तुळजापूरातील ब्रह्मदेव मूर्ती दुभंगल्याप्रकरणी संताप: हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी – दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा!

0
224

धाराशिव – श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मंदिर विकास आराखड्याच्या नावाखाली प्राचीन ब्रह्मदेव मूर्तीच्या दुभंगण्याच्या घटनेने धार्मिक वातावरण ढवळून निघाले असून, समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक  सुनील घनवट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पत्रकार परिषदेत शासन व प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर सडकून टीका करण्यात आली.

प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात सध्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. मात्र या कामाच्या दरम्यान पुरातन उपदेवता असलेल्या श्री ब्रह्मदेव मूर्तीची निर्बंध न पाळता केलेली हालचाल आणि त्यामुळे ती मूर्ती दुभंगल्याचा प्रकार घडला आहे. मंदिर परिसरातील १३ उपदेवतांच्या मुर्त्या हलवण्यात आल्या आहेत.या निष्काळजीपणाच्या घटनेमुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना प्रखरपणे दुखावल्या आहेत. गेली अडीच महिने तक्रारी करूनही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने विविध संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्रकार परिषदेत महंत मावजीनाथ महाराज, इच्छागिरी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी,  परिक्षीत साळुंखे यांसह अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.

सुनील घनवट यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:

  • ब्रह्मदेव मूर्ती आधीपासूनच दुभंगलेली होती हा दावा चुकीचा आहे; ती मूर्ती पूर्वी अखंड होती, याचे लेखी-छायाचित्रीय पुरावे आहेत.
  • मूर्ती हलवताना विधी न करता चुकीची पद्धत वापरली गेली. स्थानदेवतांच्या कुलाचाराआधी मूर्तींचा कुलाचार अपेक्षित होता.
  • मूर्ती दुभंगल्याची माहिती दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
  • जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष असूनही त्यांनी निष्क्रियता दाखवली आहे.
  • मूर्तीची नोंद नसल्याचे तहसीलदारांचे विधान दिशाभूल करणारे आहे; त्यांना तिथे राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित केला.
  • विकास आराखड्यात कुलाचारासाठी जागा राखलेली नाही, स्थानिकांच्या सूचना दुर्लक्षित केल्या.

संत महंत व पुजाऱ्यांची प्रतिक्रिया:

महंत मावजीनाथ महाराज यांनी ब्रह्मदेव मूर्तीच्या बाहेर नेण्याच्या कृतीचा निषेध केला. अमरराजे कदम यांनी प्रशासनाने ब्रह्मदेव मूर्तीची नोंद न ठेवल्याची कबुली दिल्याचे सांगत, हे मूळ परंपरेवर आघात असल्याचे नमूद केले. किशोर गंगणे यांनी विकासकामांबाबत आक्षेप असूनही त्यांच्या सुनावण्या घेण्यात न आल्याचा आरोप केला.

मागण्या:

  • दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
  • जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक पुजारी मंडळ, धार्मिक संघटना व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी.
  • मंदिर विकास आराखड्यात पारदर्शकता ठेवावी; लेखी दस्तऐवज जनतेपुढे यावा.
  • धर्मशास्त्रज्ञ, धर्माचार्य व शंकराचार्य पिठांचे मार्गदर्शन घ्यावे.
  • पारंपरिक वंशपरंपरागत धार्मिक कृतींसाठी स्वतंत्र जागा राखून ती आराखड्यात स्पष्ट करावी.
  • मूळ मंदिर रचना कायम ठेवून कोणताही ऐतिहासिक, धार्मिक किंवा वास्तुविश्वास भंग होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी.

या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर महासंघ, श्री तुळजापूर संरक्षण कृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना व स्थानिक ग्रामस्थांतर्फे शासनाला अल्टीमेटम देण्यात आले असून, यापुढेही दुर्लक्ष झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here