धाराशिव, दि. २५ (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या शेतवस्तीवरील घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. या कारवाईत सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे आपल्या पत्नीसमवेत घरासमोर झोपले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला चढवला. आरोपींनी जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
घटना अंधारात घडल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. तरीही पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी भुम विभागाचे चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डोकेवाडी शिवारात सापळा रचून आरोपींना वेढा घालत शिताफीने अटक केली. अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये किरण पंडित शिंदे (रा. अनाळा), राघवा निवांत्या शिंदे (रा. अनाळा), ज्ञानेश्वर लिग्या काळे (रा. हिवडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी), सुनील प्रकाश भोसले (रा. अंजनसोंडा), चेतन किरण शिंदे (रा. अनाळा) व सुनील चरण शिंदे (रा. अनाळा) यांचा समावेश आहे.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण सुमारे १.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
