तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचा ना पत्ता ना मुद्दा!
प्रशासनाचा आपत्ती निवारण कार्यक्रम फक्त कागदावरच?
पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील लाखनगाव येथील तोडणीस आलेल्या ऊसाच्या फडाला शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लाखनगाव येथील आडका क्षेत्रातील गणपत रावसाहेब ढेपे यांच्या शेतातील सर्वे नंबर 666 मधील 60आर ऊस, तसेच हनुमंत श्रीराम ढेपे यांच्या सर्वे नंबर 665 क्षेत्रांमधील 80 आर उसाची पूर्णपणे वाढ होऊन हा ऊस तोडणी योग्य झाला होता. मात्र शेतातून गेलेल्या विद्युत तारा ऊसामध्ये लोंबकळत होत्या. वाऱ्यामुळे त्यांच्यात घर्षण होऊन शनिवारी दुपारी दोन वाजता लागलेल्या आगीत ऊस जळून पूर्णपणे खाक झालेला आहे. आग लागल्याचे समजताच गावातील तरुण मुलांनी आग विझवण्याचे खूप प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न फोल ठरले.मात्र त्यांना आगीचा विस्तार होऊन नुकसान टाळता आले. दरम्यान या शेतकऱ्यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना कळवले असता ते मुख्यालयी राहत नसल्याकारणाने घटनास्थळी सायंकाळपर्यंत ही पंचनामा साठी येऊ शकले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा आपत्ती निवारण कार्यक्रम हा फक्त कागदोपत्रीच राहतो का काय? ज्यावेळी खरच नागरिकांना गरज पडते त्यामुळे मात्र प्रशासन झोपा काढते की काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून या शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.