कासार समाजातील अल्पवयीन मुलीचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी
धाराशिव दि. १७ (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथील कासार समाजातील एका अल्पवयीन मुलीची एका नराधमाने छेडछाड करून तिचा नाहक बळी घेतला आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तर विशेष सरकारी वकील नेमून तो खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा. तसेच त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री सोमवंशी क्षत्रिय कासार समाज उन्नती मंडळाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी या मार्फत उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथील कासार समाजातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून नाहक बळी घेणाऱ्या आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हा खटला विशेष सरकारी वकिल नेमून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. तसेच त्या मुलीचा गावातीलच एका गावगुंडाने मागील वर्षभरात अनेक वेळा छेडछाड करून दि.१२ जून रोजी नाहक बळी घेतला आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास कासार समाज जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला आहे. या निवेदनावर अखिल भारतीय मध्यवर्ती मंडळाचे संचालक अरुण यादगिरे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, जिल्हाध्यक्ष राजकुमार जगधने, युवक जिल्हाध्यक्ष महावीर कंदले, वैभव विभुते, शिरीष झरकर, वैभव कासार, चैतन मैंदर्गे, सतीश सातपुते, सावन देवगिरे, शार्दुल कासार, संतोष कपाळे, अमित जगधने, अजय शीलवंत, सुजित झरकर, एन.बी. झरकर, एस.एस. देवगिरे, प्रविण गडदे, सचिन झरकर, काकासाहेब कासार, सुधाकर शेट्टे, शिवम देवगिरे, मनोजचंद गडदे, शिवाजी कोळपे, सुरज देवगिरे, नितीन कोळपे, आदित्य जगधने, किरण कंदले आदींच्या सह्या आहेत.
शिवरायांचा अपमान कसबे तडवळे कडकडीत बंद! गावात तणावपूर्ण शांतता
सुरेश पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करणार का?
धाराशिव:- हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अजित पवार गट सुरेश पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्याने कसबे तडवळे गाव कडकडीत बंद करण्यात आले.
राष्ट्रवादीतील एक गट फुटून सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी धाराशिव येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करून कार्यकर्त्यांना शरद पवार साहेब यांच्या सोबत राहण्यासाठी सद्बुद्धी देवो असे शिवरायांकडे साकडे घातले होते. याला उत्तर देताना प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांनी शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने. शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. याचा निषेध करण्यासाठी आज दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गावातील शिवप्रेमींनी गाव बंद आंदोलन केले होते. यावेळी शिवप्रेमीचे आंदोलन हाणुन पाडण्यासाठी सुरेश पाटील यांनी देखील गावामध्ये रॅली काढली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले असले तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तत्पूर्वी काही नागरिकांनी सर्वांसमोर माफी मागण्यास सांगितली मात्र मी कालच दिलगिरी व्यक्त केली आहे आज माफी मागणार नाही अशी भूमिका सुरेश पाटील यांनी घेतली होती.
पक्षातून हकालपट्टीची मागणी
सुरेश पाटील यांच्या वक्तव्याचा विरोध सगळीकडेच होत असून त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. काहींनी वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली असून पक्ष काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे.
बोगस ठराव प्रकरणी लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचासह एक सदस्य अपात्र
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा महत्वपूर्ण निर्णय
लोणी ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का तालुक्यात खळबळ
परंडा (भजनदास गुडे ) पदाचा दुरुपयोग करून शेत रस्त्याचा बोगस ठराव तहसिल कार्यालयात दाखल केल्या प्रकरणी परंडा तालूक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच,उप सरपंचा सह एका सदस्याला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी अपात्र ठरवील्याने लोणी सह तालूक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
लोणी येथिल तक्रारदार विठ्ठल सर्जेराव शिंदे यांनी ॲड.विजयकुमार शिंदे यांच्या मार्फत विभागीय आयुक्त यांच्या निर्णया विरूद्ध ग्रामविकास मंत्री गीरीष महाजन यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते.
या बाबत सवीस्तर वृत्त असे की विठ्ठल शिंदे यांनी लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी शिंदे,उपसरपंच विनोद शिंदे व ग्रामपंचायत सदस्या प्रियंका माळी यांच्या विरूध्द ऐनापूर वाडी शिवारातील गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामसेवक यांच्या परस्पर बोगस ठराव जोडून तहसिल कार्यालयात दाखल केल्याने त्यांच्या विरूद्ध कारवाई करावी अशी लेखी तक्रार शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे दाखल केली होती.
या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही साठी सदर प्रकरण विभागीय आयूक्त यांच्या कडे सुनावणी साठी दाखल करण्यात आले होते.मात्र दि ८ फेबुवारी २०२३ रोजी तक्रादार विठ्ठल शिंदे यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात आला होता. विभागीय आयूक्त यांच्या निर्णया विरूद्ध तक्रारदार विठ्ठल शिंदे यांनी ॲड.विजयकुमार शिंदे यांच्या मार्फत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे दि १७ जानेवारी २०२३ रोजी अपील दाखल केले होते.दि २१ जून २०२३ रोजी सदरील प्रकरणाची मुंबई येथून व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणी मध्ये ऐनापूरवाडी येथील जमीन गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्याच्या ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला नसल्याचे पत्र ग्रामसेवक यांनी दि २८ मार्च २०२२ रोजी तक्रारदार विठ्ठल शिंदे यांना दिले होते.
याच मुद्दावर ॲड. विजयकुमार शिंदे यांनी यूक्तीवाद करून अर्जदाराची बाजू मांडली सर्व कागद पत्राची पडताळणी करून ग्रामविकास मंत्री गीरीष महाजन यांनी विभागीय आयूक्त यांचे आदेश रद्द करून विठ्ठल शिंदे यांचे अपील मंजूर केले आहे.
सरपंच श्रीमती राणी शहाजी शिंदे यांना सरपंच व सदस्य पदावरून तर उप सरपंच विनोद पांडूरंग शिंदे यांना उपसरपंच पदावरून व सदस्य पदावरून तर ग्रा.प सदस्या श्रीमती प्रियंका माळी यांना सदस्य पदावरून काढून टाकन्यात येत असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिला आहे.
एकाच वेळी सरपंच,उप सरपंच पदासह सदस्यत्व व एकाचे सदस्य रद्द होऊन आपात्र होण्याची तालूक्यातील पहिलीच घटणा असल्याने तालूक्यात खळबळ उडाली आहे.
या शाळा अनधिकृत, प्रवेश घेऊ नका – शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांचे आवाहन
धाराशिव –
धाराशिव जिल्ह्यामध्ये शासनाची परवानगी न घेताच अनाधिकृतरित्या खाजगी प्राथमिक शाळा सुरु केल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विभागास अहवाल सादर केले आहेत. त्या अहवालानुसार सदर शाळा अनाधिकृत असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. तरी पालकांनी पुढील शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंके यांनी केले आहे.
तेर येथील चंद्रकला देवी पाटील इंग्लीश स्कूल आणि लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूल, चिखली येथील विश्वप्राप्ती इंग्लीश स्कूल आणि गांधी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कूल, भूम तालुक्यातील खंडेश्वर पब्लीक स्कूल पार्डी रोड भूम, कळंब तालुक्यातील डिकसळ येथील शारदा इंग्लीश स्कूल आणि आवाड शिरपुरा काळदाते वस्ती येथील जिजाऊ इंग्लीश स्कूल, वाशी तालुक्यातील वाशी फाटा (टेंभीआई) येथील संस्कार प्रबोधिनी गुरुकल, खामकरवाडी येथील ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल, शेकापूर रोड उस्मानाबाद येथील स्टेपिंग स्टोन इंग्लीश प्रायमरी स्कूल (इयत्ता सहावी आणि सातवी वर्ग), उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील सनराईज इंग्लीश स्कूल (इयत्ता पाचवी ते आठवी वर्ग) या शाळांमध्ये प्रवेश घेण्यात येवू नयेत.
































































