता. तासगाव) याच्या मुसक्या आवळण्यात तासगाव पोलिसांना यश आले आहे. कांबळे याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
याबाबत तपासाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी दिलेली माहिती अशी, मांजर्डे येथील स्टँड चौकात अजितकुमार बाबुराव साळुंखे (वय ४८, रा. मांजर्डे) व तानाजी शिवराम शिंदे (वय ६३ रा. आरवडे) या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. दोघांच्याही अंगावर जखमेचे व्रण होते. दगडाने ठेचून दोघांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या तीन – चार दिवसांपासून तासगाव पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, कर्मचारी मांजर्डे परिसरात कसून चौकशी करीत होते. अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. आरवडे, मांजर्डे परिसरात पोलिसांनी गोपनीय खबऱ्या सोडले होते. आरोपी अज्ञात असल्याने या दुहेरी हत्याकांडाचा शोध घेणे पोलिसांसमोरील आव्हान होते.अखेर परिस्थितीजन्य पुरावे व गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे रोहित सिधू कांबळे याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, रोहित कांबळे याने दोन – दोन खून का केले, त्याच्यासोबत या गुन्ह्यात आणखी कोण होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी दिली आहे. पुढील अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या सूचनेनुसार सुरू आहे.