धाराशिव : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषदेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रकरणी मुख्याधिकारी श्रीमती निता अंधारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार धाराशिव नगरपरिषदेची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली. तथापि, या यादीत अनेक गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
तक्रारीनुसार, मुळ प्रभागातील मतदारांचा इतर प्रभागात समावेश, काही प्रभागांतील मतदारसंख्या कमी दाखविणे, दुबार नावे दाखविणे, तसेच अनुसूचित जाती आरक्षित प्रभागांतील मतदार कमी दर्शविणे अशा अनेक त्रुटी झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांनी मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यावर मतदार यादी तयार करताना गंभीर दुर्लक्ष आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे,
“निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेकडे गांभीर्य न दाखविता नियम व सुचनांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आपणास जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७६ नुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाऊ शकते.”
मुख्याधिकारींनी याबाबतचा स्वयंस्पष्ट खुलासा दोन दिवसांत जिल्हाधिकारी समक्ष सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत खुलासा न मिळाल्यास किंवा समाधानकारक नसल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीतील या अनियमिततेमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- आंदोलनाची स्टंटबाजी, कालच तयार होते पत्र तरीही आज आंदोलनाचा हट्ट !पहिल्याच दिवशी संपले महिलांचे साखळी उपोषण
- उल्फा/दुधना नदीवरील पुल धोकादायक! लोखंडी कठडे महापुरात वाहून गेले, अपघात होण्याची शक्यता
- सोन्नेवाडीतील अकरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू
- कामांना स्थगिती मिळाली, यात विरोधकांना ‘आसुरी आनंद’ – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे
- मोटारसायकल चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – चार चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी पकडले
