धाराशिव शहरातील घरफोडी प्रकरणातील सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून दोन तोळे आठ ग्रॅम वजनाचे, 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिस ठाणे धाराशिव शहर येथे दाखल असलेल्या गुन्हा क्र. 346/2025 भा.न्या.सं. कलम 331(4), 305 अन्वये घरफोडी प्रकरणात तपास सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, आणि इतर कर्मचारी यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. आयकर युनिटचे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, आणि पोह. मनोज जगताप यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे परसु लक्ष्मण चव्हाण, रा. जुना बसडेपो पाठीमागे, पारधी पिढी, धाराशिव याला शिवाजी चौकात अटक करण्यात आली. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घरफोडी प्रकरणात त्याचा चुलता दत्ता बाबु चव्हाण सहभागी असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून तेच मुद्देमाल असल्याची कबुली आरोपीने दिली. दागिने विकण्यासाठी तो बाहेर पडल्याचेही त्याने सांगितले.
गुन्ह्याचा तपास आणि मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी आजीमोद्दीन उमराव शेख यांनी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आभार मानले आहेत. या प्रकरणामुळे ‘पोलीस काही करत नाहीत’ हा गैरसमज दूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. या पथकात सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, आयकर युनिटचे सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, पोह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोना बबन जाधवर, पोह. मनोज जगताप, चालक महेबुब अरब, पोअं. प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.