अभिमानास्पद! सलगऱ्याचा शौर्य सिंगापूरात तबला वाजवणार
सलगरा,दि.२६(प्रतिनिधी)
अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन, पुणे आणि ‘इंटरनॅशनल डान्स कौन्सिल, पॅरिस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युनिव्हर्सल हार्मनी’ या नावाने ९ ते १६ मे या कालावधीत विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये छोट्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या तबलावादन स्पर्धेमध्ये सलगरा (दि.) येथील शौर्य बोधणे वय (०८ वर्षे) याने प्रथम क्रमांक पटकावून गावचे नाव लौकीक केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे या आयोजित स्पर्धेत ३६ राज्यांमधून २५०० स्पर्धक आले होते. या मध्ये छोट्या गटातून शौर्य ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शौर्य चे वडिल शिवराज महावीर बोधणे हे स्वतः (एम.ए. तबलावादक) आहेत यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शौर्य ची आवड बघुन त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ते रोज दोन ते तीन तास त्याच्याकडून रियाज करून घेतात. बोलताना त्याचे वडील म्हणाले की, आता त्याची निवड दि.२० नोव्हेंबरला सिंगापूरला होणाऱ्या स्पर्धेसाठी केली गेली आहे त्या मुळे आता सलगऱ्याचा शौर्य सिंगापूरात तबला वाजवणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या काही कार्यक्रमांमध्ये शिवराज बोधणे यांचा सहभाग आहे. बोधणे यांना विविध पुरस्कार या पुर्वी देखील भेटले आहेत. या वर्षीचा नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) आणि श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, ईचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल कलारत्न अवॉर्ड, (२३ एप्रिल) रोजी नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, ईचलकरंजी येथे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मी घेतलेल्या कष्टाचे कुठे तरी त्याने चिज केले घरामध्ये या साठी पोषक वातावरण असल्यामुळे त्याला हे शक्य झालं त्या बरोबरच जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीमुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोणतीच गोष्ट हि अवघड नसते सराव – रियाज या मुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपोआप सोप्या होत जातात. कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर सरावा शिवाय पर्याय नाही असे बोलताना शौर्य चे वडील शिवराज बोधणे म्हणाले
श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आता दर्शन पास घेण्याची आवश्यकता नाही
धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आता दर्शनपास घेण्याची आवश्यकता नाही. श्री तुळजाभवानी मंदिरात संस्थान मार्फत भाविकांना धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी मोफत (Free) पास घेणे बंधनकारक होते.
विश्वस्त समितीच्या परिपत्रक (Circulation) निर्णयानुसार दिनांक 26/05/2023 (शुक्रवार) रोजी पासून धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी भाविकांना दर्शनपास घेण्याची आवश्यकता असणार नाही.
तरी मुखदर्शन व धर्मदर्शन घेणाऱ्या भाविकांना पास बंद करण्यात येत आहेत, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
धाराशिव येथे वंचित बहुजन युवा आघाडीची प्रथम बैठक संपन्न
धाराशिव दि. २५ (प्रतिनिधी) – वंचित बहुजन युवा आघाडीची नूतन कार्यकारणीची प्रथम आढावा बैठक दि. २४ मे रोजी शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे संपन्न झाली आहे.वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक हपार पडली.सर्वप्रथम सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची पक्षाचे क्रियाशील सभासद म्हणून नोंदणी करण्यात आली.पक्षाचे नियम ,शिस्त ,आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यातील तालुका कार्यकारणीची मजबूत बांधणी,अशा अनेक मुद्द्यावरती बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.सर्व नुतन पदाधिकाऱ्याचा यावेळी सत्कार करण्यात आली आहे तसेच रमाई मासिक ,रमाई फाउंडेशन, रमाई प्रकाशन, भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या वतीने महिलांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या रमाई पुरस्कारासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा सचिन लोखंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,युवा जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण,सोमनाथ नागटिळक, उपाध्यक्ष वैभव गायकवाड, महासचिव धीरज शिंदे, सचिव विशाल वाघमारे, संघटक बाबा वाघमारे, प्रवक्ता गोविंद भंडारे सदस्य फिरोज तांबोळी आदीसह युवक आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी
धाराशिव दि. २४ (प्रतिनिधी)- नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, २८ मे नव्या संसदेचे उद्घाटन रद्द करून २६ नोव्हेंबर संविधान दिनी करावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले.
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की, भारताची नवी संसद निर्माण झाली आहे. वर्षभरापासून अनेक आंदोलनातून संविधानवादी,मानवतावादी ,आंबेडकरवादी समूहाने मागणी केली की नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे.कसलीही मागणी नसताना तेलंगणा सरकारने सचिवालयाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन संविधानाचे अस्तित्व कायम केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात बाबासाहेबांचे नाव घेतात परंतु संसदेला नाव का देत नाहीत ? तेलंगणा च्या धर्तीवर नव्या संसदेला नाव देऊन संविधान,भारत, संसदेचे अस्तित्व अस्मिता राखावी २८ मे ला संसदेचे उद्घाटन आहे हे सावरकर जयंतीचे औचित्य साधून केलेला पराक्रम आहे. संसदेचे उद्घाटन संविधानदिनी झाले पाहिजे त्यासाठी 26 नोव्हेंबर तारीख ऐतिहासिक तारीख आहे 28 मे चे उद्घाटन रद्द करून 26 नोव्हेंबरला करावे संसद ही भारतीय संविधानावर चालणारी आहे धर्म सत्तेवर चालणारी नाही. नव्या संसदेला नाव देण्याचा लढा व्यापक करून देशव्यापी केला जाईल वेळ आल्यास दिल्लीला सुद्धा आंदोलन छेडणार असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाधक्ष धनंजय हुंबे, अशोक कसबे, यशपाल गायकवाड, भैय्यासाहेब वाघमारे, अजय माने, सुशांत सुकाळे,समाधान लगाडे,मुकेश सोनवणे, शहाजी सुकाळे, शरद कसबे, संजय अडयुडे, विशाल कसबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरी क्षेत्रातील बॅनर,पोस्टर,होर्डींगवर QR कोड बंधनकारक-जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे
उस्मानाबाद,दि,२२(प्रतिनिधी):- जिल्हयातील नागरी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या जाहिराती बाबतचे , बॅनर/पोस्टर/होर्डिंग/ तसेच लोकप्रतिमार्फत लावण्यात येणारे कट आउट यासाठी नगरपरिषद/नगरंचायत स्तरावरून नाहरकत प्रमाणपत्र हे IWBP पोर्टलच्या माध्यमातूनच उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच पोर्टल वरून उपलब्ध होणारे नाहरकत प्रमाणपत्र हे QR कोड सहित असावे. सदरचा QR कोड हा बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट वर छापणे बंधनकारक करावे. याबाबतीत काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची सर्व मुख्याधिकारी यांनी दक्षता घ्यावी.असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेशित केले आहे. यासाठी नगरपरिषदेचा/नगर पंचायतीचा अतिक्रमण विभाग कक्ष/मालमत्ता विभाग कक्ष इ. यांचेवर हि जबाबदारी सोपविण्यात यावी. परवानगी / नाहरकत दिलेले बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट दिण्यात आलेल्या मुदतीनंतर दुसऱ्याच दिवशी काढून घेतले जातील, याबाबतची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी.
शहरात QR कोड शिवाय लावणेत आलेले बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट हे विनापरवाना असलेचे घोषित करून तात्काळ काढून घ्यावेत.तसेच परवानगी/नाहरकत न दिलेले बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट हे तात्काळ काढून द्यावेत व त्यावर ज्या नागरिकांचे फोटो/नाव असतील त्यांना आपले नगरपरिषदेने/नगर पंचायतीने निश्चित करून दिलेले दंड आकारून तात्काळ वसूल करावेत. संबंधितांनी दंडाचा भरणा मुदतीत न केल्यास सदर दंडाची रक्कम संबंधिताचे स्वतःचे राहते मालमत्तेच्या मालमत्ता कर व इतर करामध्ये समाविष्ट करून वसूल करावी. QR कोड शिवाय तसेच अनधिकृत लावणेत येणारे बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट याबाबत परवानगी देणेसाठीचे दर व दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आहे. त्यानुसार वसुली करण्यात यावी व त्याचे स्वतंत्र नोंदी ठेवण्यात याव्यात.
अ. क्र. नगरपरिषद / नगरपंचायतीचे नाव बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट दर (रु.) (प्रतिदिन प्रती चौ.फुट/चौ.मी.) (प्रतिदिन रक्कम टाकावी) अनधिकृत बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट साठी आकारला जाणारा दंड (रु.) (प्रतिदिन प्रति चौ. फुट/चौ.मी) (प्रतिदिन दंडाची रक्कम टाकावी)
1 धाराशिव 14 रु. चौ.मी. 28 रु.चौ.मी.
2 तुळजापूर 1 रु. स्के.. फुट प्रतिदिन 2 रु. स्के.. फुट प्रतिदिन
3 नळदुर्ग 5 रु. स्के.. फुट प्रतिदिन 10 रु. स्के. फुट प्रतिदिन
4 उमरगा 2 रु. स्केस. फुट प्रतिदिन 3 रु. स्केस. फुट प्रतिदिन
5 मुरूम 2 रु. स्केस. फुट प्रतिदिन 3 रु. स्केस. फुट प्रतिदिन
6 कळंब 2 SQF/ day 5 SQF/ day
7 भूम 2 रु. स्केस. फुट प्रतिदिन 3 रु. स्केस. फुट प्रतिदिन
8 परांडा 2 SQF/ day 5 SQF/ day
9 वाशी 1 SQF/DAY 3 SQF/DAY
10 लोहारा 1 SQF/DAY 3 SQF/DAY
यापुढे शहरात विनापरवाना व QR कोड शिवाय एकही बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट लावले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सर्व मुख्याधिकारी यांनी करावी.






















































