Home Blog Page 9

वाशी तालुक्यातील फक्राबाद गावात शिरले मांजरा नदी पुराचे पाणी


वाशी (प्रतिनिधी):
वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा मांजरा नदीला आलेल्या महा भयंकर पुरामुळे संपर्क तुटला असून मोबाईल द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फक्राबाद गावातील सहा घरांत पाणी शिरले असून प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणाशीही संपर्कात नाहीं. त्यामुळे फक्राबाद गावातील नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जीव मुठीत धरून हे नागरिक आपल्या कुटुंबासमवेत गावात राहत आहेत.लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे संपन्न

वाशी (प्रतिनिधी):
महिला सशक्तीकरण साठी स्वस्थ नारी सशक्त परिवार या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास सर यांच्या सूचनेप्रमाणे वाशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ महिंद्रकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 19 सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार शिबीर चा शुभारंभ अंगणवाडी पर्यवेक्षिका मुरकुटे मॅडम, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ शिंदे सर, बालरोगतज्ज्ञ डॉ सूळ सर, दंतचिकित्सक डॉ देवगिरे मॅडम या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला, यावेळी नेत्र चिकित्सक श्री गायकवाड उपस्थित होते.
या शिबीर अंतर्गत महिलांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी महिलांचे विविध आजार, गरोदर माता तपासणी, बालकांची तपासणी, बालकांचे लसीकरण,दातांची तपासणी, डोळयांची तपासणी, महिला व एकात्मिक बालविकास च्या माध्यमातून अंगणवाडी सेविका यांनी पोषण आहाराबाबत सर्व रुग्णांना माहिती दिली, प्रा आ केंद्र प्रयोगशाळा अंतर्गत HB, मधुमेह तपासणी व महालॅब मार्फत सिकलसेल व इतर आरोग्य तपासन्या करण्यात आल्या.
टीबी आजाराविषयी जनजागृती तसेच बेडका तपासणी करण्यात आली,आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत मोबाईल मेडिकल व्हॅन च्या माध्यमातून एक्सरे काढण्यात आले.एकूण 210 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शिवानी पाटील मॅडम, डॉ किलचे सर यांनी या शिबीर साठी मोलाचे परिश्रम घेतले.वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,औषध निर्माण अधिकारी, वाहन चालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, महालॅब तंत्रज्ञ, गट प्रवर्तक, आशा कार्यकर्ती, अर्धवेळ स्त्री परिचर, पु परिचर, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

वाशी, दि. १७ (प्रतिनिधी) – भूम पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर पैशाच्या मोबदल्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पुढील तपासात आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ईट–जातेगाव रोडवर किनारा हॉटेलजवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर (वय ३९, रा. पाटोदा, जि. बीड) व त्यांचे सहकारी रविंद्र राख हे बोलेरो गाडीतून जात असताना चार अनोळखी इसमांनी गाडी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९०/२०२५ भा. न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ११८ (१), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सलमान पठाण (रा. भूम) व रितेश अंधारे (रा. हाडोंगरी) या दोघांना येरमाळा उड्डाणपुलाजवळून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पैशाच्या मोबदल्यात हा हल्ला केल्याची कबुली दिली तसेच इतर साथीदारांची नावेही सांगितली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे व प्रकाश बोईनवाड यांनी सहभाग घेतला.

ही धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक  रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पालकमंत्र्यांच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांचा खो

तुळजापूर विकास आराखडा : प्रशासनाच्या भूमिकेवर संशय

धाराशिव – तुळजापूर विकास आराखड्याबाबतची गोंधळलेली स्थिती अजूनही कायम असून यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या आदेशालाच खो दिल्याचे समोर आले आहे.

15 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना स्पष्ट निर्देश दिले होते – “सात दिवसांच्या आत नागरिकांना विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन दाखवा आणि बैठक घ्या.” मात्र 16 सप्टेंबरपर्यंत अशी कोणतीही बैठक घेतली गेली नाही. परिणामी, पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

स्थानिक नागरिक धीरज कदम पाटील यांनीही याची पुष्टी करत सांगितले की, “आम्हाला अजूनपर्यंत प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बोलावले गेलेले नाही.”

याआधी नागरिकांनी विकास आराखड्याचे प्रेझेंटेशनच दाखवले गेले नसल्याची तक्रार केली होती. आता उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानंतर पालकमंत्री सरनाईक स्वतः याची चौकशी करतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी होणारी बैठक तुळजापूर विकास आराखड्याच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

15 ऑगस्ट च्या बैठकीत काय घडलं होतं याबाबत थोडक्यात…

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.

विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.


तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.


या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.


पालकमंत्री  प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हा दौरा

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक येत्या १५ ते १७ सप्टेंबर २०२५ दरम्यान पुणे, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकासकामांचे उद्घाटन, पाहणी आणि बैठका घेणार आहेत.

१५ सप्टेंबर: पुणे जिल्हा दौरा
मा. मंत्री सरनाईक यांचा दौरा सोमवारी, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लोणावळा बस स्थानक (MSRTC), पुणे येथून सुरू होईल. येथे ते बस स्थानकाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता खाजगी वाहनाने (MH-04-MP-7578) चाकण (MIDC), ता. खेड येथे रवाना होतील. दुपारी ११:४५ वाजता चाकण येथील मर्सिडीज बेंझ कंपनीला सदिच्छा भेट देऊन ते चर्चा करतील. यावेळी श्री. सत्यजीत पाटील (मो. ९७३०८१११००) उपस्थित राहतील. दुपारी १:३० वाजता ते VVIP सर्कीट हाऊस, पुणे येथे पोहोचतील आणि दुपारी २ वाजेपर्यंत विश्रांती घेतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचून रात्रीचा मुक्काम करतील.

१६ सप्टेंबर: सोलापूर आणि धाराशिव दौरा
मंगळवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठक होईल. दुपारी १:१५ वाजता ते तूळजापूर, जि. धाराशिव येथे रवाना होतील आणि दुपारी २:१५ वाजता तुळजाभवानी मंदिर, तूळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या तयारीची पाहणी आणि आढावा बैठक घेतील. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. सायंकाळी ५:३० वाजता ते धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील आणि सायंकाळी ६ वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. रात्री ९ वाजता याच ठिकाणी मुक्काम करतील.

१७ सप्टेंबर: धाराशिव जिल्हा दौरा
बुधवारी, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८:२५ वाजता मा. सरनाईक शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ८:४५ वाजता ते “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन” समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे “उम्मीद निदान केंद्र” आणि “रक्त साठवण केंद्र” यांचे उद्घाटन करतील. यावेळी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र द. चौहान (मो. ७५८८६९३०३२) उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे “४५ मीटर ध्वज” उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (मो. ९६०४३४६४६१) उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता ते धाराशिव येथून समृद्धी महामार्गामार्फत (धाराशिव-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे) ठाणे येथील निवासस्थानाकडे रवाना होतील आणि रात्री ९ वाजता तिथे पोहोचतील.

१५ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण: आरोपी अटकेत, पीडितेची सुखरूप सुटका

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५ (प्रतिनिधी) : उसतोड कामगाराच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त आणि तांत्रिक तपास करून आरोपी आणि पीडित मुलीला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाली.

घटना १८ मार्च २०२४ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी उसतोड कामगाराने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली की, संशयित सुनिल लक्ष्मण धोत्रे याने त्यांच्या १५ वर्षीय मुलीला अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेले. यावरून २३ मार्च २०२४ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ (अपहरण) आणि ३७० (मानवी वाहतुक) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला वाशी पोलिसांनी तपास हाती घेतला. नंतर, १८ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस अधीक्षक धाराशिव यांनी हा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलिस हवालदार नदाफ, पोलिस हवालदार केवटे आणि पोलिस नाईक माने यांचा समावेश होता. पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी आणि पीडितेचा ठावठिकाणा शोधला. अहिल्यानगर शहरात दोघे असल्याची खात्री झाल्यानंतर, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पथकाने कारवाई करून आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रेला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. दोघांनाही वाशी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सध्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे, आणि पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय व मानसिक आधार दिला जात आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.

माऊलीच्या ट्रेंड ने भाजपमध्ये अस्वस्थता!

धाराशिव (Aakashh Natote)- जिल्ह्यात निवडणुका म्हणलं की राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा होते. मात्र राज्यात आणि देशात सत्तेत असलेली भाजपा आता पाटीलमय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने पाटील परिवार समर्थकांनी त्यांच्या अनॉफिशियल सोशल मीडियावर माऊली होणार जिल्हा परिषद अध्यक्ष अश्या पोस्ट टाकून नवा ट्रेंड सुरू केला हाच ट्रेंड इमानेइतबारे तळागाळापर्यंत काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. लोकसभेला पाटील कुटुंबियांसाठी काम केले, विधानसभेला पुन्हा पाटील कुटुंबियांसाठी काम केले आणि आता जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याच साठी काम करावे लागेल का? भाजप नवख्या आणि काम करणाऱ्यांना संधी आहे की नाही या विचाराने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी दावेदार?

माऊली ही बिरुदावली अर्चना पाटील यांना त्यांचे समर्थक वापरतात. सर्वसाधारण महिला यासाठी अध्यक्षपद असल्याने त्या अध्यक्ष व्हाव्यात अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. आता त्यांना अध्यक्षपदी बसविण्याचे स्वप्न पाटील परिवार समर्थक पाहत आहेत.

अर्चना पाटील नेमक्या कुठे?

अर्चना पाटील यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. मात्र त्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. भाजपच्या राजकीय मंचावर देखील त्यांना त्यानंतर फारसे पाहिले गेले नसल्याने त्या नेमके कोणत्या पक्षात आहेत हे स्पष्ट नाही

घराणेशाही चा आरोप

पाटील कुटुंबीयांवर त्यांचे विरोधक घराणेशाहीचा आरोप करतात लोकसभेला त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट दिल्याने त्या आरोपांना अधिकच धार मिळाली मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट दिले आणि अध्यक्षपदावर दावा केला तर भाजप घराणेशाहीला बळ देते या आरोपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मद्यप्राशन केल्याचा संशय जिल्हा परिषदेतील ९ कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी

धाराशिव – जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आज सकाळी अचानक ९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित आरोग्य तपासणी नसून थेट ब्रीद ॲनालायझर टेस्ट घेण्यात आली होती.

शिक्षण विभागात काही कर्मचारी कर्तव्यावर असतानाच मद्यप्राशन करून कार्यालयात हजर होत असल्याचा संशय व्यक्त होत होता. यामुळे कामकाजात शिस्तभंग, कुचराई व शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार संबंधित विभाग प्रमुखांकडे आली होती. अखेर विभाग प्रमुखांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन संबंधित कर्मचाऱ्यांची एकामागून एक श्वासाद्वारे तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व नऊ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तथापि, शासकीय कर्तव्यावर असताना दारू सेवन करण्याची हिम्मत करणाऱ्यांना या तपासणीमुळे धडा शिकविण्यात आला आहे, असे प्रशासनातील जाणकारांचे म्हणणे आहे.

अलीकडेच परंडा तालुक्यात एका शिक्षकाने शाळेतच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने त्याला निलंबित केले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हा परिषदेतील आजची कारवाई ही केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, “कर्तव्यावर असताना कुठलाही शासकीय कर्मचारी दारू सेवन करून आला तर त्याच्यावर कडक शिस्तभंगात्मक कारवाई होणार” असा संदेश प्रशासनाने या निमित्ताने दिला आहे.

हायवेवरुन जाणाऱ्या वाहनावर चढुन चोऱ्या करणाऱ्या टोळीस  स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

धाराशिव : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत सहा सराईत दरोडेखोरांना जेरबंद केले. हे आरोपी हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर चढून मालाची चोरी करत होते. शनिवारी (दि. ८ सप्टेंबर) हेच आरोपी येडेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत तब्बल ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींपैकी तिघांवर पुण्यातील ५० लाखांच्या दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाढली खबरदारी
तेरखेडा येथे हायवेवरून जाणाऱ्या ट्रकवर काही चोरटे चढून माल लुटत असल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत  पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी स्थानिक गुन्हे शाखेला शोधमोहीमेचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्तीस रवाना झाले.

गोपनीय माहिती आणि कारवाई
येरमाळा येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पाटी ते येडेश्वरी मंदिर रस्त्यावर एक स्कॉर्पिओ गाडीत संशयित थांबले होते. ते भाविकांची वाहने आडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे कळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

संध्याकाळी साधारण ५.५० वाजता पोलिसांनी कारवाई केली असता दोन आरोपी गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. उर्वरित आरोपींना गाडीतूनच ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. अमोल नाना काळे (२८)
  2. किरण बापु पवार (२५)
  3. दत्ता दादा काळे (२१)
  4. गणेश नाना काळे (३२)
  5. सुभाष तानाजी काळे (२४)
  6. शिवा रामा पवार (२२)
    (सर्व राहणार तेरखेडा)

मुद्देमाल जप्त
गाडीची तपासणी केली असता दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल फोन आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालासह येरमाळा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

पुण्यातील दरोड्याशी संबंध
तपासात समोर आले की, अटक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी व त्यांच्याकडील स्कॉर्पिओ वाहन पुणे शहरातील आंबेगाव पोस्टे हद्दीत झालेल्या तब्बल ५० लाखांच्या दरोड्याच्या गुन्ह्यात वांछित आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे पुणे पोलिसांनाही महत्त्वाचा धागा लागला आहे.

ही कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, विनायक दहिहंडे व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

ड्रग्स प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र

धाराशिव – तुळजापूर शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, या सगळ्या काळात वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता मुदतवाढ देण्यात आली. “ज्याच्या कार्यकाळात ड्रग्जचा सुळसुळाट झाला, त्याच अधिकाऱ्याकडे तपास ठेवणे म्हणजे लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे आहे,” अशा शब्दांत खासदारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

खासदार राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ९ सप्टेंबर रोजी थेट पत्र पाठवून या मुदतवाढीला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यात त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील कारवाईतील त्रुटींवर बोट ठेवले असून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

राजेनिंबाळकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ड्रग्ज रॅकेटमधील अनेक आरोपींना जामीन मिळाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. याउलट, आरोपींपैकी एका व्यक्तीचा राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सत्कार केल्याची गंभीर बाब त्यांनी उघड केली. त्यामुळे सरकारची नीयत संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

खासदारांच्या चार प्रमुख मागण्या

  1. ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करून मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी.
  2. आरोपीचा सत्कार करणाऱ्या मंत्र्यांवर नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.
  3. डीवायएसपी निलेश देशमुख यांना दिलेली मुदतवाढ रद्द करून त्यांची बदली करावी.
  4. संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवावा.

राजकीय भेद विसरून या गंभीर प्रकरणात कठोर आणि निःपक्ष कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा राजकीय व प्रशासनिक गुंता आणखी गडद झाला आहे.