धाराशिव : पवनचक्की परिसरात दरोडा व चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून ५ आरोपींना अटक केली असून सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेगव्हाण शिवारात दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून मारहाण करत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ अंतर्गत संबंधित कलमान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की साहित्य चोरीचे अनेक गुन्हे घडले होते.
गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ३ वाहने व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीदरम्यान सुरक्षारक्षकांना धमकावण्यासाठी त्यांना मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीसांनी आरोपींकडून रोख रक्कम, तांब्याच्या तारा तसेच २ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ बोलेरो अशी वाहने जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४२ लाख रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
सुनिल कालिदार शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) आणि विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी). या टोळीतील इतर काही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बेंबळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, तसेच पोलीस कर्मचारी गणेश पाटील, शिवाजी भुतेकर, शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, नागनाथ गुख आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.
- पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद; ५ आरोपींसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
- तासगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी
- ना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आला ना शहरातील परिस्थिती बदलली, आ. राणाजगजितसिंह पाटील यांची सत्ता पहिल्या 100 दिवसात सपशेल अपयशी
- “प्रशासकीय मान्यतेतील घोडेबाजार?” आमदार कैलास पाटील यांच्या तक्रारीने आला चव्हाट्यावर
- महिला मुख्याधिकारी यांना त्रास देण्याचे काम विरोधकांचे, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत – जाकीर सौदागर
