Home Blog Page 88

मंत्रिमंडळ निर्णय दि ३० मे २०२३

 


आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

✅  कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.


✅  केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा.


✅  नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.


✅  ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ.  योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.


✅  सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता.


✅  महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण.


✅  राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार.


✅  कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार.


✅  सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार.


✅  बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय.


✅  अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार.


✅  नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता.

Dainik Janmat 30 May 2023E paper

 

परंडा मुख्याधिकारी यांना गैरकारभार आरोपांवरून जिल्हाधिकारी कार्यालयाची कारणे दाखवा नोटीस

३१ मे चे आत्मदहन आंदोलन तूर्त मागे 

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्यावरील गैरकारभाराच्या आरोपाची सखोल चौकशी करणेकामी मुख्याधिकारी नगरपरिषद भूम  यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर चौकशी समितीने विषयनिहाय चौकशी करून चौकशी अहवाल दि.२४ मे रोजी  जिल्हा आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद या कार्यालयास सादर केला आहे. प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषद येथील मुख्याधिकारी व संबंधीत कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवून त्यांचेविरुध्द नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.असल्याचे जिल्हा आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद यांनी संबंधीत आंदोलकांना कळवल्याने दि ३१ मे रोजी चे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती आंदोलक अॅड.नुरुद्दीन चौधरी यांनी दि.२९ दिली आहे.

        याबाबत माहिती अशी की, परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्यावरील गैरकारभाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली होती.मुख्याधिकारी यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा दि .३१ रोजी परंडा तहसिल कार्यालय येथे आत्मदहन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना गुरुवार दि. १८ मे रोजी मा.नगरसेवक ॲड . नुरोद्यीन चौधरी,माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी , इरफान शेख,माजी नगरसेवक जावेदखॉ पठाण ,रहेमतुल्ला उर्फ सत्तार पठाण,जमील पठाण, अझहर शेख,समीर पठाण,अॅड. जहिर चौधरी,सत्तार पठाण ,बाशा शहाबर्फीवाले यांनी दिले होते .  मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी,या मागणीसाठी या पूर्वी परंडा तहसिल कार्यालयात आत्मदहनाचे आंदोलन केले होते.तसेच उपविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांना केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी भुम यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केली होती.त्यांच्यासमोर या सर्वांनी मुख्याधिकारी यांच्या गैरकारभारा बाबत पुराव्यासह आरोप केले होते.त्यानंतर उपविभागीय अधिकारी भूम यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी योग्यरित्या होण्याकरिता तज्ञामार्फत चौकशी होणे गरजेचे असल्याचे नमुद करून त्यांनी आपला अहवाल दि . ११ नोव्हेंबर २०२२ रोजी  जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. त्यानंतर आंदोलकांनी  जिल्हाधिकारी यांची दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी मुख्याधिकारी यांची चौकशी होणेकामी तज्ञांची नियुक्ती करून चौकशी करावी अशी विनंती केली होती  दि ०६ जानेवारी २०२३ रोजी चौकशी अधिकारी म्हणुन भुम नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच त्यांच्यासोबत दोन सदस्या ची चौकशी समिती नेमुण एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.चौकशी समितीने दि .३१ जानेवारी २०२३ रोजी तक्रारदारांना नोटीस देवुन म्हणणे सादर करण्यास सांगितले होते त्यानुसार त्यांनी दि . ३१ जानेवारी २०२३ रोजी तोंडी व लेखी स्वरूपात व तसेच दि . १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व पुराव्यासह लेखी उत्तर दिलेले आहे. त्यास दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. परंतु अद्याप चौकशी अधिकार्‍यांनी अहवाल सादर केला आहे किंवा नाही. किंवा त्याच्या अनुषंगाने काय कारवाई प्रस्तावित केली आहे . याबाबतची कसलीच माहिती आजपर्यंत तक्रारदारांना देण्यात आलेली नाही.चौकशी तथा कारवाईस होत असलेला विलंब  संयमाचा बांध तोडत आहे. त्यामुळे दि . २५ मे २०२३ रोजीपर्यंत मुख्याधिकारी नगर परिषद परंडा यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई न झाल्यास दि ३१ मे २०२३ रोजी तहसिल कार्यालय परंडा येथे आत्मदहन करण्यात येईल . असा इशारा देण्यात आला होता . या अनुषंगाने दि .२४ मे रोजी जिल्हा आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयास अहवाल सादर केला आहे. प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषद येथील मुख्याधिकारी व संबंधीत कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवून त्यांचेविरुध्द नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.त्यामुळे हे आंदोलन तुर्त मागे घेण्यात आले आहे आसल्याची माहीती अॅड. नुरूद्दीन चौधरी यानी दिली आहे.

व्हाईस ऑफ मीडियाच्या रेडिओ विंगच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पेठे यांची निवड

 


धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) – देशात खास पत्रकारांच्या विविध समस्यावर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या रेडिओ विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रमेश पेठे यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड व्हॉइस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी एका पत्राद्वारे केली आहे.  दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की,रेडिओ पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो,ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, ही अपेक्षा व्यक्त करीत पुढील कामास गती द्यावी. तसेच पेठे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.

ढोकी व चार गाव योजनेचा सौरप्रकल्प व गाव अंतर्गत वितरण प्रणाली नव्याने होणार-आ. कैलास पाटील

 


धाराशिव-दि.
२६ मे  रोजी ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आ.कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक  घेण्यात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत राबविण्यात आलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ढोकी, (तेर, क. तडवळा, येडशी)  व चार गावे ही योजना दिनांक-२९जुलै २००५ रोजी पुर्ण झालेली असुन सदर योजनेची दैनंदिन देखभाल दुरुस्ती दि.०२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेमार्फत करण्यत येत होती.  या योजनेचे थकीत  विजबिल भरणा न केल्यामुळे दि.१७ जून २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे  योजनेव्दारे होणारा पाणी पुरवठा बंद होता.  तद्नंतर सदरील योजना जिल्हा परिषद धाराशिव यांचेमार्फत दैनंदिन देखभाल दुरुस्ती व संचालनाकरीता सहमतीने शिखर समिती /सुकानु समितीकडे वर्ग करण्यात आली.  परंतु सदर योजना विज बिल थकल्यामुळे त्यांनीही  पाणी पुरवठा सुरळीत केली नाही.  त्यामुळे सदर योजनेचा आढावा घेण्यासाठी आ. कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सदर योजना चालु करण्यासाठी दि.३० जून २०२२ पुर्वीचे थकीत विद्युत देयक महाराष्ट्र उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णयानुसार एक रक्कमी रक्कम अदा (ओ.टी.एस.) करण्याचे योजनेव्दारे रक्कमेमधील व्याज, विलंब अकार माफ करुन मुद्दलाची रक्कम ग्राम विकास विभागामार्फत महवितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक-३० जून २०२२ नंतरचे योजनेचे उर्वरित १० लक्ष विज देयक हे १५व्या वित्त आयोग ग्रा.प. स्तर / जिप. स्तर अंतर्गत उपलब्ध निधीमधुन महावितरणला अदा करण्यास सदर बैठकीत ठरले.
ढोकी व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्र व उद्वव विहीर येथे सौरउर्जा प्रकल्प उभारुन योजना स्वयंपुर्ण करण्यासाठी २२० किलो वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित आहे.  त्यासाठी मेडा लातुर यांचेकडे  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग धाराशिव यांचेकडे निधी वर्ग करण्यात आलेला आहे.  तथापी सदर प्रकरणी अदयाप निविदा  प्रक्रिया पुर्ण झालेली नाही.  यावर सविस्तर चर्चा होऊन सदर निविदा प्रक्रिया तात्काळ पुर्ण करुन उपलब्ध निधीच्या मर्यादेत काम पुर्ण करणेबाबत महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा पुणे यांना सुचना देण्यात आल्याचे सांगीतले.
ढोकी व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उध्दरन नलिका व गाव अंतर्गत वितरण प्रणाली ही जुनी असल्याने व सदर योजना झाल्यानंतर गावांतर्गत  विस्तार वाढ झाली आहे.
त्यामुळे सदर योजनेचे उध्दरन नलिका व गाव अंतर्गत वितरण प्रणालीचे भविषयात वाढणारी लोकसंख्या व गावची विस्तार वाढ या गोष्टी विचारात घेऊन  या योजनेच्या कामाची नव्याने  अंदाजपत्रके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी १५ दिवसात तयार करण्याचे व   सदर योजनेचे काम जलजीवन मिशन योजनेतुन हाती घेण्याच्या सुचना आ. कैलास पाटील यांनी केल्या. 
  बैठकीस  राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव  गुजर अधिक्षक अभियंता महावितरण,  गांधोले अधिक्षक अभियंता महाऊर्जा  बीड,  देशपांडे कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु. जि. प. धाराशिव,   ढवळे कार्यकारी अभिययंता जीवन प्राधिकरण,  दिपक नाईकनवरे उप अभियंता सिंचन विभाग, व  संग्राम देशमुख मा.पंचायत समिती सदस्य, अमर समुद्रे, स्वाती जमाले, सरपंच क.तडवळा, डॉ.प्रशांत पवार, विशाल जमाले, श्रीमंत फंड उपसरपंच तेर  तुळशिदास जमाले  अंकुश मोरे इत्यादी बैठकीस उपस्थित होते.

सोन्याचे दागिने लुटणारी टोळी जेरबंद

 


धाराशिव – एका गुन्ह्याचा तपास करताना जिल्ह्यातील पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. दि.17 मे २३  रोजी महिला नामे सुमन सुभाष खज्जे, वय 58 वर्षे, धंदा- घरकाम रा. केसर जवळगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद  ह्या पोलीस ठाणे मुरुम येथे येवून फिर्याद दिली की, दि. 11 मे 2023 रोजी 14.30 वा. सु. पांढऱ्या रंगाच्या मॅजीक सारख्या दिसणाऱ्या वाहनातुन मुरुम मोड ते मुरुम असा प्रवास करत असताना  नमुद वाहनामधील दोन ते तीन  पुरुष वय  अंदाजे 30 ते 35  वर्षाचे त्यातील एकाने सुमन खजजे यांचे तोंडावर कसलीतरी भोवळ येण्याची पावडर टाकुन अंगावरील 25 ग्रॅमच्या सोन्याच्या पाटल्या व 10 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण कि.अं 87,500/- रु किमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुमन खज्जे यांनी दि. 17 मे 2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

        नमुद  गुन्ह्याचे तपासकामी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत व  उपविभागीय पोलीस अधिकारी  रमेश बरकते, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मुरुम चे प्रभारी अधिकारी- एम.जी. शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  इंगळे  यांनी नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला. त्यावर तांत्रिक माहितीच्या आधारे  त्या अनोळखी व्यक्तीची माहिती मिळाल्याने व नमुद गुन्ह्यातील वाहन हे झळकी, ता. इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक  येथे असल्याची गोपनीय बातमी दाराकडून  बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक  शेंडगे सपोनि  इंगळे यांनी पोलीस अंमलदारासह सदर ठिकाणी जावून  स्थानिक पोलीसांचे मदतीने सदर ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला असता झळकी या ठिकाणी नमुद गुन्ह्यातील आरोपी 1) युनुस रबरब्या काळे, वय 30 वर्षे, रा. बिस्मील्ला नगर मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर, 2) जगदीश धनाजी शिंदे, वय  35 वर्षे, 3) मिनाक्षी टेकचंद काळे,  वय 30 वर्षे  दोघे रा. सांगवी काटी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद, 4)सुरेखा बाबु भोसले, वय 55 वर्षे, 5) सविता विनोद भोसले, वय 34 वर्षे, 6) काजल नेताजी शिंदे, वय 25 वर्षे 7) सोनाली नरेंद्र शिंदे, वय 25 वर्षे, 8) पदमिनी युनुस काळे, वय 25 वर्षे,  आरोपी क्र 4 ते 8 हे सर्व रा. बिस्मील्ला नगर मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर  हे वाहनासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, नमुद इसमांनी  गुन्हा केल्याचे निष्पन्न होवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

    तरी सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत व  उपविभागीय पोलीस अधिकारी  रमेश बरकते, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मुरुम चे प्रभारी अधिकारी- एम.जी. शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  इंगळे  पोलीस हवालदार- महानुरे, पोलीस अंमलदार- रणखांब, तोरंबे,परीट, कटोरे, समुद्रे, महिला पोलीस अंमलदार-पंढरे, मुजावर यांचे पथकाने केली.

ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..? सुषमा अंधारे यांनी पोस्ट लिहीत केला हल्लाबोल

गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटील कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच काही जणांनी पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा दिला आहे त्यावर प्रा. सुषमा अंधारे व्यक्त झाल्या आहेत. त्यांनी आपल्या खास शैलीत पोस्ट करत गौतमी पाटील ला अडचणीत आणणाऱ्याना धारेवर धरले आहे.

प्रा. सुषमा अंधारे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात,

नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही.  तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले.  आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे.

चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मणवर्णातील आडनाव ही विद्यामय असावीत. क्षत्रिय वर्णीयांची आडनावे वीरमय, वैशांची आडनावे ही व्यापारमय असावी,  तर शूद्रांची आडनावे ही निंदनीय असावीत असे गृहीतक आहे . 

      ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे अशा आशयाची येते. शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे हि पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे,  बैले,  पारवे  हत्तीआंबिरे, मांजरे, निळे , हिरवे ई. 

             विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा नंतर वर्णव्यवस्था तितकीशी जाणवत नाही.  मात्र जात व्यवस्थेची दाहकता आजही टिकून आहे ग्रामीण भागात ती विशेषत्वाने जाणवते त्यामुळे ग्रामीण भागातून स्वतःला आजमव पाहणारी आणि अत्यंत उपेक्षित व पीडित वर्गातून येणारी नवी पिढी बऱ्याचदा आडनावे बदलून नागरवस्तीमध्ये स्वतःला सिद्ध करू पाहतात.                         

            एका अर्थाने अशा पद्धतीने आडनावे बदलून लोकांना राहावे लागते हे भारतीय समाज व्यवस्थेतील जाती व्यवस्था घट्ट करू पाहणाऱ्यांचा विजयच म्हणावा लागेल.

             आंबेडकरी चळवळतील अत्यंत ज्येष्ठ साहित्यीक आणि महत्त्वाचे नाव म्हणजे बाबुराव बागुल यांचं “जेव्हा मी जात चोरली होती” हे पुस्तक या अर्थाने प्रचंड महत्त्वाचे ठरते.”

                    जयसिंगपूर मधील अनेक बौद्धांनी आपली आडनावे भाटिया कुलकर्णी किंवा कर्णिक केलेली आढळतात. तर नागपूरकडे अनेक बौद्धांनी आडनावे पाटील अशी लावलेली आहेत. 

         जळगाव धुळे चाळीसगाव या भागामध्ये भटक्या विमुक्त आतील अनेक जात समुदायातील आडनावे ही मूळची वेगळी मात्र नंतर पाटील लावलेली दिसतात. 

      थोडक्यात काय तर हा सगळा आटापिटा जात ओळखली गेली तर कदाचित आपली संधी डावल्ली जाईल की काय या भीतीपोटीचा. 

             यात अजून एक वेगळ्या प्रकारची माणसं पण आहेत की जी मूळ प्रस्थापित आहेत किंवा जी सवर्ण आहेत मात्र त्यांची आडनावे त्यांना काहीशी अडचणीची वाटतात आणि म्हणून आडनावांच्या सोबत ते पाटील असेही बिरूद लावतात. उदाहरणार्थ माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकणारा एक मुलगा त्याचे संपूर्ण इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे आडनाव गाढवे होते मात्र मागील दोन वर्षात त्याने त्याचे आडनाव गाढवे पाटील असे केले किंवा एखाद्याचे आडनाव काळोखे असेल तर काळोखे पाटील करणे किंवा कोळसे असेल तर कोळसे पाटील करणे आवारे असेल तर आवारे पाटील करणे… 

            गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे.  तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथेही बाब उल्लेखनीय आहे की नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवार ला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..? 

          एखाद्या मुलीला,  माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम  व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे , ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता..

#गौतमी_पाटील #gautami_patil #gautamipatilofficial #sushma_andhare #andhare_sushma #सुषमा_अंधारे 

अभिमानास्पद! सलगऱ्याचा शौर्य सिंगापूरात तबला वाजवणार

 


सलगरा,दि.२६(प्रतिनिधी) 

अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन, पुणे आणि ‘इंटरनॅशनल डान्स कौन्सिल, पॅरिस’ यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘युनिव्हर्सल हार्मनी’ या नावाने ९ ते १६ मे या कालावधीत विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये छोट्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या तबलावादन स्पर्धेमध्ये सलगरा (दि.) येथील शौर्य बोधणे वय (०८ वर्षे) याने प्रथम क्रमांक पटकावून गावचे नाव लौकीक केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. 


विशेष म्हणजे या आयोजित स्पर्धेत ३६ राज्यांमधून २५०० स्पर्धक आले होते. या मध्ये छोट्या गटातून शौर्य ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शौर्य चे वडिल शिवराज महावीर बोधणे हे स्वतः (एम.ए. तबलावादक) आहेत यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शौर्य ची आवड बघुन त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ते रोज दोन ते तीन तास त्याच्याकडून रियाज करून घेतात. बोलताना त्याचे वडील म्हणाले की, आता त्याची निवड दि.२० नोव्हेंबरला सिंगापूरला होणाऱ्या स्पर्धेसाठी केली गेली आहे त्या मुळे आता सलगऱ्याचा शौर्य सिंगापूरात तबला वाजवणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 


दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या काही कार्यक्रमांमध्ये शिवराज बोधणे यांचा सहभाग आहे. बोधणे यांना विविध पुरस्कार या पुर्वी देखील भेटले आहेत. या वर्षीचा नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) आणि श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, ईचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल कलारत्न अवॉर्ड, (२३ एप्रिल) रोजी नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, ईचलकरंजी येथे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मी घेतलेल्या कष्टाचे कुठे तरी त्याने चिज केले घरामध्ये या साठी पोषक वातावरण असल्यामुळे त्याला हे शक्य झालं त्या बरोबरच जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीमुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोणतीच गोष्ट हि अवघड नसते सराव – रियाज या मुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपोआप सोप्या होत जातात. कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर सरावा शिवाय पर्याय नाही असे बोलताना शौर्य चे वडील शिवराज बोधणे म्हणाले