पार्वती मल्टीस्टेट घोटाळा : ठेवीदारांच्या पैशासाठी संघर्ष सुरूच राहणार – अनिल जगताप

0
121

धाराशिव : पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या विविध शाखांमार्फत उच्च व्याजाचे आमिष दाखवून झालेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात ठेवीदारांनी लढ्याचा निर्धार केला आहे. शनिवारी लोहारा आणि उमरगा तालुक्यातील ठेवीदारांची बैठक आष्टामोड येथे पार पडली. यावेळी ठेवीदारांनी आपली व्यथा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या समोर मांडली.

सोसायटीच्या लोहारा, सास्तूर, तुरोरी, उमरगा, येणेगूर, सालेगाव शाखांमधून १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांची फसवणूक झाली. काहींनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिवकडे तपास सुरू आहे.

या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने उमरगा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात १६२ ठेवीदारांची सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम परत न दिल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांची संख्या ३५० पेक्षा जास्त असून, एकूण फसवणूक १० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बैठकीनंतर अनिल जगताप यांनी ठेवीदारांना आश्वासन दिले की, “रुपयाल ना रुपया मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.” ते पुढे म्हणाले, “कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली जाईल. सरकारी वकीलासोबत ठेवीदारांकडून स्वतंत्र वकील नेमून बाजू भक्कमपणे मांडली जाईल. सहकार विभाग, रिझर्व्ह बँक व जिल्हा प्रशासनाकडेही मालमत्ता जप्ती व परतफेडीसाठी पाठपुरावा केला जाईल.”

या घोटाळ्यात काही संचालकांना अटक झाली असली, तरी काहीजण अटकपूर्व जामीन मिळवून मोकळे फिरत आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करत जगताप यांनी अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत ठेवीदारांनी एकमताने ठरवले की, न्याय मिळण्यास विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अनिल जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

पार्वती मल्टीस्टेटमध्ये ठेव असलेल्या ९० टक्के ठेवीदारांचा शेतकऱ्यांमध्ये समावेश असून, त्यांच्या कष्टाच्या पैशांची झालेली फसवणूक लक्षात घेता परिसरात संताप व्यक्त होत आहे. आगामी काळात या प्रकरणात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here