Home धाराशिव तांदळाची अफरातफर प्रकरण गुन्हा नोंद होऊन 15 दिवस उलटले, आरोपी मोकाट 

तांदळाची अफरातफर प्रकरण गुन्हा नोंद होऊन 15 दिवस उलटले, आरोपी मोकाट 

0
32

धाराशिव – लातूर येथून धाराशिवकडे आलेला प्राधान्य योजनेचा तांदूळ तेर येथे विकल्या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असताना १५ दिवस उलटूनही अद्याप आरोपी सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१४ फेब्रुवारी रोजी तेर येथे ८.९४ क्विंटल तांदूळ खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एम. एच. ४० एन ७५१३ या ट्रक चा चालक अलीम शेख याच्यावर हा गुन्हा नोंद आहे. हा तांदूळ अलीम शेख यानेच विकला होता की पुरवठा विभागातील कोणी कर्मचारी त्या ट्रक मध्ये बसला होता हा पोलिस तपासाचा भाग आहे. अद्याप आरोपी पकडला नाही की शोधला नाही हा संशोधनाचा भाग आहे. याबाबत  गुन्ह्याचे तपास अधिकारी सपोनी हजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. मात्र तपास कधी संपणार आणि यातील नेमके आरोपी कधी सापडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जबाबदारी कोणाची? 

सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गोरगरिबांच्या जीवनाशी संबंधित आहे. नागरिकांना वेळेत धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यासाठी विश्वासू व्यक्ती चालक म्हणून नेमणे ही जबाबदारी देखील कंत्राटदाराची असताना जर चालक पोलिसांना सापडत नसेल तर दाल कुछ तो काला है म्हणण्यासाठी वाव आहे.

अलीम शेख कोण?

ज्याच्यावर गुन्हा नोंद केला तो अलीम शेख कोण? त्याचे वय किती? तो कुठे राहतो हे प्रश्न अनुत्तरित आहेत कारण तक्रारीत जो पत्ता आहे तो केवळ नळदुर्ग असा आहे. ज्या गोदाम पालाच्या अहवाला आधारे सहायक पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली त्यात चालकाचा पूर्ण पत्ता का दिला गेला नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. गुन्हा नोंद केल्या नंतर नळदुर्ग मध्ये अलीम शेख नावाचा ट्रक ड्रायव्हर कोण आहे का याची चौकशी केली असता असा कोणी ड्रायव्हर नसल्याचे सांगतात. याबाबत पोलिसांनी अद्याप चौकशी न केल्याने सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here