धाराशिव – जिल्हा प्रशासनाच्या ‘हरित धाराशिव’ या महत्वाकांक्षी अभियानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच, नगरपरिषद क्षेत्रांतील उदासीनतेमुळे संपूर्ण मोहिमेच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील २९४ प्रस्तावित वृक्षारोपण स्थळांपैकी केवळ २६२ ठिकाणांचेच माती परीक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित ३२ ठिकाणांचे परीक्षण प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात धाराशिव, कळंब, मुरुम आणि वाशी या महत्त्वाच्या शहर वगळता इतरांनी माती परीक्षण केले नसल्याची माहिती आहे. शहरी भागांमध्ये शुद्ध प्राणवायूची गरज अधिक असूनही त्यांनीच या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, तहसील कार्यालय तुळजापूर आणि सीना-कोळेगाव धरण परिसरातील एकूण २९४ ठिकाणी घनदाट वृक्षारोपण केले जाणार आहे. १९ जुलै रोजी एकाच दिवशी हे वृक्षारोपण पार पडणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दोन महिन्यांपूर्वीच या अभियानासाठी विशेष पाठपुरावा सुरू केला होता. तसेच ३ ते ९ जुलैदरम्यान जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळेला सर्व ठिकाणांची माती तपासण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत काही नगरपालिका क्षेत्रांनी माती परीक्षणास सहकार्यच केले नाही. परिणामी, वृक्ष लागवडीपूर्वीची एक अत्यावश्यक शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यावरून संबंधित यंत्रणांची मानसिकता स्पष्ट होते. विशेषतः जिथे प्रदूषण अधिक आहे, अशा शहरी भागांतच माती परीक्षण केले गेले नाही, हे अधिक चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींनी मात्र योग्य प्रतिसाद देत ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे.
माती परीक्षणामध्ये सामू, क्षारता, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कार्बन या घटकांची चाचणी करण्यात आली. चाचणी झालेल्या २६२ ठिकाणी अहवाल सकारात्मक आल्याने वृक्ष लागवडीस पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र उर्वरित ठिकाणांबाबत निश्चित निष्कर्ष नसल्यामुळे वृक्ष लागवडीचा यशस्वीपणा अनिश्चिततेत आहे.
दरम्यान, वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचाही यावर ठाम भर असून, या विषयात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असे प्रशासनाचे धोरण आहे. परंतु ज्या यंत्रणांनी माती परीक्षणासारख्या प्राथमिक टप्प्यालाच गांभीर्याने घेतले नाही, त्या संगोपनाचे कार्य किती मनापासून करतील, याबाबत शंका उपस्थित होत आहेत.
या विषयावर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, संपूर्ण जिल्ह्याचा सहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वृक्ष लागवड होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सुत्रांनी सांगितले. ‘हरित धाराशिव’ उपक्रमाची विश्वासार्हता आणि परिणामकारकता जपण्यासाठी या त्रुटी तातडीने दूर करणे काळाची गरज ठरत आहे.