वृक्ष लागवड मोहिमेत शहरातील १२ शाळांतील १,७६५ विद्यार्थी, १६३ शिक्षक व १६० महिलांचा सहभाग
पर
परंडा, १९ जुलै – महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.
या अभियानांतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजता जामगाव रोडवरील हजरत खाजा बद्रोद्दिन दर्गा परिसरात घनवन पद्धतीने वृक्ष लागवड सुरू झाली. मोहिमेत शहरातील १२ शाळांमधील १,७६५ विद्यार्थी, १६३ शिक्षक, तसेच १६० महिला बचत गट सदस्यांनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जिल्हा परिषद सभापती दत्ता साळुंके, तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, नगरसेवक वाजिद दखनी, सर्फराज कुरेशी, रत्नकांत शिंदे, जावेद पठाण, संजय घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा नगरपरिषद, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी एकत्रित येऊन ही भव्य वृक्ष लागवड मोहीम राबवली.
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या सर्व सहभागींचे मुख्याधिकारी वडेपल्ली यांनी आभार मानले.