सांगली जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार शिधापत्रिकाधारकांना ९३१६ मे. टन धान्याचे वाटप -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती
तासगाव (राहुल कांबळे)
सांगली जिल्ह्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेचे ३ लाख ६२ हजार ३३३ व अंत्योदय योजनेचे ३२ हजार ०१४ असे एकूण ३ लाख ९४ हजार ३४७ शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये एप्रिल २०२९ साठी ३ लाख ९१ हजार १२१ म्हणजेच ९९ टक्के शिधापत्रिकाधारकांना ९३१६ मे. टन धान्याचे वाटप करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकेमधील प्रत्येक व्यक्तीस ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेअंतर्गत आज अखेर एप्रिल २०२० साठी ८ हजार ५५१ मे. टन तांदूळ वाटप करणेत आलेला असून त्याचा ३ लाख ७५ हजार २५६ शिधापत्रिकांमधील १७ लाख १० हजार २०० इतक्या व्यक्तींनी म्हणजेच ९५.१६ % इतक्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अन्नसुरक्षा योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत सर्व धान्य POS मशीनेद्वारे वाटप करणेत येत आहे.
त्याचप्रमाणे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ठ न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून २०२० या कालावधीसाठी प्रतिमाह प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू रु. ८/- प्रति किलो दराने व २ किलो तांदूळ रु. १२/- प्रति किलो दराने वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केशरी शिधापत्रिका धारकांना माहे मे व जून या दोन महिन्यासाठी धान्य वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. तथापी केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्य कोणत्याही योजनेमधून धान्य मिळत नसलेने संचारबंदीच्या काळामध्ये त्यांची अन्नधान्याची गरज लक्षात घेता माहे मे २०२० साठीचे धान्याचे वाटप एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आले आहे. सदर योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये सुमारे २ लाख १८ हजार ५३४ इतक्या शिधापत्रिका समाविष्ठ होत असून त्याचा लाभ सुमारे १० लाख २६ हजार ६१९ इतक्या लोकांना होणार आहे. सदर योजनेचा दि. २६ एप्रिल २०२० अखेर ७१ हजार ८३८ शिधापत्रिकांमधील ३ लाख ४७ हजार १६० इतक्या लोकांनी लाभ घेतलेला असून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ४० ते ५५ % व शहरी भागामध्ये १८ ते २२ % इतके वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी असे सांगून APL केशरी शिधापत्रिका धारकांना वाटप करणेसाठी आवश्यक असणारे अन्नधान्य सर्व ग्रामीण व शहरी रास्तभाव दुकानांमध्ये पोहोच झालेले असून त्याचे वाटप सुरु आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सदर धान्याचा लवकरात लवकर लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
सांगली – कोरोना अपडेट;खेराडवांगी येथील ३० पैकी ३० जणांचे रिपोर्ट आले कोरोना निगेटिव्ह
(राहुल कांबळे)-सांगलीकरांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. अत्यविधीनंतर सायन येथील त्या रिक्षाचालकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते.आज सकाळी त्या मृताच्या कुटुंबियांसह सर्वच संशयितांचे रिपोर्ट्स कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे
जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणेने सतर्कता दाखवत केलेल्या उपाययोजनांना आणि प्रयत्नाला आले यश
सांगली जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना बाधित रुग्ण नाही
तरीही सांगली जिल्हा प्रशासन सतर्क असल्याची माहिती
जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी नोडल अधिकारी डॉ.संजय साळुंखे यांनी दिली
खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न; संबंधित २१ जण कडेगाव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये
तासगाव प्रतिनिधी ( राहुल कांबळे)
खेराडे वांगी, तालुका कडेगाव येथील एक व्यक्ती मुंबई येथे रिक्षा ड्रायव्हरचे काम करत होती. या व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला. त्यांच्या पार्थिवावर खेराडे वांगी येथे दिनांक 19 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे दिनांक 22 एप्रिल रोजी आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने गतिमान हालचाली करून या व्यक्तीशी संबंधित २१ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रात्री ठेवले आहे. या सर्वांचे स्वाब घेण्यासाठी आरोग्य पथक कडेगावला सकाळी रवाना झाले आहे.आशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा लॉकडाऊनमध्ये मोठा आधार १ कोटी ४१ लाखांहून अधिक रक्कमेचे वितरण
तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
कोरोना पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये तसेच बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी पोस्टामार्फत तसेच पोस्टमन मार्फत घरपोच लोकांना बँक खात्यावरील पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुविधेचा उपयोग करण्यात येत असून दिनांक २ ते २१ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील १० हजार १५१ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आधार एनेब्लड पेमेंट सिस्टीमद्वारे १ कोटी ४१ लाख ५८ हजार १३६ रुपये खात्यावरुन काढली आहे. अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोस्ट विभागाचे कौतुक केले आहे.
बँकामधून रक्कम काढण्यासाठी लोक गर्दी करत होते त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होताच ती काढण्यासाठी बँकांमध्ये लोक रांगालावून गर्दी करत असल्याचे निदर्शनास येताच पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत AEPS सुविधेद्वारे नागरिकांना स्वत:च्या कोणत्याही बँक खात्यावरील रक्कम गावातील पोस्ट ऑफिस तसेच पोस्टमन मार्फत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या अश्विनी संतोष शिर्के, रा. संजयनगर, सांगली म्हणाल्या, माझ्या खात्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम जनधन खात्यात रुपये 500/- जमा झाले होते. लॉकडाऊनमुळे सदरची रक्कम मला काढता येत नव्हती. पैशांची अत्यंत आवश्यकता होती. परंतु पैसे मिळत नव्हते, त्यावेळी मला माहिती मिळाली की पोस्टाद्वारे पोस्टमन पैसे घरपोच करतात. माझे पैसे बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा झाले होते. पोस्टमनकडे मी तशी मागणी केल्यानंतर मला पोस्टाद्वारे घरपोच पैसे मिळाले. या योजनेचा इतरांनीही लाभ घ्यावा. शासन जी मदत करीत आहे त्याचा सर्वांना फायदा होत आहे.
या योजनेचा यासाठी बँक खात्याला आधारकार्ड सिडींग असणे आवश्यक आहे. सदर नागरिक पोस्ट पेमेंट बँकचा ग्राहक असला किंवा नसला तरी त्याला त्याचा लाभ घेता येईल. पैसे काढण्यासाठी फक्त आधार आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ग्राहकांचा फक्त आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करुन ते पैसे काढू शकतात. गावातील पोस्टमन त्याच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या रक्कमेनुसार ही सुविधा देऊ शकेल त्यासाठी फोनवरुन त्यांना संपर्क करुन त्यांना संपर्क करुन त्यांना आपल्या घरी बोलवू शकता किंवा शक्य असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्यवहार करु शकता.



















































