धाराशिव जिल्ह्यात समाजकल्याण विभागातील लाचमागणी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडितास देण्यात येणाऱ्या अर्थसाह्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे ४७ वर्षीय पुरुष असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये, तर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४, ७ आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी केली. या दरम्यान समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र, कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे यांनी ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारीची सत्यता निष्पन्न झाल्यानंतर ११ आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी पंचांसमक्ष सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र, आरोपीस संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि भेट घेणे टाळले. त्यानंतर आज आरोपी रमेश मालू वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले. ही संपूर्ण कारवाई समाजकल्याण कार्यालय, धाराशिव येथे पार पडली.
आरोपीच्या अंगझडतीदरम्यान अंदाजे ४० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिवा दुचाकी, सुमारे १० हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल हँडसेट तसेच दोन पेन मिळून आले. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून, आवश्यकतेनुसार तो जप्त करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.
या कारवाईचे फिर्यादी सरकारतर्फे पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे असून, सापळा अधिकारी म्हणून त्यांनी ही कारवाई पार पाडली. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांचे पर्यवेक्षण होते. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी आणि शशिकांत हजारें यांचा समावेश होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे तसेच अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
परंडा आणि भूम नगरपालिकेत सत्ता स्थापन करत मारली मुसंडी
एकटा बास सोशल समाज माध्यमावर प्रतिक्रिया
धाराशिव – भूम परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखला असून भूम व परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्हीही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आले आहेत. परंडा येथे जाकीर सौदागर हे 189 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याचबरोबर तिथं आठ नगरसेवक शिवसेनेला मिळाले आहेत तर भूम मध्ये देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे ह्या 198 मताने निवडून आल्या असून तिथे देखील सहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी ,काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सगळेच पक्ष एकत्र आले असून त्यांनी दोन्ही ठिकाणी सावंतांच्या पॅनल विरोधात पॅनल उभा केले होते एवढेच नाही तर यावेळी आर्थिक रसद देखील जिल्ह्यातील धाराशिव च्या बड्या नेत्याने पुरवली असल्याची चर्चा रंगली होती त्यामुळे सर्वपक्षीय सावंतांच्या विरोधात एकवटल्याने या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका रंजक झाल्या होत्या.शेवटी तानाजी सावंत यांनी विधानसभेप्रमाणेच शेवटच्या क्षणी दोन्ही साथीदाराच्या सोबत खंबीरपणे उभा राहत या पालिका आपल्या ताब्यात मिळवत सर्वपक्षीय विरोधकांना धोबीपछाड देत आपले वर्चस्व सिद्ध करत गड राखला आहे.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
भूम प्रतिनिधी :- शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालयासमोरील तीव्र उतार पुन्हा एकदा अपघातास कारणीभूत ठरला आहे. शनिवारी (दि. २०) सकाळी आणि दुपारी केवळ काही तासांच्या अंतराने ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पलटी झाल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही अपघातांत ट्रॅक्टरसह एका चारचाकी कारचे, दुचाकी बुलेटचे तसेच संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याचा ऊस ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २५ ए.डब्ल्यू. ३६५२ व एम.एच. १३ बी.आर. ३१६ द्वारे महाविद्यालयाच्या रस्त्याने वाहतूक केली जात होती. सकाळी अंदाजे ११ वाजता पहिला ट्रॅक्टर उतारावरून वेगाने उतरत असताना समोर अचानक आलेल्या दुचाकीला वाचविताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात रस्त्यालगत असलेले अमर जमादार यांचे ‘ए. जे. मोटर्स’ दुकान आणि दुकाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचा थोडक्यात बचाव झाला.
दरम्यान, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी ऊस वाहतूक करणारा दुसरा ट्रॅक्टरही पलटी झाला. या अपघातात एका चारचाकी कारचे व बुलेटचे मोठे नुकसान झाले.
एकाच दिवशी दोन अपघात घडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयासमोरील उतारावर गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नाही आणि त्यामुळेच वारंवार अपघात होतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ठिकाणी तातडीने गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग उभारावे, अशी जोरदार मागणी होत असून महाविद्यालय प्रशासनाने यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
धाराशिव : पेट्रोल पंपातून पाणीमिश्रित डिझेल दिल्याने वाहनाचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार मुकुंद पि. बाळासाहेब माढेकर (वय ३६, रा. रामनगर, उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पाणी मिश्रित डिझेलमुळे त्यांच्या चारचाकी वाहनाचे इंजिन बंद पडले, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती खर्च करावा लागला, असा आरोप करण्यात आला होता.
२३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री डिझेल भरल्यानंतर काही अंतरावरच गाडी बंद पडल्याचे तक्रारदाराने सांगितले. पुढील दिवशी वाहन टोईंगसाठी ४,००० रुपये, दुरुस्तीकरिता २,६९१ रुपये आणि पुढील तपासणी व अंदाजित दुरुस्तीमध्ये तब्बल १.२५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे जॉबकार्डमध्ये नमूद करण्यात आले होते. चव्हाण मोटर्स आणि सोलापूर वर्कशॉपच्या अहवालात स्पष्टपणे “पाणीमिश्रित डिझेलमुळे इंजिन नॉकिंग” असल्याचे उल्लेख आढळले.
सामनेवाले पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आरोप नाकारले असले तरी, आयोगाने पुराव्यांच्या आधारे सेवा त्रुटी अंशतः सिद्ध झाल्याचे नमूद केले. इंधन पावती, अधिकृत सर्विस केंद्राचा अहवाल आणि घटनाक्रमातील सुसूत्रता लक्षात घेऊन आयोगाने तक्रारदारास नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरवले.
या प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष प्रज्ञा हेंढे आणि सदस्य वैशाली बोराडे यांनी केली. जवळपास ३ वर्षे ३ महिने ९ दिवस सुनावणी चालल्यानंतर हा निर्णायक आदेश पारित करण्यात आला.
का आहे हा निकाल महत्त्वाचा?
- पाणीमिश्रित इंधनप्रकरणी ग्राहकाची बाजू सिद्ध होण्याचे दुर्मिळ उदाहरण
- अधिकृत सर्व्हिस सेंटरचे जॉबकार्ड निर्णायक पुरावा
- पेट्रोल पंपांच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि इंधन वितरणातील गुणवत्ता राखण्यासाठी आयोगाचा हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे कायदेविषयक तज्ञांचे मत आहे.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
मतदानाला 36 तास शिल्लक असताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडून धाराशिव नगरपालिकेत 2017 ते 2020 काळात 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप !
धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या मतदानासाठी अवघे छत्तीस तास शिल्लक असताना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेत 2017 ते 2020 या काळात नगराध्यक्षांनी अडीचशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप स्थानिक लेखा परीक्षणाचा हवाला देत करण्यात आले असून स्थानिक लेखापरीक्षणात अनियमितता केल्याचा उल्लेख आहे ही अनियमित्ता आहे की भ्रष्टाचार आहे आणि त्यावर अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही याचे उत्तर भाजपकडून देण्यात आले नाही तसेच या पत्रकार परिषदेत उपस्थित युवराज नळे नगरपालिकेत गटनेते होते त्या काळात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा अनियमितता झाल्याच्या चर्चा कधीच घडल्या नाहीत या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
तत्पूर्वी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले की, विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नाही.नगरपालिकेची निवडणूक महत्वाची, ज्याचं सरकार होतं त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं ते नाही झालं.मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील याच्यावर बोलण्यापेक्षा संभ्रम निर्माण करून मत मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून आम्हीवचननामा जाहीर केला तो दारोदारी पोहचवण्यात काम सुरू आहे. विकासाचं व्हिजन न मांडता विरोधक टीका करत असल्याचे ते म्हणाले.
हे प्रकरण आजपर्यंत का काढले नाही?
आरोप केलेले प्रकरण जर गंभीर असेल तर हे प्रकरण आजपर्यंत का काढले गेले नाही. प्रशासकाच्या काळात राज्यात भाजपची सत्ता असताना यावर भाष्य न केले गेल्याने आरोपात तथ्य आहे की नाही याचा मागमूस लागेल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र भाजप त्यांची सत्ता असताना देखील आजपर्यंत गप्प का हा मोठा प्रश्न आहे.
त्यावेळचे उपाध्यक्ष आता उमेदवार आणि युतीत!
शेवटच्या दोन वर्षाच्या काळात नगरपालिकेचे उपाध्यक्षपद अभय इंगळे यांच्याकडे होते या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मी संख्येच्या बळावर उपाध्यक्ष होतो मला विशेष अधिकार नव्हते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सत्तेच्या सुरुवातीच्या काळात सूरज साळुंके हे उपाध्यक्षपदी होते ते सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून त्यांच्या पक्षाने नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र विरोधकांचे संख्याबळ कमी नव्हते तरीदेखील अशी प्रकरणे तेव्हा बाहेर निघाली नाहीत त्यामुळे या प्रकरणात सत्तेतील कोणी अडकत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.
पत्रकार परिषदेत काही प्रकरणांचा उल्लेख
स्वच्छतागृहांचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेसाठी 54 लाख खर्च, त्यांना पाणीपुरवठा करायसाठी 17 लाख खर्च,260 किमी रस्ते साफ करताना 1कोटी 42 लाख,नाली साफ करण्यासाठी 1 कोटी 46 लाख खर्च,25 लाख रुपयांची फवारणी,साहित्य खरेदीसाठी 93 लाख खर्च,औषध खरेदीत 1 कोटीचा भ्रष्टाचार आदी प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी आरोप केले
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
चार ठिकाणी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका आ. राणाजगजितसिंह पाटील
त्या चार ठिकाणी भाजपचा ‘माणूस’ कोण भाजपचा छुपा पाठिंबा कोणाला? की भाजपला छुप्या पाठिंब्याची गरज?
धाराशिव – अवघ्या काही तासांनी धाराशिव शहरात मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत मात्र शहरात छुपी युती कोणाकोणाची आहे याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असताना आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वक्तव्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. भाजपने प्रभाग 17 आणि 18 मध्ये आपले उमेदवार दिलेले नाहीत. त्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांना विचारले असता त्यांनी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले. भाजपाने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना युतीत घेतले नाही.दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. बोलणी मध्ये त्यांनी दोन्ही पक्षांना कमी जागा देण्याचे ठरवल्याने युती फिस्कटली मात्र भाजपने प्रभाग 17 आणि 18 मध्ये उमेदवार का दिले नसावेत? तिथे उमेदवार न दिल्याने त्याचा काय परिणाम होणार? दोन्ही प्रभागामध्ये मुस्लिम मतदार जास्त आहेत. तिथे छुपी मदत घेऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतविभागणी करण्याची भाजपची रणनीती आहे का? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट हा पुरोगामी विचारांचा पक्ष मानला जातो त्यांना भाजपने सोबत घेऊन मुस्लिम बहुल भागात उमेदवार देता आले असते मात्र भाजपने ते केले नाही. भाजप काँग्रेसची मदत घेऊ शकत नाही. मग तिथल्या मदतीचा भाजप कुठे उपयोग करून घेणार?
भाजपसारख्या देशात सत्ता असणाऱ्या पक्षाला इथे उमेदवार का मिळाले नसतील? उमेदवारी न देण्यामागे भाजपची नेमकी रणनीती काय? भाजपचा मतदार कोणाला मतदान करणार? हाताला? घड्याळाला? पतंगाला? की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला? हे मतमोजणीत समजू शकेल मात्र उमेदवारच न देण्याची रणनीती मतविभाजनासाठी आहे की काय याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
त्या दोन प्रभागात सभा घेऊ – आ. राणाजगजितसिंह पाटील
प्रभाग 17 आणि 18 मध्ये उमेदवार दिले नाहीत यावर ही ही भूमिका पक्षाची भूमिका असल्याचे आ. पाटील म्हणाले मात्र खोचक उत्तर देताना दोन प्रभागाच्या मध्यावर एखादी सभा घेऊ असे देखील म्हणाले मात्र जिथे उमेदवारच दिले नाहीत तिथे सभा कोणासाठी घेणार हा प्रश्न आहे. केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी ही सभा आयोजित केली जाईल का याबाबत शंका असून दोन्ही प्रभागात भाजप प्रचार का करत नाही? त्यांचा ‘ माणूस’ कोण हे नागरिक ओळखतील का? त्यांचा छुपा पाठिंबा किंवा त्यांना कोणाचा छुपा पाठिंबा आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल.
तुतारी सोबत स्पर्धेचा प्रचार
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमची तुतारीसोबत स्पर्धा असल्याचे भाजपाचे नेते जाहीर सांगत आहेत तसा प्रचार करत आहेत मात्र राज्यात भाजपचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष, संपलेला पक्ष असे हिणवतात हा पक्ष धाराशिव मध्ये अचानक स्पर्धक कसा झाला की यामागे कुठली छुपी रणनीती आहे हे मतमोजणी नंतर समजणार आहे.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!