पालकमंत्री बदलण्याचं पत्र दिल्याचं सपशेल खोटं तर मित्रा सीईओंच्या दौऱ्याबाबत गुप्तता का?

0
377

धाराशिव (आकाश नरोटे)- १५ लाख वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आ. राणाजगजितसिंह पाटील एकत्र एका व्यासपीठावर आले कार्यक्रम शांततेत पार देखील पडला मात्र पालकमंत्री बदला असे पत्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती त्याबद्दल थेट प्रश्न शेवटी पत्रकारांनी विचारलाच आणि त्यावर आ. पाटील यांनीच स्पष्ट केले की हे सपशेल खोटं आहे. मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भाषणातील काही मुद्दे खटकण्यासारखे होते ते असे म्हणाले की मी धाराशिव मध्ये आलो की वृक्षारोपण केलेल्या ठिकाणाला आवर्जून भेट देणार, इथे भेट देऊन पुढे जाणार हे वाक्य साधे वाटत असले तरी मी पालकमंत्रिपद सोडणार नाही याबाबत त्यांनी ठाम भूमिका यातून मांडली असल्याचे स्पष्ट होते.
तत्पूर्वी गत शनिवारी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचा दौरा झाला त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे, ते मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असताना त्यांचा दौरा माध्यमांना कळू न देणे ही साधी गोष्ट नाही मात्र तुळजापूर मध्ये झालेल्या त्या बैठकीत ते अर्धा ते पाऊण तास होते त्यानंतर त्यांनी बैठक सोडली ती का सोडली याचे उत्तर बैठकीत बसलेल्या व्यक्तींनी आणि प्रशासनाने द्यायला हवे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या निमित्ताने ही बैठक होती त्यात तुळजाभवानी संस्थान च्या अंतर्गत सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा झाली आराखड्यातून ते काम व्हावे यावर काही तरी बिनसल्याचे बोलले जात आहे. त्याच्या एक दोन दिवसांनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा  तुळजापूर दौरा झाला या दौऱ्याबाबत देखील गुप्तता पाळण्यात आली. पत्र दिल्याचं सपशेल खोटं असलं असे आ. राणाजगजितसिंह पाटील सांगत असले तरी गेल्या आठवड्याभरात झालेल्या घडामोडी सारं काही आलबेल असल्याचे दर्शवत नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती अजूनही उठवण्यात आलेली नाही, राजकीय कुरघोड्या देखील थांबलेल्या नाहीत. पालकमंत्री बदला या पत्राबाबत चर्चा थांबली असली तरी तुळजापूर विकास आराखडा आणि त्या संदर्भात होत असलेल्या घडामोडी आणि शिवसेनेकडे असलेले पालकमंत्रिपद याचं थेट कनेक्शन असल्याने कुरघोड्या आणि राजकारण सुरूच राहील यात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कितपत लक्ष देतात यावरच सारे काही अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here