Home Blog Page 304

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. 14: राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.

राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.

राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 26 रुग्ण आढळून आले असून पुणे येथे 10, मुंबई 5, रायगड 1, कल्याण 1, अहमदनगर 1, नागपूर 4, ठाणे 1, यवतमाळ 2, कल्याण 1 रुग्ण आढळून आले आहेत.

दैनिक जनमत १५ मार्च E पेपर

2020 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 2020 या वर्षाच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान हमीभावाला मंजुरी देण्यात आली.
सर्वसाधारण दर्जाच्या वाटी खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क़्विटल 9,521 वरून 9,960 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर संपूर्ण खोबरे डोलची किंमत प्रति क़्विटल . 9,920 वरुन 10,300 रुपये एवढी केली आहे. यामुळे खोबरे उत्पादकांना वाटी खोबऱ्यावर  क़्विटलमागे 439 रुपये तर खोबरेडोलावर क़्विटलमागे 380 रुपयांचा लाभ होणार आहे.
देशभरात तयार होणाऱ्या खोबऱ्याचा सरासरी उत्पादन खर्च लक्षात घेऊन वाटी खोबऱ्याच्या उत्पादनातील 50 टक्के खर्च आणि खोबरे डोल उत्पादनातील 55 टक्के खर्च भरून निघावा, या उद्देशाने हा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
कृषी उत्पादने खर्च आणि किंमत आयोगाच्या (CACP). शिफारशींवर आधारित हा हमीभाव देण्यात आला आहे.
देशातील कृषी उत्पादनांच्या खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या तत्वावर हा हमीभाव वाढवण्यात आला आहे.
खोबरे उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

पुणे-उस्मानाबाद-लातूर इंटरसिटी सुरू करावी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांच्या मागणीनुसार २०१४

साली घोषीत केलेल्या उस्मानाबाद- तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईनच्या कामास गती मिळण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमुन संबधित रेल्वे विभागास रेल्वे लाईनचे काम जलदगतीने करावे यासाठी सुचना देण्यात याव्यात, उस्मानाबाद जिल्हयातून धावणारी लातूर-मुंबई अशी एकच रेल्वे गाडी आहे. लातूर जिल्हयातूनच सदरची रेल्वेगाडी प्रवाशांनी पुर्णपणे भरून येते त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील प्रवाशांना जागा उपलब्ध होत नाही. मोठया प्रमाणात प्रवाशांची संख्या असताना देखिल पुणे किंवा मुंबईला ये-जा करण्यासाठी रेल्वेगाडया मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून संसदेत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुणे उस्मानाबाद लातूर इंटरसिटी सुरू करावी अशी मागणी मा. रेल्वे राज्यमंत्री यांना केली. त्याचप्रमाणे कळंब रोड स्टेशन किंवा ढोकी स्टेशन रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांना थांबा देण्यात यावा अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे उस्मानाबाद ​रेल्वे स्थानकावर रॅक पाईंट उपलब्ध असून प्लॅटफॉर्म व आवश्यक शेड उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून संसदेत मांडल्या.

कोविड-19 आजाराचे नवीन रुग्ण सापडले

 नवी दिल्ली:- देशभरात कोविड-19 आजाराचे आतापर्यंत एकूण 43 रुग्ण सापडले आहेत. त्यातले 40 रुग्ण उपचाराधीन असून, त्यात केरळमधल्या 3 घरी पाठविलेल्या रुग्णांचा समावेश आहे. कालच्या बातमीनंतर आतापर्यंत 4 नवीन रुग्ण सापडले असून, त्यात एक रुग्‍ण केरळ (एर्नाकुलम), एक दिल्ली, एक उत्तर प्रदेश आणि एक रुग्ण जम्मूमध्ये आढळला आहे.
काल आढळलेल्या केरळमधल्या 5 रुग्णांपैकी 3 जण एकाच कुटुंबातील असून, ते नुकतेच इटलीहून परतले होते. उरलेले 2 रुग्ण त्यांचेच नातेवाईक असून, ते या बाधित कुटुंबियांना भेटले होते. बाधित कुटुंबियांनी इटलीहून परतल्यानंतर काही नातेवाईकांना भेट दिली होती आणि काही समारंभांनाही हजेरी लावली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांना शोधून त्यांची चाचणी करण्याचे काम सध्या सुरु आहे.
देशभरातून एकूण 3003 नमुन्यांची कोविड-19 साठी चाचणी करण्यात आली होती, त्यातील 2,694 नमुने विषाणूमुक्त असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे एकूण 43 नमुनेच विषाणूबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत परेदशातून आलेल्या एकूण 8 लाख 74 हजार 708 प्रवाशांची विषाणू चाचणी विमानतळांवरच करण्यात आली असून, त्यातील 1 हजार 921 प्रवाशांमध्ये विषाणूंची लक्षणे दिसून आली होती. त्यातील 177 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 33 हजार 599 प्रवासी निरीक्षणाखाली असून, 21 हजार 867 प्रवाशांचा निरिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे.
परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी त्यांना भरण्यासाठी दिलेल्या स्व-घोषणा (self-declaration) पत्रिका योग्य रीतीने भराव्यात, तसेच आपण कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊन आलो आहोत, त्याची पूर्ण माहिती अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथल्या रुग्णाची कोविड-19 साठी केलेली चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोविड-19 आजाराने एकही मृत्यू झाला नसल्याचे विशेष आरोग्य सचिवांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन कोविड-19 बद्दलच्या चालू परिस्थितीचा, केलेल्या कार्यवाहीचा आणि राज्यांच्या याबद्दलच्या तयारीचा आढावा सतत घेत आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव याबद्दलच्या परिस्थितीचा आढावा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांबरोबर सतत घेत आहेत.
आरोग्‍य मंत्रालयाने जनतेला आवाहन केले आहे, की या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपाययोजनांचा, खोकतांना घेण्याच्या काळजीचा आणि हात वारंवार धुण्याच्या सवयीचा अवलंब करावा, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.