सिना कोळेगाव धरणा लगतच्या शेतकऱ्यांचा आनाळा साठवण तलाव आणि कंडारी कालव्याला पाणी सोडण्यास विरोध

0
25

परंडा (दि. १६ फेब्रुवारी) – परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणातून आनाळा साठवण तलाव व कंडारी कालव्यात पाणी सोडण्यास धरणलगतच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

शेतकऱ्यांनी तहसीलदार व सिना कोळेगाव धरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, सिना कोळेगाव धरणासाठी त्यांच्या बागायती जमिनी संपादित करण्यात आल्या असून अद्याप त्यांना संपूर्ण भरपाई मिळालेली नाही.

कंडारी कालव्याच्या दुरवस्थेचा आरोप

शेतकऱ्यांच्या मते, कंडारी कालवा नादुरुस्त असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे आणि ओढ्याद्वारे वाया जात आहे. तसेच पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

आनाळा साठवण तलावात पाणी सोडण्यास कायदेशीर आधार नाही

शेतकऱ्यांनी सांगितले की, आनाळा साठवण तलाव व साकत प्रकल्पात पाणी सोडण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे धरणातील पाणी कमी होत असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बँका व खाजगी सावकारांकडून कर्ज काढून शेती केली आहे. जर पाण्याचा अव्यवस्थित उपसा सुरूच राहिला, तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सिना कोळेगाव धरणातील पाणी वाटपाबाबत १० फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा समितीची बैठक झाली.

या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल, याची दक्षता घेण्यास सांगितले.

त्याचबरोबर सिना-कोळेगाव प्रकल्पांतर्गत भोत्रा येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात नियमित पाणी सोडावे, त्यामुळे ३५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस उपस्थित मान्यवर

या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. तसेच जिल्हाधिकारी **डॉ. सचिन ओंबासे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूरच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक रुपाली ठोंबरे, धाराशिवच्या अधीक्षक अभियंता थोरात, कार्यकारी अभियंता ए. एन. पाटील, सिना-कोळेगाव व निम्न तेरणा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता के. व्ही. कालेकर, धाराशिव पाटबंधारे मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता सी. आर. पाटील आणि निम्न तेरणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एन. बी. पाटील उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here