Home Blog Page 79

दैनिक जनमत १४ जुलै २०२३ E paper

 

दैनिक जनमत १३ जुलै २०२३ E paper

दैनिक जनमत १२ जुलै २०२३ E paper

सलगऱ्यात भरदुपारी घरफोडी; पोलीस उपअधीक्षकांनी केली पाहणी

 


सलगरा,दि.८(प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील बालाजी बब्रुवान गुंजकर,(वय २६वर्षे) यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ११ हजार रु. असा एकूण जवळपास १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी दि.७ जुलै रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दुसऱ्या दिवशी पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. 


या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.७ जुलै रोजी फिर्यादी बालाजी गुंजकर यांचे आई – वडील हे सकाळी ११:०० वा.सु. घराला कुलूप लावून शेताकडे पेरणी करण्यासाठी गेले होते. आणि फिर्यादी हे उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये होते. साडेतीन वा.सु. फिर्यादीची आई मंदाबाई गुंजकर या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना कोणी तरी घराचे कुलुप तोडून बाजूला फेकलेले दिसले. नंतर मंदाबाई यांनी घरात जाऊन बघितले तेव्हा बेडरूम मधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. अशा प्रकारे घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुपारी एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून घरात घुसून बेडरूम मधील कपाटातील तिजोरीवर डल्ला मारून सोन्याच्या ६ अंगठ्या, सोन्याचे नेकलेस, चांदीचे वाळे, चांदीची चैन, आणि रोख रक्कम ११ हजार रु. असा एकूण जवळपास १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी दि.८ जुलै रोजी पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते यांच्या सह पोउपनि आर.के.पटेल, पो.हे.कॉ. विलास जाधव गंधोरा गावचे पोलीस पाटील गजेंद्र कोनाळे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पाहणी केली. भरदुपारी झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या मुळे या वर योग्य ती खबरदारी म्हणुन गावातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करत आहेत. 



त्या दृष्टीने तपास सुरू झालेला आहे, विशेष म्हणजे दुपारी चोरी झाली आहे त्या मुळे आरोपी हा बाहेरचा नसावा कोणी तरी गावातीलच आहे पाळत ठेवून त्याने हे सर्व केलं आहे. असा आमचा अंदाज आहे. घरफोडी, चोऱ्या अशा गोष्टींना आळा बसावा कुठे तरी अंकुश लागावा म्हणुन आम्ही जनजागृती करून बैठका घेऊन बसवंतवाडी व गंधोरा येथे सुचना दिल्या होत्या, तेथील ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही बसविले आहेत. सलगरा (दि.) आणि किलज येथे बैठका घेऊन मुख्य चौक आणि आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहेत. अशी माहिती नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी दिली.


सहायक पोलीस निरीक्षक – सिद्धेश्वर गोरे 

तीन टन गोमांस व नऊ लाख रुपयाची बनावट दारु वाहतूक करणार्‍यावर कारवाई



भूम (प्रतिनिधी)येथील पोलीस स्टेशनची तीन टन गोमांस व नऊ लाख रुपयाची बनावट दारु वाहतूक करणार्‍यावर कारवाई. येथील पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी अवैध कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्या व नऊ लाख रुपयाची बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या अशा दोन वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी दि.०८ रोजी पत्रकार परिषद घेत वरील दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यातील माहिती देताना सांगितले की, भूम ते नगर या रस्त्यावर पाथरूड गावाजवळ खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार करमाळा येथून एक आयशर टेम्पो गोमांस घेऊन वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाने सापळा रचून  पाथरूड गावाजवळ नळीवडगाव फाट्यावर वाहनांची तपासणी करीत असताना एक आयशर टेम्पो एम.एच. ४२ बी. एफ. २१६८ या गाडीला तपासले असता या गाडीमध्ये जवळपास तीन टन गोमांस आढळून आले. याबाबतची  चौकशी केली असता त्यांनी वाहन चालक व गाडीतील अनोळखी व्यक्तीने सांगितले की या गाडीमध्ये गोमांस आहे. यावरून पोलिस पथकाने गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून आरोपी अटक करून गुन्हा नोंद केला आहे.तसेच दुसऱ्या गुन्ह्यांतही खबर्‍या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार गोवा येथून एक चार चाकी टेम्पो गोवा बनावट्याची दारू पंढरपूर, परांडा, बार्शी मार्गे भूमवरून कुंथलगिरी मार्गे बीड जिल्ह्यातील नांदूर, केज या गावी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून शहरातील साहिल कॉम्प्लेक्स समोरील साबळे चहा स्टॉल समोर वाहन तपासले असता.यावेळी एक अशोक लिलँड कंपनीचे एम. एच. ४३ ए.डी. ९९४० या नंबर प्लेटचे वाहन आढळले असता हे वाहन अडवून तपासले. यावेळी प्रथम वाहन चालकाने व सोबत असलेल्या व्यक्तीने उत्तरे देण्याचे टाळले. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच वाहनांमध्ये गोवा बनावट दारूचे जवळपास ५५ ते ६० बॉक्स आढळून आले. यामध्ये मॅकडॉल, नंबर वन, आयबी व रॉयल स्टॅग कंपनीचा माल दिसून आला. याची अंदाजे किंमत गोवा राज्याच्या किंमती प्रमाणे २ लाख २२ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्याच्या किंमती प्रमाणे सुमारे ४ लाख रुपये व टेम्पो किंमत ३ लाख रुपये असा एकूण साधारन ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत तवार, पोलीस कर्मचारी राकेश पवार, अजित कवडे, राव, सावंत , मलंगेवार, घाडगे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यापुढे महापुरुषांच्या जयंती व सार्वजनिक उत्सव डॉल्बीमुक्त होणार बैठकीत सर्व समाजाच्या वतीने एकमुखी निर्णय




उस्मानाबाद,दि,०६ (प्रतिनिधी):-उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रत्येक महापुरुषांच्या जयंती व सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र या डॉल्बी मानवी शरीरासाठी अतिशय घातक असून त्यांच्या करणे आवाजामुळे  शरीराच्या वेगवेगळे अवयवांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे संपूर्ण जिल्हाभरातील शहरासह ग्रामीण भागात सर्व महापुरुषांच्या जयंती मिरवणुका, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम व लग्न समारंभ डॉल्बीमुक्त करण्याचा सर्व समाजाच्या बैठकीमध्ये एक मुखी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.६ जुलै रोजी केले.



उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत धार्मिक सण, उत्सव महापुरुष जयंती साजरी करणाऱ्या मंडळाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, डॉ विशाल वडगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख, कार्डीओलॉजिस्ट डॉ विशाल वडगावकर, डॉ स्वप्नील यादव आदी यांच्यासह विश्वास शिंदे, प्रकाश जगताप धनंजय शिंगाडे, मसूद शेख, अतुल बागल, मैनोद्दीन पठाण, बाळासाहेब शिंदे, महबूब पाशा पटेल, प्रभाकर लोंढे, विष्णू इंगळे, सिद्धार्थ बनसोडे, विशाल शिंगाडे, रॉबिन बगाडे, इम्तियाज बागवान, मेसा जानराव, कुंदन वाघमारे, विलास लोंढे उपस्थित होते. 



पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मॉ जिजाऊ, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान महावीर, ऊरुस, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आदींसह विविध महापुरुषांच्या जयंत्या व धार्मिक कार्यक्रम बँड, हलगी व झांज पथक या पारंपारिक वाद्यांमध्ये साजरी केली जात होती. मात्र आता त्या पारंपारिक वाद्याला बगल देण्यात आले असून डॉल्बी वाद्यावरच सर्वत्र भर देण्यात येत आहे. या डॉल्बीचा आवाज अतिशय कर्ण कर्कश असतो. त्यामुळे अनेक लहान बालके, वयोवृद्ध व्यक्ती व सर्वसामान्य व्यक्तींच्या अवयवावर विपरीत परिणाम होत आहे. या कर्ण कर्कश आवाजामुळे हृदयविकार कायमचे बहिरेपणा व अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे ही प्रथा मानवी जीवनावर बेतत असून मानवा अतिशय घातक असल्यामुळे डॉल्बी बंद करण्याची मागणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्व समाज घटकांतील प्रतिनिधी व व्यक्तींचा केली आहे. हा निर्णय जिल्हा वाशियांसाठी अतिशय महत्त्वाचा व चांगला निर्णय असून आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे बँड, हलगी व झांज पथक या पारंपारिक वाद्याचा सर्व जयंती उत्सव व लग्न समारंभ पार पाडावेत असे आवाहन डॉ ओंबासे यांनी केले. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजामुळे उस्मानाबाद शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालय, निरामय व सुविधा हॉस्पिटलमधील अनेक रुग्णांची शारीरिक स्थिती बिघडल्याचे मी प्रत्यक्ष या मिरवणुकी दरम्यान अनुभवले आहे. विशेष म्हणजे डॉल्बीचा आवाज शासनाने ठरवून दिलेल्या ५० ते ६० डेसिबल ऐवजी १४० डेसिबलपर्यंत आवाज मिरवणुकीमध्ये वाढविला जातो. ते अतिशय चुकीचे असून शारीरिक अवयव निकामी करण्याचे काम या आवाजाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगत डॉल्बीमुक्त सर्व उत्सव साजरे करावेत अशी आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ विशाल वडगावकर, डॉ सचिन देशमुख, डॉ. स्वप्नील यादव, उस्मानाबाद उपविभागीय प्रभारी स्वप्निल राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, धनंजय शिंगाडे, मसूद शेख, विशाल शिंगाडे आदींसह इतरांनी या चर्चेत भाग घेत संपूर्ण जिल्ह्यासाठी डॉल्बीमुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी तर प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड मानले. यावेळी उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.