धाराशिव – ( नरोटे आकाश)
एखादा प्रकल्प करणे शक्य नसतानाही त्याबाबत आश्वासन दिले जाते आणि ते पूर्ण न करता त्याच्या जागी नवे आश्वासन देण्याची किमया भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घडवून आणली आहे. त्यांचा गेम चेंजर प्रकल्प असणाऱ्या टेक्निकल टेक्सटाइल प्रकल्पावरून त्यांनी यू-टर्न घेतला असून तो आता इतरत्र होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यात टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजप आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा पुढे करत मतदारांचा पाठिंबा मागितला होता.
मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी टेक्निकल टेक्सटाईल प्रकल्प कौडगावऐवजी इतर ठिकाणी हलवण्याचे संकेत दिले असून, पूर्वीच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कौडगावसाठी आता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हबचे नवे आश्वासन पुढे करण्यात आले आहे.
आ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौडगाव एमआयडीसी येथे ग्लोबल फोर्ज कंपनीमार्फत सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन टीएनटी व प्रोपेलेंट उत्पादनाचा प्रकल्प उभारला जाईल. या माध्यमातून सुमारे 3000 रोजगार निर्माण होतील, असा दावा करण्यात आला आहे.
प्रेस नोटमध्ये या प्रकल्पाला “औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा” असे संबोधण्यात आले असून, भविष्यात 5000 एकरवर डिफेन्स हब उभारण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. तसेच नेपियर गवतावर आधारित कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
मात्र या नव्या घोषणांबाबतही अनिश्चितता कायम आहे. संबंधित प्रकल्पासाठी अधिकृत सामंजस्य करार (MoU) झाल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
यामुळे टेक्निकल टेक्सटाईल पार्कप्रमाणेच डिफेन्स प्रकल्पही सध्या कागदावर असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे मोठ्या गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे दावे केले जात असताना, दुसरीकडे ठोस करार, कालमर्यादा आणि अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
एकूणच, टेक्सटाईल पार्कपासून डिफेन्स हबपर्यंत आश्वासनांची मालिका सुरू असली, तरी प्रत्यक्षात प्रकल्प कितपत साकारतील, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे. मात्र विकासासाठी भारतीय जनता पार्टीत गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना रोजगार मिळवून देणारे प्रकल्प आणण्यात यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.
- टेक्सटाईल पार्कवरून आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा यू -टर्न?;
कौडगावसाठी डिफेन्स हबचे नवे आश्वासन, जुन्या बाटलीत नवी दारू! - पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद; ५ आरोपींसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
- तासगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी
- ना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आला ना शहरातील परिस्थिती बदलली, आ. राणाजगजितसिंह पाटील यांची सत्ता पहिल्या 100 दिवसात सपशेल अपयशी
- “प्रशासकीय मान्यतेतील घोडेबाजार?” आमदार कैलास पाटील यांच्या तक्रारीने आला चव्हाट्यावर
