तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स स्थानिक गुन्हे शाखा आणि तामलवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केले असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे 2.50 लाख रुपये असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारकार आणि मोबाईलसह एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तुळजापूर उपविभागात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ तुळजापूरमध्ये विक्रीसाठी आणणार आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तामलवाडी पोलिसांची मदत घेत सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गस्त सुरू केली.
संशयित कारची तपासणी आणि मोठी कारवाई
तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटारकार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन इसम आढळले. चौकशी दरम्यान, त्यांच्याकडे एमडी (मेथॅम्फेटामाइन) अमली पदार्थ असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांनी हा अमली पदार्थ मुंबईहून तुळजापुरात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अमली पदार्थ (किंमत 2.50 लाख रुपये), गुन्ह्यात वापरलेली मोटारकार आणि मोबाईल असा एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तीघांना अटक, एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी (दोघे रा. तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग) या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार यांनी फिर्याद दिल्यानंतर तिघांविरुद्ध एन.डी.पी.एस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले आणि चालक शेख यांनी ही यशस्वी कारवाई केली.
अमली पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलणार – पोलीस प्रशासन
जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. अशा कारवायांमुळे अमली पदार्थ तस्करांवर वचक बसणार असून, भविष्यातही अशा गुन्हेगारी कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
- 5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?
- जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार ! मार्चमध्ये सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा आदेश, कर्मचारी उपस्थित – विभाग प्रमुख मात्र गायब!!
- धाराशिव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका – जिल्हा आणि राज्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष