तासगाव/सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१पासून शंभर टक्के लाॅकडाऊन आशा आशयाचे मेसेज पालकमंत्री ना.जयंतराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही . तथापि दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबतच्या संबंधित नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत, असे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे .
गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झूम द्वारे संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोणा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची , सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात मंगळवार दिनांक २१ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत शंभर टक्के लाॅक डाऊन होणार अशा आशयाच्या कोणत्याही बातम्यांवर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये हे असे आवाहन पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी केले आहे .
त्याच वेळी *सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लाॅकडाउन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिला आहे*.
तसेच नागरिकांमध्ये कोणालाही ताप, सर्दी ,खोकला, मळमळ ,वास न येणे ,मानसिक गोंधळलेली स्थिती , स्नायू दुखी आदींबाबत कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा . गरोदर स्त्रिया, लहान मुले, ५० वर्षावरील नागरिक तसेच कमोरबिडीटी असणाऱ्यांनी अधिक सजगपणे काळजी घ्यावी .कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. वेळेवर उपचार सुरू झाल्यास पुढील संभाव्य धोका तसेच वाढणारा प्रादुर्भाव या दोन्ही बाबी टाळता येतील. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका . काहीही लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. अनावश्यक गर्दी करू नका. मास्कचा वापर अनिवार्यपणे करा. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळा आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत काटेकोर काळजी घ्या ,असे आवाहनही पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी केले आहे.