जिल्हा पुरवठा अधिकारीच तांदूळ अफरातफरीच्या सूत्रधार ?

0
35

जळजळीत बातम्या मिळमिळीत खुलासा

तांदूळ अफरातफरीत विचारलेले प्रश्न अनुत्तरीतच

धाराशिव – तांदूळ अफरातफरीच्या बातम्यांचे चार भाग छापल्यानंतर अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खुलासा केला असून चार जळजळीत बातम्या छापल्यानंतर मिळमिळीत खुलासा आल्याने आता या प्रकरणात शासनाने उच्च स्तरीय समिती स्थापन करावी तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल अन्यथा पुरवठा विभाग आणि त्यातील अधिकारी ‘हातावर तांदूळ देऊन पसार ‘ होतील.
पहिल्या भागात तुटीच्या आकड्यामागे मोठा घोटाळा असल्याचे म्हणले होते त्यात तेर सोबत पळसप येथे हा तांदूळ विकला गेल्याचे म्हटले होते त्यावर कुठलाही खुलासा केला नाही तसेच पोलिसांना तक्रार करताना पळसप चा उल्लेख देखील केला गेला नाही.

दुसऱ्या भागात आरोपी अलीम शेखच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते सहाय्यक पुरवठा अधिकाऱ्यांनी गोदामपालाच्या अहवालावरून गुन्हा दाखल केला त्यात अलीम शेख चा पूर्ण पत्ता, त्याचे वय याबाबत प्रश्न विचारले होते त्याबाबत देखील कुठलाच खुलासा केला गेला नाही.

तिसऱ्या भागात तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात असल्याचे म्हटले होते ज्या वाहनाने ही वाहतूक केली गेली त्या वाहनाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती का हा सवाल करण्यात आला होता त्याचेही उत्तर पुरवठा विभागाने दिले नाही.

चौथ्या भागात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, आर टी ओ आणि पोलीस यांची मिलीभगत असल्याचे म्हणले होते यावर पुरवठा विभागाने गाडीची माहिती कंत्राटदाराकडून घेऊन खुलासा करताना द्यायला हवी होती, पोलिस तपासाबाबत सुरू असलेल्या कारवाईबाबत सध्या काय सुरू आहे असे सांगणे अपेक्षित असताना त्याबाबत सांगितले न गेल्याने ही अफरातफर थोडी नसून मोठ्ठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तांदूळ अफरातफर आणि त्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा असलेला हात समोर आणायचा असेल तर उच्च स्तरीय समिती स्थापन करून जलदगतीने चौकशी करायला हवी.

नोव्हेंबर मध्ये पकडलेले वाहन कोण सोडले

यापुर्वी वाहतूकी दरम्यान धान्याची अफरातफर झाल्याची निदर्शनास आलेले नाही असा खुलासा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे मात्र नोव्हेंबर महिन्यात तुळजापूर तालुक्यात एक वाहन पकडले होते ते कोणी सोडले त्यात कोणी कोणी हात ओले करून घेतले याबाबत देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ए.सी.बी.च्या गुन्ह्याचं काय?

जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्यावर सांगली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे ते प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असले तरी अशी केस दाखल असताना जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा कार्यभार कसा मिळतो याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयाने खुलासा करायला हवा.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा दैनिक जनमत कडे खुलासा

प्रस्तुत प्रकरणात धाराशिव गोदामपाल यांनी भारतीय खादय निगम यांचे एम.एस.डब्ल्यू.सी.लातूर गोदामातून दि. १३/०२/२०२५ रोजी प्राधान्य योजनेचा तांदूळ धाराशिव गोदामाकरिता अतिरिक्त वाहन क्रमांक एमएच.४०-एन.७५१३ मध्ये भरणा करण्यात आलेला होता. सदर वाहन दि. १४/०२/२०२५ रोजी धाराशिव गोदाम येथे आल्याचे तसेच सदर वाहनातील धान्याची टी.पी. क्रमांक २८१६७ अन्वये ८.९४ क्विंटल (२१ कट्टे) इतके धान्य कमी आल्याचे या कार्यालयास त्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. तसेच सदर बाबत आपल्या वर्तमान पत्रातही मौजे तेर ता. धाराशिव येथे २५ ते ३० कटटे इतक्या धान्याची विक्री केलेबाबत बातमीही प्रसिध्द झालेली होती.

वाहन क्रमांक एमएच.४०-एन.७५१३ मध्ये वाहतूकी दरम्यान कमी आढळलेले धान्य ८.९४ क्विंटल च्या अफरातफर प्रकरणी दोषी संबंधिताविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ अंतर्गत पोलीस ठाणे ढोकी येथे प्रथम खबर अहवाल (एफ.आय.आर.) क्रं.००५० दि. १८/०२/२०२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.

यापुर्वी वाहतूकी दरम्यान धान्याची अफरातफर झाल्याची निदर्शनास आलेले नाही. प्रथमवेळी अफरातफर प्रकरणी शासन तरतुदीनुसार अपहारीत धान्याची किंमत बाजार भावाच्या दुप्पट दराने वाहतूकदाराकडून वसूल करणेबाबत तरतुद असल्याने सदर प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.

तसेच सदर वाहनाचे विमा, फिटनेस, पीयुसी नसलेबाबत आपण प्रसिध्द केलेल्या बातमीच्या अनुषंगाने शासन तरतुदीनुसार वाहन वापराबाबत वाहनाचा कर, विमा, प्रदुषण इ. बाबत शासनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास वाहतूक कंत्राटदार बांधील असल्याने सदर वाहनावर दंडात्मक कार्यवाही करणेबाबत परिवहन अधिकारी, धाराशिव यांना कळविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here