Home Blog Page 92

दैनिक जनमत ०७ मे २०२३ E paper

 

दैनिक जनमत ०६ मे २०२३ E paper

 

११ मे रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा धाराशिव दौरा

 


धाराशिव –
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे दि. ११ मे रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील व माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे भारतीय जनता पार्टीला मोठे यश लाभले असून धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षांच्या  भव्यदिव स्वागताला सज्ज असल्याचा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक 11 मे रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर  येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठीची बैठक आज जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यालयात पार पडली.या दौऱ्यात मा.प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन, बाईक रैली, सामाजिक मेळावा, सरपंच लोकप्रतिनिधी मेळावा,सोशल मिडिया बैठक याबाबत पुर्वनियोजन करण्यात आले. बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, युवा वॉरीयर्स, सर्व आघाडी व कार्यकारिणी यांच्यासोबत ते बैठका घेणार आहेत. 

बैठकीच्या सुरूवातीला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, तसेच जिल्ह्यातील प्रदेश कार्यकारिणी मध्ये समावेश झालेल्या सौ. अस्मिता कांबळे, अनिल काळे, मकरंद पाटील या पदाधिकाऱ्यांचा व बाजार समिती निवडनुकीत विजयी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी जिलाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चा जिलाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे राजकुमार पाटिल, राजाभाऊ पाटिल, अजीत पिंगळे. महादेव वाडेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह बाजार समितीचे नवनियुक्त संचालक तसेच पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन पांडुरंग पवार यानी केले.

जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा

 राज्यस्तरीय वकिल परिषदेत न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत

 धाराशिव, दि. 5 –

न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक काळातील साधणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून काम करणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेच्यावतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकिल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाणा, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा, माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, सर्व कायद्यांची भूमि असलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे आपला देश एकसंघ आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे अजूनही न्यायालय नाही. डॉ. आंबेडकर यांच्या वकिली व्यवसायाला 3 एप्रिलला शंभरी पूर्ण झाली. देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. याचेच औचित्य साधून न्यायव्यवस्थेत सकारात्मक आणि आधुनिकता आणली जात आहे. राज्यातील कोल्हापूर येथे खंडपीठाची निर्मिती आणि डॉ. आंबेडकर यांच्या गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे न्यायालय सुरू होण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, असे नमुद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी धाराशिवच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत वकिल परिषद घेण्याचा मान बार कौन्सिलला मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. जयंत जायभावे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यातील 14 ज्येष्ठ विधीज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेच्यावतीने 384 विधीज्ञ मंडळांतील वकिलांना ई-फायलिंगची अडचण दूर करण्यासाठी देण्यात येणार्‍या संगणक संचाचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास राज्यातील जवळपास दोन हजार वकिल बांधव उपस्थित होते.

शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचावा

न्याय सर्वांसाठी या तत्वाला साजेसे काम न्यायव्यवस्थेतील सर्व घटकाकडून अपेक्षित आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याला आधुनिकतेची जोड म्हणून ई-फायलिंगचा पर्याय अंमलात आला आहे. त्यामुळे याचा फायदा न्यायापासून वंचित असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला होणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञानाचा नकारात्मक वापर निरर्थक

समाजात तंत्रज्ञानाचा चांगल्या आणि चुकीच्या गोष्टींसाठी वापर होत आहे. दुर्दैवाने चुकीच्या गोष्टीसाठी याचा अधिक वापर होत आहे. परिणामी मानवी बुध्दीमता कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापराने अधिक कमकुवत होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वाईट वापर होत असल्यामुळे गूगलचे सहसंचालक डॉ. हिन्टेन यांंना राजीनामा द्यावा लागला. तर सकारात्मक बाबतीत स्वातंत्र्य संग्रामाचा लढा अधिक विस्ताराने मांडण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली असती तर ती अधिक विस्ताराने आणि नवीन माहितीच्या आधारे मांडता आली असती. परंतु आजही स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याबाबत लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रत्येक आवृत्तीत तोच मर्यादीत मजकूर आढळतो आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी, बुध्दीमत्तेच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले.

वडापाव चा शोध कोणी लावला?

 

वडापाव अनेकांसाठी भूक भागवण्यासाठीचा पदार्थ तर आहेच सोबत तो अनेकांना रोजगार देखील देत असतो. महाराष्ट्रामध्ये एकही असे शहर सापडणार नाही जिथे वडापाव मिळत नाही. वडापाव विकून अनेकजण श्रीमंत देखील झाले आहेत. तरुण तरुणी असतील किंवा अबालवृद्ध अनेकांना हा पदार्थ आवडतोच. वडापाव हा काही प्राचीन काळापासून महाराष्ट्रात आहे असं नाही त्याचा शोध महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या पदार्थाचा शोध लागला आहे मात्र या वडापावचा शोध नेमका कोणी लावला हे अनेकांना माहिती नाही. दादरच्या अशोक वैद्य यांना 1966 मध्ये दादर रेल्वे स्थानकाबाहेर पहिला वडा पाव स्टॉल सुरू करण्याचे श्रेय दिले जाते.मुंबईच्या पूर्वीच्या मिल-हार्टलँडमध्ये झाला होता. दादरच्या अशोक वैद्य यांना 1966 मध्ये दादर रेल्वे स्थानकाबाहेर पहिला वडा पाव स्टॉल सुरू करण्याचे श्रेय दिले जाते. कामगारांना भूक भागविण्यासाठी तात्काळ उपलब्ध होणारा हा पदार्थ पुढे महाराष्ट्राची, मुंबईची ओळख झाला.

मराठा वनवास‎ यात्रेला सलगरा ग्रामपंचायतच्या पाठोपाठ गंधोरा, किलज, कनगरा आणि श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने दिला जाहीर पाठिंबा

  

सलगरा,दि.५ (प्रतिक भोसले) 

घटनात्मक ५०% च्या आतील ओबीसीमधूनच‎ मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या‎ मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने‎ तुळजापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत ‘मराठा वनवास‎ यात्रा’ काढण्यात येणार आहे. या वनवास यात्रेस सलगरा (दि.) ग्रामपंचायतच्या पाठोपाठ आता गंधोरा, किलज आणि कनगरा ग्रामपंचायतने पण जाहीर पाठिंबा दिला आहे. या मध्ये श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने पण जाहीर पाठिंबा देऊन श्रीक्षेत्र तुळजापूरातील सर्व जातीधर्मातील मित्रपरिवार तसेच देविचे मुख्य भोपे पुजारी सदस्य हे मराठा जातीला आरक्षण मिळविण्यासाठी आयोजकास सर्वतोपरी सहकार्य करतील असे म्हणाले. 

सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या ६ मे २०२३ रोजी तुळजापूर येथून ‘मराठा वनवास यात्रा’ निघणार आहे. मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी या वनवास यात्रेचे नियोजन केले गेले आहे. ही यात्रा तुळजापूर ते मुंबई मंत्रालय अशी पायी चालत जाणार आहे. ६ जून २०२३ रोजी सर्व मराठा बांधव मुंबई मध्ये पोचतील असे नियोजन ठरले आहे. आणि त्यात हजारो बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

या मराठा वनवास यात्रेला आणि मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला गंधोरा, किलज आणि कनगरा या ग्रामपंचायतींनी एकमताने मंजूर केले आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व तसेच गावातील सर्व जातीपातीच्या नागरिकांच्या वतीने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्व ते सहकार्य यापुढेही करण्यात येईल. असे  गंधोरा, किलज आणि कनगरा ग्रामपंचायतने काढलेल्या पत्रात म्हटले आहे. 

ग्रामपंचयतींच्या पाठिंब्या नंतर पाठोपाठ श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने पण जाहीर पाठिंबा दिला आहे. मंडळाने असे म्हंटले आहे की, मराठा समाजास ५०% मधील ओबीसी मधून आरक्षण मिळविण्याकरीता वनवास यात्रेचे सकल मराठा समाजातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर ते मुंबई ही यात्रा संपुर्ण महिनाभर मराठा समाजात जनजागृती करत निघणार आहे. या यात्रेची सुरूवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची पुजाअर्चा करून सर्व भोपे पुजारी हे आयोजकांना शुभार्शिवाद देऊन यात्रेची सुरूवात करणार आहेत. तरी सर्व भोपे पुजारी यांनी सकाळी ०९ वा.सु. श्री तुळजा भवानी मंदिरात वेळेवरती उपस्थित राहावे हि विनंती. श्रीक्षेत्र तुळजापूरातील सर्व जातीधर्मातील मित्रपरिवार तसेच देविचे मुख्य भोपे पुजारी सदस्य हे मराठा जातीला आरक्षण मिळविण्यासाठी आयोजकास सर्वतोपरी सहकार्य करतील.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच दि.६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा गावागावात मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत दि.६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबई मध्ये पोहोचणार आहे. ५०% च्या आतले ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, यंदाचा छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा आपले मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील. त्या नंतर मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत‎ हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, अधिकृत ‘जी आर’ निघत नाही, तोपर्यंत मुंबईतच ठाण मांडून बसणार, कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. आता पर्यंत लेखी आश्वासने फार झाली, आता प्रत्यक्ष‎ आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. असे पदाधिकारी एका आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

येत्या ६ तारखेला मराठा वनवास यात्रा तुळजापूर येथून निघणार आहे. चळवळीतील शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम सकाळी ०९ वा.सु. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर होईल. अनेक गावांतील भजनी मंडळे, हलगी पथक, संभळ वादक, वासुदेव, ढोल पथक देखील सर्व आम्हाला सोडण्यासाठी येणार आहेत. वनवासाला निघालेल्या लोकांना पाठवण्याची ती सुद्धा एक पद्धत आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्री राम वनवासाला निघाल्या नंतर त्यांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने अयोध्या वासिय उपस्थित होते. अगदी त्याच प्रमाणे वनवासाला निघालेल्या मराठा समाजातील बांधवांना, तरुणांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने समाज उपस्थित राहील. वाटेत देखील प्रत्येक गावातील ग्रामस्थ आमच्या राहण्याची – जेवणाची सोय करत आहेत. अशा प्रकारे जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबईत पोचेल.

रुग्णांना जात विचारण्याचे प्रकार थांबवा – अजित पवार


रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना जात विचारण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडत असून त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी असे प्रकार थांबवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाऊ नये.मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तत्काळ थांबवावेत, ताबडतोब निर्देश द्यावेत अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातही रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. शेतकऱ्यांना खतखरेदी करण्यासाठीही जात सांगणं अलिकडे बंधनकारक केलं होतं. त्यावेळीही भविष्यात असे प्रकार थांबवण्याचा आम्ही सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर सुद्धा हा प्रकार घडला आहे. असं अजित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वर म्हटले आहे.


#Ajit_pawar #Ajitpawarplatestnews

#NCP 


महात्मा गौतम बुध्द आणि त्यांची विचारधारा

 


    आज वौशाखी पोर्णिमा, अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, अंहिसेचा संदेश देणाज्या तथागत महात्मा गौतम बुध्दाचा जन्मदिवस. वौशाखी पोर्णिमेला बौध्द धर्मात अतिशय महत्त्व आहे. या पोर्णिमे दिवशी बुध्दाचा जन्म झाला. याच दिवशी बुध्दाला बोधीचा, सत्याचा साक्षात्कार झाला आणि याच पोर्णिमेला कुशी नगर येथे बुध्दाचे महापरिनिर्वाण झाले. जगाच्या पाठीवर कोणत्याही महामानवाच्या जीवनात असा योग आल्याचे माझ्या वाचनात नाही.
    गौतमबुध्द हे प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे विद्वान, तत्त्वज्ञ, प्रभावी वाद-विवाद पट्टू, दयाशील, समतावादी होते. सौंदर्य महालात असते. सौजन्य मातीच्या घरात दिसते अशी त्यांची धारणा होती. बुध्द अहिंसावादी, विनयशील व नम्र असल्यामुळे अंहिसेने हिंसेला व अक्रोधाने क्रोधाला जिंकावे यावर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांची विद्ववता व नम्रता पाहून एक पाश्चमात्य विचारवंत आपल्या आत्मचरित्रात म्हणतो की, ‘मानवाच्या गुरुमध्ये एवढी वौशिष्टे असणे संभवत नाही. गौतम बुध्द उच्चकुलीन राजपूत्र असूनही त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी व दु:खाचे कारण शोधण्यासाठी राजवौभव, धनदौलत, राजमहाल, नात्या-गोत्याचा त्याग केला. कर्णमधूर वाणी, मोहक वक्र्तृत्व त्यामुळे बुध्द विश्वासनीय व पुजनीय गुरुचा गुरु आहेत.
    गौतम बुध्दाची मानवतेची शिकवण आजही जगातील प्रत्येक मानव घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरणादायी आहे. बुध्द म्हणतात मानसाचे जीवन दु:खमय शोकमय असून वार्धक्य व मृत्यु दु:खातच होतो. मोह, इच्छा, आसक्ती ही एका दु:खातून दुसरे दु:ख निर्माण करीत असते. शरीर, इंद्रिय, स्पर्श, वेदना, भावना ही दु:ख निर्मितीची कारणे आहेत. ही इच्छा नाश करण्यासाठी दु:खाची कारणे नष्ट करुन निर्वाण प्राप्त करता येते. दु:ख विरहित शांतता प्राप्तीसाठी अंधश्रध्दा व भ्रामक कल्पना वज्र्य करावी. सत्याचा डोळसपणे स्विकार करुन जीवन मंगलमय करण्याचा संकल्प करावा. आपले बोलणे, सत्य, मधूर, प्रेमळ, दयाळू असावे ते खोटे, कठोर, चछोर नसावे. निंदनीय बोलण्यासाठी वाणीचा दुरुपयोग करु नये. मानवाने सदाचाराचे वर्तन ठेवावे. हिंसा, चोरी, व्याभिचार, दुष्कृत्य वज्र्य करुन योग्य मार्गाने उदरनिर्वाह करावा. मादक द्रव्य किंवा दारुचे सेवन करु नये. आपल्या मनातील दृष्ट प्रवृत्ती काढून मनात सत्तप्रवृत्ती कसल्याही प्रलोभनाने मनात मोह, इच्छा आसक्ती निर्माण होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी. मन शुध्द ठेवल्याने मनात एकाग्रता निर्माण होवून दु:खाचा सर्वनाश होतो व निर्वाण प्राप्त होते.
    गौतम बुध्द म्हणतात, प्रज्ञा, शील, करुणा ही त्रिसुत्री बुध्दधम्माचा आधारस्तंभ व गाभा आहे. प्रज्ञा ही लोककल्याणासाठीची विद्ववता असून शील हे या प्रज्ञेचे सौभाग्य आहे. त्यांच्या जोडीला करुणा हवीच आहे. दु:खी पिडीताबद्दल दया कळवळा आवश्यकच आहे. म्हणून जन्माने उच्च, निच्च ठरत नसून कर्माने ठरतो. त्यासाठी मानसाने सत्यकर्मासाठी सदाचारी बनले पाहिजे. वेदाचे अध्ययन, उपासना, स्वर्ग, नर्क, धर्मविधी, यज्ञवौकल्य, उपास-तापास या बाबींना बौध्द धर्मात अजिबात स्थान नाही. तर बौध्द धर्माने वर्ण, वर्ग, जाती, विषमता नाकारुन समता व समानतेला केंद्र बिंदू मानले आहे. उच्च-निच्च, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्व समान आहेत. नद्या समुद्रात विलीन झाल्यानंतर त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, तसेच बौध्द धर्माचे आहे.
    गौतम बुध्दाने जगातील मानव जातीला मंगलमय सुखी जीवन जगण्यासाठी शांती, अहिंसा, समता, दयाशीलते बरोबरच दैनंदिन जीवनासाठी साधी सोपी संहिता विषद केलेली आहे. ती संहिता प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. हिंसा (प्राणीहत्या) करु नये, वाणीने कठोर बोलू नये, दुसज्याचा द्वेष करु नये, दुसज्याच्या संपतीचा लोभ धरु नये, दूराचारी विचार मनात आणू नये, दुरगुणापासून अलिप्त राहून दु:खी, पिडीत, संकटग्रस्त व्यक्तीला मदत करावी. मनात सकारात्मक विचार ठेवून नितीमत्तेने वर्तन करावे. पिडीतांची सेवा करावी, आई-वडील व वृध्दांची सेवा करावी, जीवनात सतत सदाचाराचे तत्व आचरणात आणावे. इतरांचे चांगले गुण आत्मसात करावे, आपल्यातील दुर्गूण दोष दूर करावे. त्यामुळे बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिद समाजात खज्या अर्थाने रुजेल आणि शांततामय मार्गाचा जीवनाचा सर्वांगीण विकास होईल.
    बौध्द धर्म हा विज्ञानाचे अधिष्ठान असलेला मुळ भारतीय धर्म असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करुन 14 ऑक्टोंबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायासह बौध्द धर्माची दिक्षा घेतली. त्यावेळी बौध्द धर्माचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनुयायांना 22 प्रतिज्ञाची आचारसंहिता दिलेली आहे. त्यातील पंचशील आष्टांग मार्ग आणि 10 परिमिता याच्या आचरणा बाबत गेल्या 65 वर्षात आपली वाटचाल कशी होत आहे याचे आत्मचिंतन करणे आवश्यक वाटते. आज सामाजिक, शौक्षणिक, आर्थिक स्तर उंचावला असला तरी अंदाजे प्रमाण 30 % प्रमाणात आहे. उर्वरीत समाज हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांचा आर्थिक, शौक्षणिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासना सोबतच प्रगत बौध्द अनुयायांनी पुढे येवून प्रयत्नशील राहण्याची सामाजिक बांधिलकी नाही का ? समाजात स्त्री-पुरुष समानता मानली जात आहे. परंतू मुलगी कितीही उच्चशिक्षीत असली आणि कायद्याने बंदी असूनही मुलीकडून हुंडा घेतला जातो. मुलगा नौकरदार जर असेल तर तो सोन्याच्या रुपाने तो स्विकारला जातो. मंगल परिणय झाल्यानंतर वधू-वरांना कुलदैवताच्या दर्शनाला पाठवले जाते. मंगल परिणय व अन्य उत्सवात मद्यप्राशन करुन अनुयायी नाचतात. याला बौध्द धर्मात मान्यता आहे का ? याचा आपण कधी विचार करणार आहोत. आपण बुध्द अनुयायी म्हणून आज बुध्द जयंतीच्या मंगलदिनी संकल्प करु या की आपले मंगलपरिणय व अन्य सोहळे साजरे करताना महात्मा गौतम बुध्दाचे तत्त्वज्ञान व विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र समाज परिवर्तनाचे विचार सतत ध्यानी, मनी ठेवून ते काटेकोरपणे आचरणात आणू या आणि आचारसंहितेप्रमाणेच वाटचाल करुया.

दिलीप प. कांबळे

+919922568587

हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी – सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव ॲड. हर्षीत खंडार

 

जिल्हा रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून सूचना

सोलापूर, दि. ४ (प्रतिनिधी) :- दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघात संख्येचा विचार करता, हेल्मेटसक्ती तसेच चारचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी सीट बेल्ट सक्तीची कडक अंमलबजावणी करावी. याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव तथा कायदेशीर सल्लागार ॲड. हर्षीत खंडार यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, परिविक्षाधीन आयपीएस नौमी साटम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आणि संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूरचे प्रकल्प संचालक आय. व्ही. नारायणकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, महामार्ग सुरक्षा पथकाचे रंजन सावंत आदि उपस्थित होते.

ॲड. हर्षीत खंडार म्हणाले, दुचाकी वाहनांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी. अधिकाधिक नागरिकांचा रस्ते सुरक्षा अभियानात सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

सुरक्षा कवच उपक्रमाचे कौतुक

उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या सुरक्षा कवच उपक्रमाचे ॲड. हर्षीत खंडार यांनी कौतुक करून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचा संस्कार रुजण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. तसेच, या उपक्रमाची व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करावी, असे ते म्हणाले.

प्रारंभी जिल्ह्यातील सर्व महामार्ग, महत्त्वाची देवस्थाने, शहर व ग्रामीण भागातील जास्त अपघात होणारी ठिकाणे, मागील तीन वर्षात झालेल्या अपघातांची संख्या इत्यादी बाबींची माहिती देवून त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना व विविध उपक्रमांचे सादरीकरण मोटर वाहन निरीक्षक सागर पाटील यांनी केले.

यावेळी विजय गायकवाड, वाय. बी. वेळापुरे, एम. ओ. मदान, ए. जी. सायकर तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.