भुम शहरात ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी लागू — आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

0
399

धाराशिव | ३० जुलै २०२५
भुम शहरातील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात ३१ जुलैपासून ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भुम शहरात दरवर्षीप्रमाणे मातंग समाजातर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते. मात्र यंदा मातंग समाजाचे तीन गट समाज मंदिरासमोरच कार्यक्रम घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्यात मतभेद व तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने सर्व गटांना समजावून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले होते, परंतु ते निष्फळ ठरल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली.

या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक, भुम यांच्या शिफारसीनुसार व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आण्णाभाऊ साठे नगरमधील मातंग समाज मंदिराच्या ३० मीटर परिघात चार किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे.

कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

हा आदेश आज, ३० जुलै रोजी अधिकृतरित्या लागू करण्यात आला असून तो संबधित परिसरात लागू राहील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here