धाराशिव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेत कितीही पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झाला तरीही धान्य चोरी, काळाबाजार आणि गैरव्यवहाराच्या घटना समोर येतच असतात. अशाच एका प्रकारात, लातूरहून धाराशिव येथील गोदामात येणारा तांदूळ तेर येथे मोठ्या प्रमाणावर खुल्या बाजारात विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला असून, सुरुवातीला हा मुद्दा दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमांमध्ये बातम्या झळकल्यानंतर पुरवठा विभागाने मोठ्या गडबडीत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.
प्रशासनाने या तांदळाची तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्या, तरी या प्रकारामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. आता जबाबदारी कोणावर टाकावी, यासाठी प्रशासन बळीच्या बकऱ्याचा शोध घेत असल्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, एका ट्रकचालकाने इतक्या मोठ्या प्रमाणावर तांदूळ विक्री करणे शक्य आहे का?
लातूरहून निघालेल्या तांदळाचा प्रवास आणि संशयास्पद तूट
लातूर येथून निघालेल्या ट्रकमधील तांदूळ धाराशिव जिल्ह्यातील पळसप आणि तेर येथे विक्रीसाठी उतरवला गेल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर कट्टे विकले गेले तरी केवळ ९०० किलो तूट असल्याचा दावा करण्यात येत आहे, जो संशयास्पद वाटतो. ट्रकने प्रवास करताना विविध ठिकाणी तांदळाची विक्री झाल्याची चर्चा असून, काही व्यापाऱ्यांना हा तांदूळ कमी दरात विकण्यात आला असल्याचे देखील समोर आले आहे.
ट्रकचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये साटेलोटे?
हा संपूर्ण प्रकार ट्रकचालकाच्या एकट्याच्या कृत्याचा परिणाम असू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. ट्रक चालक आणि काही स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रक धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच, लातूर ते धाराशिव या मार्गावर काही गावांमध्ये तांदूळ उतरवला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिलीभगत कोणाकोणाची?
या घोटाळ्यात केवळ ट्रकचालक नव्हे, तर पुरवठा विभागातील काही अधिकारी, व्यापारी आणि इतर घटक सामील असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने केवळ तांदूळ परत मिळवण्यासाठी हालचाली केल्या, परंतु त्यामागील खरी साखळी कोणती आहे, हे शोधून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर आणखी धक्कादायक माहिती उघड होऊ शकते.
सखोल चौकशीची गरज
जर या प्रकरणाची नीट चौकशी झाली, तर तांदूळ चोरी आणि खुल्या बाजारातील विक्रीमध्ये अनेक बडी नावं समोर येऊ शकतात. यासाठी केवळ एका ट्रक चालकावर खापर फोडण्यापेक्षा, संपूर्ण पुरवठा साखळीतील दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या या प्रकरणात कोणावर कारवाई होते, आणि यातून आणखी कोणते मोठे चेहरे उघडकीस येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- 5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?
- जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार ! मार्चमध्ये सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा आदेश, कर्मचारी उपस्थित – विभाग प्रमुख मात्र गायब!!
- धाराशिव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका – जिल्हा आणि राज्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष