धाराशिव दि.20(प्रतिनिधी):-वित्तीय वर्ष सन 2023-2024 या वर्षाच्या रक्कमांचे सर्व व्यवहार 31 मार्च 2024 रोजी पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये आणि नागरीकांना शासकीय रक्कमांचा बँकेत भरणा करण्यासाठी तसेच बँकेतून रक्कमा काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील शासकीय रक्कमेचा देवाण-घेवाणीचा व्यवहार करणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँका रविवार 31 मार्च - 2024 रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.
31 मार्चला बॅंका रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याचेजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
दिल्लीवारी झाली तरी महायुतीचा पैलवान ठरेना, खा. राजेनिंबाळकरांचा गावभेटीवर भर
धाराशिव – ७ मे रोजी उस्मानाबाद लोकसभेसाठी मतदान होणार आहे मात्र अद्यापही महायुती आणि इतर पक्षातील उमेदवार जाहीर होत नसल्याने लोकसभेच्या आखाड्यात कोणते पैलवान उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर गावभेट दौरा करत आहेत.
महायुतीतील विशेषतः शिवसेनेतील काही नेते दिल्ली येथे तळ ठोकून होते तिथे काही नेत्यांशी गाठीभेटी त्यांनी घेतल्या आज ते मुंबईत आहेत मात्र त्यांना तिकीट न देण्यावर भाजप ठाम आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यातील नेमका तपशील समोर आला नसला तरी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी तिकीट आजच फायनल होईल असे विश्वासाने सांगत होते. तर भाजपचे काही पदाधिकारी दिल्लीत असल्याची चर्चा होती मात्र एका महत्वाच्या नेत्याने त्याला दुजोरा दिला नाही. राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार यांना देखील महायुती कडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे ते देखील मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
तर बसपा सह इतर पक्षांनी देखील आपली आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे मात्र त्यांचे देखील उमेदवार न ठरल्याने लढत कशी होणार हे अस्पष्टच आहे.
असा मध्यमार्ग निघण्याची शक्यता
भाजप उस्मानाबाद लोकसभेचा दावा सोडण्यास तयार नाही त्यात ही जागा आमची आहे उमेदवार आमचाच असेल असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे मात्र शिवसेना देईल तोच उमेदवार मात्र भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा मध्यममार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तग धरण्यासाठी मुंबईच
खासदार झाल्यास दिल्लीतील राजकारणात जावे लागते परिणामी भविष्यातील मंत्रिपद, पालकमंत्रिपद जाते. त्यामुळेच पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील हे स्वतः निवडणूक लढवण्यास तयार नाहीत मात्र महायुतीच्या नेत्यांकडून दोघांपैकी एक उमेदवार प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देऊ शकतो असा विश्वास असल्याने त्यांनाच ही निवडणूक लढविण्याची गळ घातली गेली होती.
राजकीय पक्षांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण,निवडणूक काळात विविध परवानग्या देतांनाराजकीय पक्षांना सहकार्य करण्यात येईल-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
धाराशिव,दि.19(प्रतिनिधी): येत्या 7 मे रोजी होणाऱ्या 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्षांचे तसेच अन्य उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्या देतांना सहकार्य करण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी विविध परवानग्या मिळण्यासाठी सुविधा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सुविधा पोर्टलची माहिती, नामांकन अर्ज सादर करणे, प्रतिज्ञापत्र भरणे आणि विविध परवानग्या मिळणे तसेच माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची कामे याची माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.ओम्बासे बोलत होते.
यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी तथा संगणक सुरक्षा, आयटी ॲप्लीकेशन कक्षाचे नोडल अधिकारी पुरुषोत्तम रुकमे, महसूल तहसिलदार तथा सी-व्हिजील व विविध परवाने कक्षाचे नोडल अधिकारी प्रवीण पांडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.ओम्बासे म्हणाले, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने सुविधा पोर्टलवर एकदा नोंदणी करावी म्हणजे उमेदवारांचे निवडणूकविषयक नामांकन अर्ज दाखल करणे, प्रतिज्ञापत्र देणे आणि विविध निवडणूकविषयक परवानग्या काढणे याबाबीस हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांना निवडणूकविषयक कामे करणे सोपे जाणार आहे. जे राजकीय पक्ष सुविधा पोर्टलवर विविध परवानग्या मिळण्यासाठी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम परवानग्या दिल्या जातील. अशाप्रकारे कामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
श्री.पांडे यांनी एक खिडकी कक्षातून तात्पुरते पक्ष कार्यालयासाठी अर्ज करणे, ना हरकत प्रमाणपत्र व परवानगी पत्राचे नमुने तसेच सुविधा पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करुन परवानग्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
उमेदवार व त्यांना प्रतिनिधींनी ऑनलाईन परवानग्या मिळण्यासाठी अर्ज करावे असे सांगून श्री.पांडे म्हणाले, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना काही परवानग्या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्राकरीता पाहिजे असल्यास त्यांनी संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करुन त्या परवानग्या घ्याव्यात. संपूर्ण लोकसभा क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या परवानग्या घ्यायच्या असल्यास त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून घ्याव्यात. जे वाहन निवडणूक प्रचारात वापरण्यात येणार आहे, त्या वाहनाचे चारही बाजूंचे फोटो उपलब्ध करुन द्यावे. ज्या ठिकाणी कॉर्नर सभा व रॅली काढण्यात येणार आहे, त्या ठिकाणची व त्या मार्गाचे संबंधितांचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलीकॉप्टरने येणाऱ्या राजकीय नेत्यांचे हेलीकॉप्टर उतरविण्याच्या ठिकाणची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून देण्यात येणार असल्याचे श्री.पांडे यांनी सांगितले.
श्री.रुकमे यांनी सुविधा पोर्टलची माहिती दिली. उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूकविषयक विविध परवानग्या या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन व आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन मिळविता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष परवानग्या मिळविण्याचा त्रास वाचण्यास मदत होणार आहे.
उमेदवार किंवा प्रतिनिधींना सुविधा पोर्टलवरुन विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी संबंधिताचा मोबाईल क्रमांक, ई-मेल, उमेदवाराचे संपूर्ण नांव व जन्मतारीख पोर्टलवर नमुद करणे आवश्यक आहे. असे सांगून श्री रुकमे म्हणाले, सुविधा पोर्टलवर उमेदवार व राजकीय पक्षांना अर्ज करता येतील. उमेदवारांचे नामांकन ऑनलाईन भरण्याची सुविधा या सुविधा पोर्टलवर आहे. प्रतिज्ञापत्र देणे व विविध परवानग्या काढण्याची सुविधा या पोर्टलवर आहे. उमेदवाराने सुविधा पोर्टलवर एकदा नोंदणी करावी म्हणजे उमेदवारांचे निवडणूकविषयक नामांकन अर्ज दाखल करणे, प्रतिज्ञापत्र देणे व परवानग्या काढणे ह्या बाबी सोप्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खडसे यांनी माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यपध्दतीची माहिती दिली. ही समिती राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण, पेडन्युज संबंधित कामकाज, निवडणूक खर्चाच्या दृष्टिकोणातून जाहिरातीवर लक्ष ठेवण्यासोबतच निवडणूकविषयक पॉम्पलेटस, पोस्टर हॅन्डबील यावरही समितीचे संनियंत्रण राहणार आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी 3 दिवस अगोदर अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. हस्तपत्र, घडीपत्रिका किंवा भित्तीपत्रके मुद्रक आणि प्रकाशकाच्या उल्लेखाशिवाय प्रकाशित करु नये. असे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांसाठी आयोजित या प्रशिक्षणाला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते, शिवसेना (ठाकरे गट) संदिप खोचरे, वंचित बहुजन आघाडीचे शितल चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव प्रविण जगताप, जिल्हा सचिव सादीकखॉ पठाण यांची उपस्थिती होती.
१० हजाराची लाच घेतली, दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
धाराशिव – १० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी वाशी दुय्यम निबंधक कार्यालयातील संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, यांस धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे वकिल असुन ते बॅांड रायटर म्हणुन काम करतात. तक्रारदार यांचे अशील यांचे कडकनाथवाडी, तालुका वाशी येथील 02 ठिकाणच्या जमिनीचे खरेदीखत करुन दस्त नोंदणी करुन देण्यासाठी आलोसे संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, धंदा-नोकरी, पद-कनिष्ठ लिपीक प्रभारी दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, वाशी, जिल्हा-धाराशीव याने तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 02 दस्तचे प्रत्येकी 5000/- रुपये प्रमाणे एकुण 10,000/- रुपये लाचेची मागणी करून 10,000/- रु. लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे यांचा समावेश होता तर सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक हे होते.
जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्याकरीता ३२०० लाच घेतली, दोघांवर कारवाई
धाराशिव –
जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्याकरीता ३२०० घेतल्याप्रकरणी,
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, धाराशिव येथील प्रकल्प सहाय्यक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. याबाबत माहिती अशी कीयातील तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, धाराशीव येथे अर्ज दिला होता. यातील इलोसे, बुध्दभुषण दिलीपराव माने, प्रकल्प सहाय्यक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, धाराशीव यांनी तक्रारदार यांचे मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 3200/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम खाजगी इसम शाहबाज शफीक सय्यद, यांचे मार्फतीने स्वीकारली असता इलोसे व खाजगी इसम यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा पथकात पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके, सचिन शेवाळे, अविनाश आचार्य, नागेश शेरकर यांचा समावेश होता तर सापळा अधिकारी म्हणून -विकास राठोड, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव यांनी काम पाहिले.
अमृत 2.0 योजनेअंतर्गत उमरगा शहरातील नवीन पाणीपुरवठासाठी 185 कोटी रू. मंजुर आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती
उमरगा शहरातील नागरिकांना माकणी धरणातून पाइपलाइन द्वारे पाणी येते. परंतु मागील काही वर्षांपासून ही पाईपलाईन फुटल्यामुळे जागोजागी पाणी वाया जात होते. व पाइपलाइन फुटली की शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उशीर होत होता.
यामुळे आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. अखेर या पाठपुराव्यास यश आले असून
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दि.15 रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या केंद्र शासन पुरस्कृत अटल 2.0 अमृत अभियान अंतर्गत उमरगा शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सुमारे 185 कोटी रुपयांचा निधी झालं आहे. यामध्ये प्रकल्प किमतीच्या 50 टक्के हिस्सा केंद्र शासन, 45 टक्के हिस्सा राज्य शासन व 5 टक्के हिस्सा नगर परिषद भरणार आहे. सदर निधीतून माकणी ते उमरगा नव्याने पाइपलाइन व शहरात अंतर्गत नवीन पाइपलाइनची कामे होणार आहेत. यामुळे उमरगा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असुन भविष्यात उमरगेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. उमरगा शहरातील हद्दवाढ भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
सदर कामासाठी निधी मंजुर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , पालकमंत्री तानाजी सावंत तसेच सदरकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मा.खासदार प्रा. रविंद्र गायकवाड सर यांचे आभार मानले आहेत.
येडेश्वरी यात्रेच्या तयारीसाठी उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

येरमाळा प्रतिनिधी :अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी ची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र येरमाळा येथील आई येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा महोत्सव ता. २२ एप्रिल पासून सुरू होत असून महाराष्ट्रासह पर राज्यातून लाखो भाविक येरमळ्यात दाखल होतात. भाविक यात्रा काळात येरमळ्यात मुक्कामी असून यांच्या सोयीसुविधा साठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कार्यालाय व विविध विभगांच्या प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा २२ एप्रिल पासून सुरू होत असून या यात्रा दरम्यान देवीच्या दर्शनासाठी तसेच चुन्याच्या रानातली चुनखडी वेचण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व परराज्यातून जवळपास १० ते १५ लाख भाविक येरमाळा नगरीत दाखल होतात.
या यात्रेच्या पूर्ववत तयारीच्या अनुषंगाने येडेश्वरी मंदिर ट्रस्ट. ग्रामपंचायत कार्यालय. पोलीस प्रशासन, महावितरण व आरोग्य विभागाची तयारी करण्यासाठी येणाऱ्या यात्रा काळात सर्व सुखसोयीयुक्त यात्रा पार पाडण्यासाठी, तसेच सध्याची दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता भाविकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग टँकर ने पाणी पुरवठा करणार असून चोराखळी साठवण तलाव, मलकापूर साठवण तलाव येथून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच काही खाजगी टँकर मालक, समाजसेवी संस्था, सामाजिक बांधिलकी जोपासनारे व्यक्ती, व गावकरी यांच्या मार्फत देखील पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
यात्रेच्या सुरक्षते च्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी यांनीही सर्व तयारी करण्यात येणार आहे असे सांगितले.
देवस्थान ट्रस्ट कडून देखील यात्रेची तयारी करण्यात येत असून देवस्थान ट्रस्ट च्या विहिरीचे पाणी भाविकांना पीण्यासाठी वापरन्यात येणार आहे. तसेच मलकापूर साठवण तलावाचे पाणी मंदिरा जवळ असलेल्या दत्त कल्लोळ यामध्ये सोडण्यात येणार आहे.
चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने उपविभागीय दंडाधिकारी संजय पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली येरमाळा ग्रामपंचायत येथे प्रशासकीय आढावा बैठक पार पडली.
चैत्र पौर्णिमेच्या २२ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या यात्रेनिमित्त संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते व यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी आणखीन दोन-तीन मीटिंग घेण्याचे उपविभागीय अधिकारी पाटील साहेब यांनी संबंधित प्रशासनास सांगितले, यावेळी तहसीलदार अवधाने साहेब, बीडिओ चकोर साहेब नैसर्गिक आपत्ती जिल्हा व्यवस्थापन अधिकारी व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,प्रशासन, पत्रकार व गावातील नागरिक उपस्थित होते.
भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजकपदी ज्ञानेश्वर बोधणे
सलगरा,दि.१४ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. या मध्ये सलगरा दिवटी येथील ज्ञानेश्वर शरणाप्पा बोधणे यांची अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे १) संयोजक – ज्ञानेश्वर शरणाप्पा बोधणे, (सलगरा दिवटी, ता.तुळजापूर), २) सहसंयोजक – प्रशांत विलास घोडके, (बलसूर, ता.उमरगा), ३) सहसंयोजक – लखन शहाजी वाघमारे,(बाभळगाव, ता.कळंब) ४) सदस्य – राजेंद्र जाधव, (उमरा, ता.कळंब), ५) सदस्य – भिम सुरवसे,( मुळज,ता.उमरगा), ६) सदस्य – गणपत भोरे, (कार्ला, ता.परंडा), ७) सदस्य – रामभाऊ गुरव, (तांदूळवाडी, ता.परंडा), ८) सदस्य – हरिदास लोखंडे, (तोरंबा, ता.धाराशिव), ९) सदस्य – श्रावण आदटराव (करजखेडा, ता.धाराशिव), १०) सदस्य – जिवनसिंह ठाकूर (मांडवा, ता.वाशी), ११) सदस्य – विष्णुपंत मुंडे, (अणदूर,ता.तुळजापूर), १२) सदस्य – महावीर कासार, (तुळजापूर) १३) सदस्य – प्रभाकर नेलवडे (कोंडजीगड, ता.लोहारा) विशेष म्हणजे येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला चांगले काम करून दाखविण्याची संधी मिळाली आहे, या संधीचे सोने करण्याची जबाबदारी या कार्यकारिणीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याबरोबरच जनजागृती करत आपण सर्व मिळून एकजुटीने खूप चांगले उपक्रम, कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करूया, असे ज्ञानेश्वर बोधणे हे बोलताना म्हणाले.
या झालेल्या निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, मा.आ.सुजितसिंह ठाकूर, जिल्हा अध्यक्ष संताजीराव चालुक्य, मिलिंद पाटील, नितीन काळे, प्रवीण पाठक, रामचंद्र कुलकर्णी, विकास कुलकर्णी, संतोष बोबडे, प्रभाकर मुळे यांनी सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
ईव्हीएम मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला मागविले मार्गदर्शन
धाराशिव – जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांना पत्र लिहीत मार्गदर्शन मागविले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण देणेचे अनुषंगाने उपोषण, रास्ता रोको आयोजित केले जात आहेत, त्यातच मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने मराठा समाजातील नागरीक नाराजीने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये जास्तीत जास्त लोकसभा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास EVM मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार आहे.
मतपत्रीका व मतपेट्यांचा वापर करुन निवडणुक घ्यावयाची झाल्यास त्यासाठी अपुरे मनुष्यबळ, मतपेट्या अनुपलब्धता अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय मतपत्रीकेवर उमेदवारांच्या संख्या वाढल्यास मतपत्रीकाही तीतकीच मोठ्या आकाराची होणार आहे व त्याची घडी घातल्यानंतर मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे व त्यामुळे मतपेट्या देखील मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतपेट्यांची संख्या वाढल्यास मतदान केंद्रात नियुक्त करावयाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांचे संख्येत तसेच सदर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पाठविणे व स्ट्रॉग रुम मध्ये जमा करणेसाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यक्ता भासणार आहे. त्याच प्रमाणे निवडणूका झाल्यास मतमोजणी पावेतो मतपेट्या सुरक्षित ठेवणेकामी जागा देखील अपुरी पडणार आहे.
तरी परिस्थितीचे अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी करण्यास येणा-या अडचणी निदर्शनास आणून देत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रात म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांची धाराशिव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा;औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भुम येथे धडाडणार तोफ
धाराशिव –
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते 5 ठिकाणी जाहिर सभाव्दारे जनतेस संवाद साधणार आहे या जनसंवाद यात्रेचा दौरा खालील प्रमाणे आहे.
दिनांक 07 मार्च 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12 वाजता पोहोचणार असून त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालयात सभा घेणार आहेत व त्यानंतर लामजना, किल्लारी, नारंगवाडी पाटी, नाईचाकुर, कासारशिरसी, मुळज मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत दिनांक 07 मार्च रोजी सायं. 4 वाजता उमरगा येथे कै. शिवाजी दादा मोरे क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी कॉलेज येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर पुष्पक मंगल पार्क, धाराशिव येथे मुक्काम राहणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 08 मार्च रोजी पुष्पक पार्क, धाराशिव येथून आळणी फाटा, ढोकी येथे स्वागत होणार असून ते कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील मार्केट यार्ड येथे 08 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा येथे स्वागत होणार असून कुसळंब, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून सोनारी कडे प्रवास करणार आहेत त्यानंतर अनाळा ,वालवड मार्गे भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे दि. 08 मार्च रोजी सायं. 04.00 वा. नगर पालीकच्या समोर चौकात सभा होणार आहे व सभा संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणार आहेत अशा प्रकारचा दौरा आहे.