Home Blog Page 31

गुढीपाडव्यानिमित्त श्री तुळजाभवानी देवींची विशेष अलंकार महापूजा

तुळजापूर – गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर आज श्री तुळजाभवानी देवीची विशेष अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. भारतीय नववर्षाच्या प्रारंभाला साजरे करणारा गुढीपाडवा हा दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला मानला जातो. यानिमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिरात भव्य स्वरूपात पूजाविधी आणि गुढी उभारणी करण्यात आली.

आज पहाटे ५ वाजता मंदिराच्या प्रांगणात महंतांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. देवीचा गाभारा सुगंधित फुलांनी सजवला गेला होता. देवीला सोन्या-चांदीच्या अलंकारांनी विशेष शृंगार करण्यात आला. यानंतर महापूजा आणि आरतीचा सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसर भक्तांच्या “जय भवानी” च्या गजराने दुमदुमून गेला.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच, गाभाऱ्यात दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी दर्शन घेत श्री तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात भक्तांसाठी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

मंदिराचे प्रमुख महंत यांनी यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले आणि गुढीपाडव्याचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, गुढीपाडवा हा नवे संकल्प करण्याचा, सकारात्मक विचारांचा आणि भक्तीभावाने जीवन जगण्याचा दिवस आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसर स्वच्छ आणि आकर्षक फुलांनी सजवला गेला होता. भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष रांगा लावण्यात आल्या होत्या.

गुढीपाडव्याच्या या पावन प्रसंगी उपस्थित भक्तांनी आपले कुटुंब आणि समाजासाठी समृद्धी, सुख-शांती आणि ऐश्वर्याची प्रार्थना केली. यावेळी संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाली होती.

एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन चुनावी जुमला

मुंबई – राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ही चर्चा करण्यात आली. त्यानंतर 26 मार्च 2025 रोजी राज्याच्या कृषी विभागाने कृषी आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 2025 च्या खरीप हंगामापासून नवीन पिक विमा योजना राबवली जाईल.

चुनावी आश्वासनाची फसवणूक; शेतकऱ्यांना फसवले

महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी एक रुपयात पिक विमा योजना हे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन आता केवळ जुमलाच ठरले आहे. याआधी “लाडकी बहीण” योजनेसह अनेक आश्वासने पाळली गेली नाहीत. त्याच धर्तीवर एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावल्याची भावना बळीराजामध्ये निर्माण झाली आहे.

योजना बंद करण्याची कारणे आणि गैरव्यवहाराचे आरोप

सन 2023 पासून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात आली. मात्र, योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सामूहिक सुविधा केंद्र (CSC) चालकांनी बनावट अर्ज दाखल करून अपात्र व्यक्तींना विम्याचा लाभ दिला. याशिवाय शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पिकांच्या ऐवजी जास्त विमा रक्कम मिळवण्यासाठी अन्य पिकांची माहिती दर्शवली. शासकीय जमिनी, मंदिरांच्या जमिनी आणि अकृषिक जमिनींवरही विमा काढल्याचे प्रकार समोर आले.

कंपनीला प्रत्येक अर्जावर 40 रुपये मिळतात, याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल करण्यात आले. परिणामी, राज्य शासनाने योजनेतील अडचणी लक्षात घेऊन यास पुन्हा नव्याने संरचित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि विमा कंपन्यांचा फायदा

सन 2016 ते 2024 या आठ वर्षांत राज्य शासनाने पिक विमा योजनेसाठी 43,201 कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु शेतकऱ्यांना केवळ 32,658 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. परिणामी, विमा कंपन्यांनी तब्बल 10,543 कोटी रुपये नफा मिळवला. याशिवाय, विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.

इतर राज्यांचे मॉडेल आणि महाराष्ट्राचा पुढील मार्ग

गुजरातने पिक विमा योजनेतून बाहेर पडून थेट पावसाच्या प्रमाणावर आधारित मदत योजना राबवली आहे. ओडिशामध्ये एक रुपयात पिक विमा केवळ दोन हेक्टरपर्यंतच लागू आहे. आंध्रप्रदेशमध्ये राज्य सरकार 100% पीक पाहणी करून विमा हप्ता भरते. याउलट, राजस्थानमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तींसाठी विमा संरक्षण नाही.

महाराष्ट्र राज्याने यापुढे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी अनुक्रमे 2%, 1.5% आणि 5% विमा हप्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिल जगताप यांची प्रतिक्रिया

पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी राज्य शासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. “गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, परंतु योजना बंद करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यासाठी ही योजना सुरूच ठेवली पाहिजे. सरकारने पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत सुधारणा करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या मनात ही योजना केवळ निवडणुकीसाठी होती, अशी भावना निर्माण होईल.”

अनिल जगताप, पीकविमा अभ्यासक

नवीन धोरणाची अंमलबजावणी

2025 च्या खरीप हंगामापासून नवीन पिक विमा योजना लागू होईल. यामध्ये कापणी प्रयोग आधारित उत्पादनावर विमा रक्कम निश्चित केली जाणार आहे. तसेच, 50% उत्पादनाची माहिती तंत्रज्ञान आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे. ही योजना राज्यस्तरीय ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्याचा प्रस्तावही शासनाने दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात असून, सरकारने लवकरच अंतिम निर्णय घेऊन याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.

धाराशिव येथील महालक्ष्मी लॉन्ड्री आगीच्या भक्ष्यस्थानी, आग विझवताना लॉन्ड्री मालक जखमी

दुकानातील फर्निचर तसेच ग्राहकांचे कपडे आगीत मध्ये जळून झाले खाक,लाखो रुपयांचे नुकसान

धाराशिव- शहरातील समता कॉलनी मध्ये असणाऱ्या नाईकवाडी नगरच्या माने कॉम्प्लेक्स मध्ये नेताजी आबा धोंगडे यांचे महालक्ष्मी लॉन्ड्री या नावाने दुकान आहे. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. पहाटेच्या सुमारास सुमारास दुकानातून अचानकपणे धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब दुकान मालक नेताजी आबा धोंगडे यांना बोलवून घेतल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न झाले. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. यामध्ये दुकानातील सर्व फर्निचर टेबल कपाट खुर्च्या जळून गेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचे लॉन्ड्री साठी आलेले कपडे,ड्रेस, साड्या ही जळून गेलेल्या आहेत,त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवताना फर्निचरचा गरम झालेला काच फुठून लॉन्ड्री मालक नेताजी आबा धोंगडे यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून दुकांनाच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट आहेत. सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आल्याने कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही. जाळीत लॉन्ड्री दुकानाची आनंद नगर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

खरा दानशूर… 1 कोटीचं दान केलं पण नाव समोर नाही येऊ दिलं

श्रीतुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण

धाराशिव – केलेलं दान एका हाताचे दुसऱ्या हाताला समजू नये असे म्हणतात आणि जो हा नियम पाळतो तोच खरा दानशूर मानला जातो. जाहिरातबाजीच्या दुनियेत अपवादात्मक स्थितीत अशी व्यक्ती सापडते. महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांचं सुवर्ण दान केलं आहे.

नियमित मोजणीसाठी शुक्रवार दि 28 मार्च 2025 रोजी तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीजींच्या मूळ गभऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्र 2 मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.
मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे. या बिस्किटांवर त्याचे वजन 100 ग्रॅम आणि शुद्धता 999.0 असे लिहिले आहे.

मंदिर संस्थान कडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान

अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर व गाभाऱ्यात ठेवणे तसेच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत योग्य दक्षता मंदिर संस्थानचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी घेत असतात. यास्तव कौतुकाची थाप म्हणून मंदिर संस्थान कडून कर्तव्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व देवींजींचा फोटो देऊन सन्मान केला.

ट्रक नागपूरचा वाहतूक धाराशिव मध्ये

ट्रक मालक अमित कानडे चा विशाल रॉडलाईन्सशी संबंध काय?

घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पुन्हा प्रेस नोट द्वारे खुलासा करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा खटाटोप

भाग ७

धाराशिव (आकाश नरोटे) धान्य वितरण व्यवस्थेमधून जिल्हा पुरवठा विभागाने २०० कोटींपेक्षा अधिक घोटाळा केला असल्याची बातमी दैनिक जनमत ने यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला खुलासा देखील छापला आहे. मात्र हे प्रकरण ८.९४ क्विंटल धान्य अफरातफरीचे नसून यात २०० कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा असल्याबाबत काही प्रश्न जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना विचारण्यात आले होते त्याबाबत काहीच माहिती न देता ढोकी पोलिस ठाण्यांतर्गत दाखल असलेला गुन्हा आणि त्यातीलच कारवाई जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत माध्यमांना देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.

एम. एच. ४० एन ७५१३ या ट्रक मधून हे धान्य आणण्यात आले होते. हा ट्रक नागपूरच्या अमित कानडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समजते आणि वाहतुकीचे कंत्राट विशाल रॉडलाईन्स या कंपनीला दिले असल्याने विशाल रोडलाईन्स आणि अमित कानडे याचा संबंध काय? अमित कानडे याची ट्रक वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी घेतली गेली होती का? याबाबत प्रश्न विचारून देखील त्याबाबत अद्याप कसलाच खुलासा करण्यात आला नाही.
ज्या ट्रक मधून वाहतूक केली गेली त्याचा विमा, फिटनेस, पीयूसी नसल्याबाबत जेव्हा बातमीतून माहिती समोर आणली तेव्हा त्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यावर देखील विशेष असा खुलासा करण्यात आला नाही. त्या ट्रक मधून काळाबाजार व्हावा यासाठी जी. पी. एस. यंत्रणा बसवली नसल्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर देखील कोणताच खुलासा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अद्याप केला नाही. उलट जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने ही अवैध वाहतूक केली गेल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना संभ्रमित करण्यात पुरवठा विभाग यशस्वी

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना तांदूळ घोटाळ्यात संभ्रमित करण्यात जिल्हा पुरवठा विभाग यशस्वी झाला असल्याने या प्रकरणी दोन मॅरेथॉन बैठका घेऊन देखील कुठलीही कारवाई अद्याप केली गेली नाही. जिल्हाधिकारी नवखे असल्याने त्यांना घोटाळ्याच्या मूळाशी जाण्यापासून रोखले जात आहे. ८.९४ क्विंटल किंवा 200 कोटी पेक्षा अधिकचा हा घोटाळा असल्याने उच्च स्तरीय समिती नेमण्याची कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. जिल्हाधिकारी याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बडे अधिकारी सामील?

२०० कोटीपेक्षा अधिक हा घोटाळा असला तरी एकट्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमध्ये एवढे धाडस नसून यात बदली होऊन गेलेले वरिष्ठ अधिकारी सामील असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त?

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त असल्यामुळे त्यांनी कंत्राटदाराला मोकळीक दिली? जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कोणाचे बळ मिळत असल्याने अवैध वाहतूक होत असताना, घोटाळा होत असताना त्या गप्प राहिल्या याबाबत उलट सुलट चर्चा सध्या सुरू आहेत.

नवा किस्सा नवी माहिती

पुरवठा विभागात यापूर्वी अफरातफर घडली नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी शासकीय प्रेस नोट मध्ये सांगतात. नोव्हेंबर महिन्यात तुळजापूर तालुक्यात पकडलेला ट्रक कोणाच्या सांगण्यावरून सोडला? त्यात लाखो रुपयांची डील कोणी केली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना पुरवठा विभागातील एक अधिकारी अहमदपूर तालुक्यात नोकरीला असताना त्यांच्यावर लाच लुचपत विभागाची रेड पडणार होती मात्र त्यापूर्वीच त्यांनी शिपायाच्या फटफटीवरून पलायन केल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नसल्याचा किस्सा देखील आता जिल्हाधिकारी कार्यालयात रंगवून रंगवून सांगितला जात आहे.

भाग ६
भाग ५
भाग ४
भाग ३
भाग २
भाग १

लुटीच्या मालासह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात



धाराशिव : दिनांक 26 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रवाना झाले असता, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कळंब पोलीस ठाणे हद्दीतील डिकसळ पाटीजवळ झालेल्या जबरी चोरीतील आरोपी कळंब पारधी पिढीत असल्याचे समजले. आरोपींची नावे लल्ल्या, मिर्च्या आणि गंग्या पवार असल्याची माहिती मिळाली.

तत्काळ कारवाई करत पथकाने लल्ल्या उर्फ अनिल बादल शिंदे (रा. मोहा पारधी पिढी कळंब) आणि मिर्च्या उर्फ आकाश रवि काळे (रा. कळंब पारधी पिढी कळंब) यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी डिकसळ पाटीजवळ एका पती-पत्नीला अडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटल्याचे कबूल केले.

पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा क्रमांक 104/2025, कलम 309 (4), 126(2), 3(5) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल साथीदार गंगाराम बापू पवार याच्या बहिण सोनाली काळे हिच्या मदतीने केज येथील एका सोनाराला विकल्याचे सांगितले.

पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या परवानगीने पथकाने तत्काळ केज येथे जाऊन 4.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, मणी, असा एकूण 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी युसुफवडगाव (जि. बीड) येथेही एक जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेले आरोपी पुढील कार्यवाहीसाठी कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी, चापोका रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.

15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्कर रंगेहात पकडला

धाराशिव, दि. 25 मार्च 2025 — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) धाराशिव येथे मोठी कारवाई करत 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पॅरामेडिकल वर्करला रंगेहात पकडले. या प्रकरणात आरोपी नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50 वर्षे), जो सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात कंत्राटी पॅरामेडिकल वर्कर म्हणून कार्यरत आहे, याला अटक करण्यात आली.

तक्रारीची पार्श्वभूमी
तक्रारदार हे आरोग्य विभागात लोहारा येथे पॅरामेडिकल वर्कर (कुष्ठरोग) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा फेब्रुवारी आणि मार्च 2025 महिन्यांचा पगार तसेच 2023-2024 या आर्थिक वर्षातील टीए (प्रवास भत्ता) बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

पडताळणी आणि सापळा रचला
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत विभागाने आरोपीवर नजर ठेवली. आज सकाळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कार्यालयात तक्रारदारासोबत आरोपीने 27,000 रुपयांची लाच मागणी करत तडजोडीनंतर पहिला हप्ता म्हणून 15,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाप्रवि पथकाने सापळा रचला.

लाच स्वीकारताना रंगेहात अटक
आरोपी नरसिंग सूर्यवंशी याने तक्रारदाराकडून 15,000 रुपये स्वीकारले, त्याच क्षणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये 15,000 रुपयांची लाच रक्कम, 5 ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, अतिरिक्त 300 रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

आरोपीच्या घरझडतीला सुरुवात
पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थानीही झडती सुरू केली असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोपीचा मोबाईल तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणी आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अ नुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

सापळा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नेताजी अनपट, सचिन शेवाळे, विशाल डोके, नागेश शेरकर, शशिकांत हजारे, प्रकाश भोसले आणि चालक दत्तात्रय करडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव – दिनांक 24 मार्च 2025 रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक रात्र गस्तीसाठी पेट्रोलिंग करत असताना पथकास ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्या जवळील जुना पळसप रोडवर संशयास्पद पाच इसम दिसले.

पथकाने संशय आल्याने जवळ जाऊन पाहणी केली असता दोन इसम अंधाराचा फायदा घेत मोटरसायकलसह पळून गेले, तर उर्वरित तीन इसम पळून जात असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशी आणि झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य, कत्ती, कटावणी, कटर, 600 रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 90,700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे संतोष प्रभाकर कुराडे (वय 36, रा. सुभाष नगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली), अविनाश प्रभाकर कुराडे (वय 34, रा. सुभाष नगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) आणि प्रवीण राजाराम मोरे (वय 30, रा. चांदोल वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) अशी आहेत.

यापूर्वीही धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री झाल्यानंतर सपोनि कासार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 97/25, कलम 310(4), 301(5) भारतीय दंड संहितेसह कलम 4, 25 भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या इसमांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे ढोकी येथे हजर करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी पार पाडली.

८.९४ क्विंटलची अफरातफर नव्हे, तर जिल्हा पुरवठा विभागात सुमारे २०० कोटींचा घोटाळा?

धान्य वितरण व्यवस्थेत जी.पी.एस. संनियंत्रण कक्ष नावालाच

आकाश नरोटे
भाग ६

धाराशिव – जिल्ह्यातील ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफर प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ माजवली आहे. मात्र हे प्रकरण केवळ ८.९४ क्विंटलपुरते मर्यादित नसून, यामागे २०० कोटी रुपयांपर्यंतचा महाघोटाळा उघडकीस येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत, कंत्राटदारांच्या सोयीसाठी सरकारी यंत्रणांना नाममात्र ठेवल्याचा आरोप केला जात आहे.


शासनाच्या नियमांना हरताळ

धान्य वितरण प्रणालीमध्ये अपहार आणि काळाबाजार टाळण्यासाठी सरकारने जी.पी.एस. ट्रॅकिंग यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे. वाहतूक निश्चित मार्गानेच होईल याची खात्री करण्यासाठी जी.पी.एस. डेटा संनियंत्रण कक्षामार्फत तपासला जातो. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकारी शेंडे यांनी ही यंत्रणा कागदोपत्री ठेवत प्रत्यक्षात कोणतेही नियमन केले नाही.

शासकीय धान्य ठरलेल्या रस्त्यांवरून न नेता अनधिकृत मार्गाने वाहतूक केल्याची शक्यता आहे. यामध्ये कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यातील संगनमत स्पष्टपणे दिसून येत आहे.


२०० कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज

प्राथमिक तपासानुसार ८.९४ क्विंटलच्या तांदळाच्या अफरातफरीप्रमाणेच शेकडो टन धान्याचे काळ्या बाजारात विक्रीसाठी गैरवापर करण्यात आला असावा. या प्रक्रियेत २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये केवळ एका प्रकरणातच नव्हे, तर गेल्या काही वर्षांत झालेल्या वाहतुकीवर सखोल चौकशी केल्यास घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


विशाल रोडलाईन्सवर गंभीर आरोप

विशाल रोड लाईन्स या कंपनीला शासकीय धान्य वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, या कंपनीने जी.पी.एस. यंत्रणा बसवलेली नसलेली वाहने वापरून वाहतूक केल्याचा आरोप आहे. यामुळे धान्याचा माग काढणे अशक्य झाले आहे.

यामध्ये कंपनीने वाहतुकीसाठी अपात्र वाहने वापरली, वाहतुकीचे खोटे अहवाल सादर केले आणि संनियंत्रण यंत्रणेला फसवले, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कंत्राटाचे मूल्य २०० कोटींचे असले, तरी अपहाराचा आकडा आणखी मोठा असू शकतो.


जी.पी.एस. संनियंत्रण कक्षाचा फज्जा

शासनाने सर्व जिल्हा पुरवठा कार्यालयांमध्ये जी.पी.एस. संनियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला होता. या कक्षामार्फत वाहतुकीचे थेट निरीक्षण केले जाते. मात्र, धाराशिव येथे हा कक्ष केवळ नावालाच होता.

जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी संनियंत्रण कक्षाचे कामकाज ठप्प ठेवून कंत्राटदारांना मोकळीक दिली.

कक्षात नियमित डेटा मॉनिटरिंग झालं नाही.

वाहतूक अहवालांची पडताळणी झाली नाही.

अनधिकृत मार्गांची तपासणी केली गेली नाही.

या निष्काळजीपणामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळाला आणि शेकडो कोटी रुपयांचा अपहार शक्य झाला.


अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

या घोटाळ्यातील मुख्य जबाबदार अधिकारी स्वाती शेंडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावे आणि संपूर्ण पुरवठा विभागाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


हे प्रश्न अनुत्तरित

स्वाती शेंडे यांनी संनियंत्रण कक्ष कार्यान्वित का केला नाही?

जी.पी.एस. यंत्रणांची नियमित तपासणी का झाली नाही?

कंत्राटदारांच्या अपात्र वाहनांना कसे परवानगी देण्यात आली?

गेल्या काही वर्षांत किती टन धान्याचा अपहार झाला?

या अपहारातून कोणाला थेट फायदा झाला?


राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची सामाजिक न्याय आणि प्रशासन विभागामार्फत सखोल चौकशी सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे. धान्य वितरणातील जी.पी.एस. डेटा, गोदामातील सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि वाहनांची यादी यांची सखोल तपासणी केली जावी.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी आणि धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी जनतेची मागणी आहे.

भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

पंधरा वर्षानंतर पारा गावातून ऋषिकेश शेळके यांची भारतीय आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड; जल्लोषात मिरवणूक काढत गावकऱ्यांचा आनंदोत्सव

वाशी प्रतिनिधी (राहुल शेळके): धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावाने १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा केला आहे. गावातील ऋषिकेश जीवन शेळके (वय 21) यांनी भारतीय सैन्यात टेक्निकल पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीचा गावकऱ्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला. शुक्रवारी सायंकाळी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी पेढे वाटत, डीजेच्या तालावर नाचत त्यांचे अभिनंदन केले.

कष्टकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या ऋषिकेशचा जिद्दीचा प्रवास

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले ऋषिकेश शेळके यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. त्यांचे वडील जीवन शेळके अल्पभूधारक शेतकरी असून, आई गृहिणी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या ऋषिकेश यांनी शिक्षण घेतानाच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जय भवानी विद्यालय, पारा येथे पूर्ण केले. पुढील स्वप्नासाठी त्यांनी ईट येथील वीर भगतसिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी शारीरिक व मानसिक तयारीसाठी कठोर मेहनत घेतली. तीन महिन्यांपूर्वी अहिल्यानगर येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत त्यांनी भाग घेतला होता. 21 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी यश संपादन केले आणि भारतीय आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड मिळवली.

गावकऱ्यांचा अभिमान — १५ वर्षांनी सैन्यात गावाचा सुपुत्र

पारा गावातून यापूर्वी १५ वर्षांपूर्वी विलास शेळके यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी गावातून ऋषिकेश यांची निवड झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्याच्या यशाची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत करण्याचे ठरवले.

डिजेच्या तालावर नाचत, गुलाल उधळत व पेढे वाटत ऋषिकेश यांची मिरवणूक गावभर फिरवण्यात आली. नागनाथ नाईकवाडी, महादेव लोकरे, जीवन भराटे, युवराज भराटे, शंकर शेळके, शैलेश पाटील, बाजीराव भराटे, उद्धव शेळके, लाला शेळके, महेश खोले, बालाजी कुरुंद, पोपट कुरुंद, बळीराम शिनगारे, रोहित शेळके आदी मान्यवरांसह गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जय भवानी विद्यालयात ऋषिकेश यांचा सत्कार सोहळा

22 मार्च रोजी पारा गावातील जय भवानी विद्यालयात ऋषिकेश यांचा माजी विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी ऋषिकेशच्या मेहनतीची प्रशंसा करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या बळावर ऋषिकेशने यश मिळवले आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक आदर्श ठरेल,” असे गौरवोद्गार मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी काढले.

या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग, शालेय समिती अध्यक्ष शंकर शेळके, माजी विद्यार्थी, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ऋषिकेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कुटुंबीयांचा अभिमान आणि ऋषिकेशचे मनोगत

यावेळी ऋषिकेश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद आहेत. भारतीय सैन्यात देशसेवा करण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. ते आता पूर्ण झाले. मी यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे आभार मानतो.”

पारा गावातील ऋषिकेश शेळके यांच्या यशामुळे संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांची देशसेवेसाठीची सुरुवात अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील प्रवासासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.