Home Blog Page 3

सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी; छावा संघटनेची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे तक्रार

धाराशिव – सणासुदीच्या आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेने केला आहे. या अन्यायकारक लुटीविरोधात छावा संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राकेश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याने व परिवहन विभागाने ठरवलेले अधिकृत दर न पाळता काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. प्रवाशांकडून आकारले जाणारे अवाजवी दर पाहता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :

  • सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे.
  • जास्तीचे भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करावी.
  • अधिकृत भाडेदरांची यादी बसस्थानकांवर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
  • विशेष तपासणी पथक नेमून अवाजवी दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कार्यवाही करावी.
  • प्रवाशांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सक्रिय ठेवावी व त्यावर तत्काळ कारवाई करावी.
  • काही ट्रॅव्हल्स परमिटशिवाय वाहने चालवत असून, फिटनेस, विमा व चालक परवाना नियमांचे पालन होत नाही.

प्रवाशांच्या आर्थिक व शारीरिक सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्या तातडीने मान्य करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.

धाराशिव शहर काँग्रेसकडून नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन

धाराशिव | दि. 26 ऑगस्ट 2025

धाराशिव शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासन व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शहर काँग्रेसतर्फे आज नगर परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नागरिकांना मुलभूत सुविधा न मिळाल्याने त्रस्त जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही विविध निवेदने, आंदोलने तसेच दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या चर्चेत हे मुद्दे मांडण्यात आले होते. परंतु समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या :

  1. शहरातील अस्वच्छता व दुर्गंधी दूर करून नियमित व योग्य स्वच्छता व्यवस्था करावी.
  2. भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
  3. धिम्या गतीने सुरू असलेली भुयारी गटार योजना दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावी.
  4. मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते व नाल्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी.
  5. शहरात नागरिकांसाठी उद्यानांची निर्मिती व सुशोभीकरण करावे.
  6. आठवडी व दररोजच्या बाजारातील सोयीसुविधा वाढवाव्यात.
  7. बंद पडलेले पथदिवे कार्यान्वित करावेत.
  8. पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करावा.
  9. कचरा डेपोचे स्थलांतर करून रहिवाशांना दिलासा द्यावा.
  10. भोगावती नदी स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी ठोस नियोजन करावे.
  11. रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवून आरोग्य धोक्यांपासून नागरिकांना वाचवावे.
  12. वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी.
  13. जुन्या तात्पुरत्या मंजूर रेखांकनांना अंतिम मंजुरी द्यावी.

आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, ॲड. जावेद काझी, डॉ. स्मिता शहापूरकर, सय्यद नादेरुल्लाह, विजय मुद्दे, उस्मान कुरेशी, मिलिंद बनसोडे, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, मन्सूर कुरेशी, एक्बाल कुरेशी, यासेर काजी, सरफराज काजी, धवलसिंह लावंड, सागर गायकवाड, अलीम एल.डी., हरिदास शिंदे, कपिल सय्यद, सय्यद काजी, शेख मुद्दिक, महादेव पेठे, संतोष पाटील, अब्दुल लतीफ, शहानवाज सय्यद, प्रशांत पाटील, संजय गजधने, आनंद बनसोडे, सय्यद मन्सूर, जयसिंग पवार, शिंदे विश्वासराव, उमेश राजेनिंबाळकर, अजहर पठाण, शेख हज्जू, शेख नूर, ऋषिकेश बनसोडे, अभिषेक बनसोडे, नंदकुमार पडवळ, राजेंद्र कुराडे, ॲड. राजुदास आडे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसने इशारा दिला आहे की, जर वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक पाऊले उचलली नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.

तुळजापूरमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: पिता-पुत्राची १६ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

धाराशिव, २४ ऑगस्ट २०२५: डिजिटल युगात वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. तुळजापूर तालुक्यातील एका ५४ वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या मुलाची अज्ञात आरोपींनी जास्त पैशांच्या आमिषाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनेच्या तपशीलानुसार, फिर्यादी कालीदास लिंबाजी गवळी (वय ५४ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, कणे गल्ली, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या मुलाला कृष्णा याला आरोपींनी जास्त पैशांचे आमिष दाखवले. शासनाने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातलेली असतानाही, आरोपींनी ‘exchange.com’ नावाची एक बनावट लिंक तयार करून ती व्हॉट्सअॅपवर पाठवली. या लिंकद्वारे फिर्यादी आणि त्यांच्या मुलाची एकूण १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

फिर्यादीनुसार, आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरांवरून संपर्क साधला. यात ९०९१९१५८९१, ९५६१४६३८०८, ८४८५०१७४९०, ८७६६४०६५०७, ८४४६२२३५८४, ८०१०७८१८३९, ८४४६९६४५५४ आणि ७३९१८२२००८८ या नंबरांचा समावेश आहे. हे नंबर वापरून आरोपींनी विश्वास संपादन करत फिर्यादींना बनावट योजनेत गुंतवले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या घटनेची फिर्याद कालीदास गवळी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७८, ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींच्या मोबाइल नंबर आणि बनावट लिंकचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद

धाराशिव, दि. 23 ऑगस्ट –
धान्याचे गोडाऊन फोडून हरभऱ्याचे कट्टे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांचे पथक पेट्रोलिंगदरम्यान कार्यरत होते. यावेळी संशयित आरोपी गौस वहीद पठाण (वय 50, रा. एकता नगर, धाराशिव) याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारासह ‘विनायक ॲग्रो’ गोडाऊन (मौजे किनी, जि. धाराशिव) येथून हरभऱ्याचे 43 कट्टे (एकूण वजन 2,559 किलो) चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस तपासात उघडकीस आले की, आरोपींनी चोरलेला मुद्देमाल धाराशिव अडत लाईन येथे विकला होता. पोलिसांनी कारवाई करून चोरीस गेलेला हरभरा व गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड वाहन असा एकूण 6.29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासादरम्यान आरोपींनी इतर साथीदारांची नावे देखील सांगितली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.


जंगल सफारी ट्रॅक, तीन महिन्याचे आश्वासन, पण पीपीपी मॉडेलमुळे प्रश्नचिन्ह

धाराशिव – येडशी रामलिंग अभयारण्यात १५ किलोमीटरचा जंगल सफारी ट्रॅक उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, सुमारे तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला काही जिप्सी किंवा तत्सम वाहने भाड्याने घेऊन प्रशिक्षित गाईड आणि ड्रायव्हरमार्फत पर्यटकांना सफारीचा अनुभव दिला जाणार आहे.

निधीचा प्रश्न

या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा खर्च नेमका कुठून भागवला जाणार, यावर अद्याप स्पष्टता नाही. आ.पाटील यांनी हा प्रकल्प पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलमध्ये उभारला जाणार असल्याचे सांगितले. मात्र, बीओटी (Build-Operate-Transfer), जॉइंट व्हेंचर की इतर कोणत्या पद्धतीने हे काम होणार याबाबत त्यांनी खुलासा केलेला नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

जमीन मिळण्याची अडचण

या सफारी ट्रॅकसाठी लागणारी काही जमीन वन विभागाची तर काही रेल्वे विभागाची असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही विभागांकडून परवानगी मिळवण्यासाठी वेळ लागणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ तीन महिन्यांत ट्रॅक तयार होईल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा ठरत आहे.

पीपीपी मॉडेलचे धोके

पीपीपी मॉडेलमुळे प्रकल्प उभारणीसाठी निधी उपलब्ध होतो, पण त्याचे काही तोटेही आहेत.

  • खाजगी कंपन्या नफ्यावर भर देतात, त्यामुळे प्रवेश फी किंवा सेवा शुल्क जास्त आकारले जाण्याची शक्यता असते.
  • जर खाजगी भागीदार अडचणीत आला तर नुकसान सरकारलाच सहन करावे लागते.
  • पारदर्शकतेचा अभाव राहतो; करारातील अटी, खर्च आणि उत्पन्नाचे गणित लोकांसमोर उघड केले जात नाही.
  • गरीब वर्गासाठी ही सेवा महागडी ठरू शकते, ज्यामुळे सामाजिक असमानता वाढू शकते.

निवडणूक डोळ्यासमोर?

दरम्यान, येत्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. येडशी आणि रामलिंग परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा प्रकल्प जाहीर करून तो निवडणूकपूर्व आश्वासन म्हणून वापरला जात असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

धाराशिवकरांचा अपेक्षाभंग?

रामलिंग अभयारण्यात सफारी हा जिल्ह्यातील पर्यटनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. पण जमीन, निधी व पीपीपी मॉडेलमधील अनिश्चितता लक्षात घेता हा प्रकल्प ‘दिवास्वप्न’ ठरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिकांना रोजगार, पर्यटनातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना अश्या अनेक अपेक्षा आहेत. मात्र, अडथळे दूर न केल्यास प्रकल्प अर्धवट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तुळजाभवानी मंदिर शिखर प्रकरणात गोंधळ कायम; एएसआयची भूमिका अस्पष्ट – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा नवा खुलासा

धाराशिव –

तुळजाभवानी मंदिराचे शिखर उतरवले जाणार का? गाभाऱ्यात बदल होणार का? या प्रश्नांवर गेल्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांची भूमिका मांडण्यात आली. मात्र एएसआयची भूमिका  स्पष्ट नव्हती, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आयआयटीसारख्या नामांकित तज्ज्ञ संस्थांची मदत घेऊन नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची भूमिका स्पष्ट नसताना मंदिराची कामे सुरू झाली असल्याने अहवाल कोणाचा ग्राह्य धरला? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित आहे. तुळजाभवानी मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित वास्तू असून त्या मंदिराच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून ए एस आयची भूमिका स्पष्ट नसताना कामांचा खटाटोप कोणासाठी हा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चिला जात आहे.

राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल चर्चेत

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरातील कामे राज्य पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी ७ मार्च २०२५ पासून आजतागायत हा अहवाल पत्रकारांना उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे मंदिरात सुरू असलेल्या कामांबाबतची साशंकता अधिकच वाढली आहे. पत्रकारांनी थेट विचारले असता देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी “राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल उपलब्ध आहे की नाही” याबाबत थेट उत्तर दिले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी विचारणा करा – आ.पाटील

अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे का नाही, या संदर्भात विचारले असता पाटील म्हणाले, “गोंधळ तोंडी बोलण्यातून निर्माण होतो. कुणालाही प्रश्न असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात विचारणा करावी. जिल्हाधिकारी हे मंदिर ट्रस्टचे अध्यक्षही आहेत, ते निश्चितच स्पष्ट लेखी उत्तर देतील.”

अंतिम निर्णय ३० दिवसांत

बैठकीत ठरल्याप्रमाणे ३० दिवसांच्या आत नव्याने स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तयार होईल. त्यानंतर पुन्हा मंत्रीस्तरीय बैठक घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर अंतिम निर्णय घेतला जाईल.


👉 ठळक मुद्दे:

  • एएसआयची भूमिका अस्पष्ट, आयआयटीसारख्या संस्थांकडून नवा अहवाल
  • राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल अद्याप पत्रकारांना उपलब्ध नाही
  • जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी विचारणा करण्याचे आ. पाटील यांचे आवाहन
  • ३० दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल अपेक्षित

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल


ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई – महावितरणमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा सेवाकाल ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग, फोर्ट येथे ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.

या बैठकीस धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांची विशेष उपस्थिती होती. महावितरणचे संचालक (मा.सं.) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) औंढेकर तसेच मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी इतर शासकीय विभागांप्रमाणेच महावितरण सहाय्यकांचा तीन वर्षांचा सेवाकाल नियमित सेवेत गणला जावा, या मागणीसाठी ठामपणे पाठपुरावा केला. यावर समिती नेमून ४५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्रींनी महावितरण प्रशासनाला दिले.

कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी ओंकार केसकर यांनी शासन निर्णय, परिपत्रके व उपदान सेवानियमांचा दाखला देत सहाय्यक पदाचा सेवाकाल ग्राह्य धरण्याची मागणी मांडली. प्रशासनाच्या वतीने सकारात्मक निर्णयाचा शब्द देण्यात आला.

या बैठकीस निलेश भिरंगे, प्रदीप घुले, ज्ञानेश्वर राऊत, समाधान सानप व सोमनाथ टाळकुटे आदी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून ऊर्जा राज्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याची पुढाकार घेतल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांचे कर्मचारी वर्गातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारासह केली तारेची चोरी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

धाराशिव, दि.22 ऑगस्ट :
धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यात पवनचक्कीवरून ॲल्युमिनियमच्या तारांच्या चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि पथक हे गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार विशाल रामा काळे (वय २१, रा. पारधी पिढी, भुम) हा संशयित चोरीचा मुद्देमाल घेऊन विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सिताफिनेजवळ पकडले. त्याच्या पिकअप वाहनातून पोलिसांना ॲल्युमिनियम तारेची बंडले आढळली.

चौकशीअंती काळे याने कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी व मस्सा शिवारातील पवनचक्की खांबांवरून तारा चोरी केल्याची कबुली दिली. तपासात त्याच्या विरोधात अशाच प्रकारच्या सहा गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून ८९८ मीटर लांबीचे २ लाख ६९ हजार ४०० रुपयांचे ॲल्युमिनियम तारे व पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासात आरोपीने अन्य साथीदारांची नावेही सांगितली असून त्यांच्या सहभागाबाबतही पोलिस तपास करत आहेत. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वाशी पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरेनागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

श्री सिद्धिविनायक परिवाराकडून शेतकऱ्यांना अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा

धाराशिव- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 व खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2 या दोन्ही गुळ कारखान्यांकडून हंगाम 2024-25 मधील ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य देत पारदर्शक कारभार राबविला जातो. हंगामातील उर्वरित हप्ता बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत देण्याचे आश्वासन यापूर्वी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करत शेतकऱ्यांच्या खात्यावर अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जलद पेमेंट व्यवस्था हीच आमची ताकद आहे.मागील हंगामात सव्वादोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्या आले होते. याचा अंतिम हफ्ता जमा केला आहे तर पुढील हंगामातही पारदर्शक व विश्वासार्ह कारभार ठेवून आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट असून श्री सिद्धिविनायक परिवाराकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

गणपती बाप्पाचे आगमन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी होणार या महिन्याचा पगार २६ ऑगस्टला

मुंबई, दि. २१ ऑगस्ट :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्टचे वेतन / निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन यावेळी गणेशोत्सवापूर्वीच, म्हणजे दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात येणार आहे.

वित्त विभागाच्या मते, यंदा गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होत आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना सण साजरा करताना आर्थिक अडचणी जाणवू नयेत म्हणून ही विशेष मुभा देण्यात आली आहे. शासनाने यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ व महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील संबंधित तरतुदी तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केल्या आहेत.

शासन निर्णयानुसार –

  • वेतन व निवृत्तिवेतन देयके २६ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केली जातील.
  • सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन व निवृत्तिवेतन देयके तत्काळ उपकोषागार/जिल्हा कोषागार/अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे सादर करणे आवश्यक आहे.
  • या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदांचे अधिकारी-कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांनाही मिळणार आहे.

या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.

👉 यामुळे लाखो सरकारी अधिकारी-कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना गणेशोत्सवात दिलासा मिळणार आहे.