सलगरा,दि.१६( प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे मंगळवार (दि.१५ ऑगस्ट) रोजी ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी आपण भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. त्यानिमित्त शासनाने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्याचे आणि प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावून शासनाने दिलेल्या पोर्टलवर फोटो अपलोड करण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेस सलगरा – गंधोरा सह पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. गंधोरा येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यवर्धीनी केंद्र, देवसिंगा (तुळ) यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरन कार्यक्रमांतर्गत आणि “टीबी मुक्त पंचायत” उपक्रमांतर्गत काढलेल्या प्रभात फेरीत ‘क्षयरोग मुक्त गाव माझी जबाबदारी’, ‘क्षयरोग प्रसार टाळा आपल्या प्रियजनांची काळजी घ्या’ असा संदेश दिला.
तर सलगरा येथे ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील ग्रामपंचायत, जि.प. शाळा, प्रा. आरोग्य केंद्र, कै.अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालय, मधुशाली महाविद्यालय, बँक, अंगणवाडी, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी केंद्रीय माध्यमिक निवासी शाळा यांसह घरोघरी तिरंगा फडकावून सलगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून भव्य अशी रॅली काढली, यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांंतर्गत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशभर हा उपक्रम घराघरात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध शाळा, महाविद्यालये, संस्थाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेतले होते. म्हणुन १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा’’ म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. म्हणून त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर, शाळा, महाविद्यालय तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची होती. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या साठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करून या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करून ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रमात भारतीय नागरीक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम निष्ठेने पार पाडायचा असे आवाहन दोन्ही गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्या नुसार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विविध ठिकाणी ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासह घरोघरी तिरंगा फडकवण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात येत होता. या अंतर्गत स्वातंत्र्यदिनी सलगरा – गंधोरा या दोन्ही ग्रामपंचायत कार्यालय आवारात सैन्यदल, पोलिस व संरक्षण दलातील हुतात्मा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ माजी सैनिक, वीर जवान, प्रतिष्ठित जेष्ठ नागरीक आदींच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करून आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक आणि वारसांचा ग्रामपंचायती तर्फे सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी सलगरा येथे ग्रामसेवक जि.के.पारे, सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, ग्रा.पं.सदस्य, कर्मचारी सतिश स्वामी, देवानंद माळी यांच्या सह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. तर गंधोरा येथे ग्रामसेवक स्वाती खोपडे, सरपंच बबिता राठोड, उपसरपंच संजय भोसले, आरोग्यवर्धिनी केंद्र देवसिंगा (तुळ) येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मुलाणी ए. झेड., ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी लक्ष्मीकांत कुलकर्णी, भुजंग भोसले यांच्या सह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.