धाराशिव बसस्थानकातील लाचप्रकरणी विभागीय स्थापत्य अभियंता रंगेहाथ अटक

0
265

धाराशिव – शहरातील बसस्थानक जागा ताब्यात देण्यासाठी आणि कँटीनच्या शटरविषयी तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या विभागीय स्थापत्य अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवार, २२ जुलै रोजी करण्यात आली.

तक्रारदार गुत्तेदार असून, त्यांना धाराशिव बसस्थानकात वाहनतळ जागा वाटप करण्यात आली होती. सदर जागेचा ताबा देण्यासाठी आणि बाजूच्या कँटीनच्या पार्किंगकडील शटरबाबत लाच मागणी केल्याचा आरोप विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत अरुण उबाळे (वय ४९, रा. अंत्रोळीनगर, होडगी रोड, सोलापूर) यांच्यावर आहे.

या प्रकरणात तक्रारदाराने दिनांक १८ जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पडताळणी केली असता, आरोपीने पंचांसमक्ष डी.सी. साहेबांसाठी ५ हजार रुपये आणि स्वतःसाठी ४ हजार रुपये अशी एकूण ९ हजार रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने २२ जुलै रोजी सापळा रचून धाराशिव बसस्थानकाच्या आवारात आरोपी शशिकांत उबाळे यांना तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ९ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून लाच रक्कमेसह मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईनंतर आरोपीच्या सोलापूर येथील घराची झडती घेण्यासाठी लाप्रवि पथक तात्काळ रवाना झाले असून, झडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करून पुढील तपास केला जाणार आहे.

या प्रकरणी आरोपीचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून त्याचे डिजिटल विश्लेषण करून अधिक माहिती घेतली जाणार आहे. आरोपीवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातील मा. महाव्यवस्थापक (बांधकाम) यांच्याकडे आहेत.

सदर सापळा कारवाई पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये पोलीस अंमलदार नरवटे, तावसकर, हजारे, काझी यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (लाप्रवि, संभाजीनगर परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे आणि पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here