Home Blog Page 289

तासगांव शहराला कचरा मुक्त शहर म्हणून 3 स्टार नामांकन शहर स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व आभार – मुख्याधिकारी गणेश शिंदे

(राहुल कांबळे तासगाव)
                   तासगांव नगरपरिषदेने स्वच्छतेत सातत्य ठेवत शहर स्वच्छतेमध्ये देशात अग्रेसर स्थान मिळवले आहे. काल केंद्रशासनाने कचरा मुक्त शहर म्हणून तासगांव शहरास 3 स्टार नामांकन बहाल केले. हे यश आपल्या सर्वांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे लाभले आहे. शहरासाठी अहोरात्र झटणार्‍या पालिका कर्मचारी, पदाधिकारी, आणि सर्वात महत्त्वाचे सर्व तासगांवकर नागरिक, संस्था, मंडळे, शाळा व पत्रकार आदी. आपल्या सर्वांचे या लोकचळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या योगदानामुळे शहराला देशपातळीवर अभिमानास्पद यश प्राप्त झाले आहे.
                    स्टार रेटींग आणि शहर स्वच्छतेसाठी तासगांव नगरपरिषद चे सर्व पदाधिकारी, मान्यवर, कर्मचारी, सर्व विभाग, सफाई कर्मचारी, पत्रकार, शाळा, कॉलेज, शिक्षक, विद्यार्थी, सर्व संस्था, असोशिएशन, तरुण मंडळे, संघटना, महिला बचत गट, आणि सन्माननीय सर्व तासगांव शहर व उपनगरातील नागरिक, स्वच्छतादूत, स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्ष आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन..!
                  या निमित्ताने स्वच्छता हीच सेवा हा जीवनाचा संस्कार ठरवून योगदान दिलेल्या  प्रत्येक तासगांवकर नागरिकाचे अभिनंदन व आभार….!

मा.गणेश शिंदे
(मुख्याधिकारी तासगांव नगरपरिषद, तासगाव)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी होमगार्ड दल कामावर रुजू करा – खा. ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद –
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्परतेने सेवा देत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उभे राहून अनावश्यक फिरणान्यांवर कारवाई करत असताना सेवा बजावत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा रिक्त जागांचा आलेख मोठा आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ताण येऊ लागला आहे. 
पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्हयातील होमगार्ड यांना कामावर रुजू करून घेतल्यास लॉकडाउन काळात होमगार्डना रोजगार उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न मिटेल व पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. जिल्हयातील जास्तीत – जास्त होमगार्ड कर्मचारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावर रुजू करून घेण्यात यावे. याबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रा द्वारे जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे यांच्या कडे करण्यात आली आहे.

शेतकरी, बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना ५० हजार कोटींची पॅकेजसाठी भारतीय जनता पार्टीचे आंदोलन. मुंबई महापिलकेकडे पडून असलेल्या ८० हजार कोटींतुन सदर पॅकेज द्या..! -राणाजगजीतसिंह पाटील


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील एक समृद्ध व आघाडीचे राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राने भयाण अशा संकटात सापडलेल्या शेतकरी,हातावर पोट असलेले घटकांना एक नया पैशाचे आर्थिक पॅकेज दिले नाही याचा निषेध करण्यासाठी व लॉकडाउन मुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना ५०००० हजार कोटींची पॅकेज देण्यात यावे या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र देशातील एक प्रगत राज्य असताना सरकार शेतकऱ्यांना,बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना दिलासा देण्यासाठी कोणतेच पाऊल उचलत नसल्याने ,झोपेचे सोंग  घेतलेल्या ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.आंदोलन करताना सर्वांनी मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, श्री.सुरेशभाऊ देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, उपनगराध्यक्ष श्री.अभय इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, श्री.खंडेराव चौरे, गटनेते युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण पाठक, नगरसेवक अभिजित काकडे, गजानन नलावडे, संदीप कोकाटे, प्रल्हाद धत्तुरे, नामदेव नायकल, गणेश मोरे आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रेशन कार्ड नसलेले नागरिकांना कसलीच मदत मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.उस्मानाबाद जिल्हा परिषदेने अशा १०००० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला होता.त्याबाबत सरकारकडे परवानगी मागितली असता एक महिना वेळ घालवला व अचानक कोणतंही कारण न देता प्रस्ताव नामंजूर केला.सरकारच्या या निर्णयामुळे  सदर १०००० कुटुंब गेली १ महिना मदतीपासून वंचित राहिली आहेत याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.
राज्यकर्ते उठता बसता छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करतात मात्र प्रत्यक्षात कारभार करताना महाराजांच्या तत्वांना तिलांजली देतात.गोरगरिबांना मदत करायची सोडून पैसा नसल्याचा खोटा आव आणतात. अशा सरकारला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का ?? असा सवाल यावेळी जेष्ठ नेते सुरेशराव देशमुख यांनी उपस्थित केला.
सरकारने येत्या कांही दिवसात जर याबाबत ठोस निर्णय घेऊन शेतकरी, बारा बलुतेदार व असंघटीत कामगार वर्गाला आर्थिक मदत केली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिला.

“महाराष्ट्र देशातील आघाडीचे व आर्थिक दृष्ट्या समृद्ध राज्य आहे.एकट्या मुंबई महापालिकेकडे ८० हजार कोटी रुपये पडून आहेत.दिल्ली सरकार रिक्षा व टॅक्सी चालक,कामगारांना ५००० रुपये देते,कर्नाटक सरकार धोबी,नाभिक बांधवाना ५००० रु देते तर फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना २५००० रु देते,आंध्रप्रदेश सरकार शेतकऱ्यांना १७५०० रु मदत करते मात्र महाराष्ट्र सरकार एक नया पैसा मदत करत नाही हे अत्यंत दुर्दैवी असून हे खपवून घेतले जाणार नाही.सरकारने राज्यातील शेतकरी,बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पडून असलेल्या  ८० हजार कोटींपैकी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे.”
– राणाजगजीतसिंह पाटील

कोरोनाने जिल्हाभर पसरले पाय प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग वाढत चालला आहे.  गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे अहवाल होकारात्मक आले आहेत. त्यात परंडा १, वाशी१, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असे नविन रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी सकाळी शिराढोण  येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण असल्याने धोका वाढत चालला आहे. 

तुळजापुरात १०० बेडचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय..! आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेवरून तुळजापूर नगरपरिषद घेणार पुढाकार..

उस्मानाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची असलेली कमतरता भविष्यातील गरज लक्षात घेऊन नागरिकांना उपचारासाठी अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी तुळजापूर नगरपरिषदेने टर्शरी केअर सेवांसाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी पुढाकार घ्यावा व त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री मंदिर संस्थान, सी.एस.आर व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध करावी व ६ महिन्यांत हे रुग्णालय सुरू व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी बुधवारी तुळजापूर नगरपरिषदेच्या कारभाऱ्यांना दिल्या.

आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दि.१६मे रोजी तुळजापूर च्या नगरसेवकांची ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून बैठक घेऊन तुळजापुर तालुक्यात अद्दयावत मल्टीस्पेशालीटी दवाखाना नसल्यामुळे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नगर परीषद, तुळजापुर ने अशी आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यावर प्राधान्याने लक्ष दयावे व त्यासाठी शहरात असलेल्या इमारतींपैकी योग्य इमारतीचा शोध घेणेबाबत सुचित केले होते. या अनुषंगाने नगराध्यक्ष, तुळजापुर, तहसीलदार व न.प.मुख्याधिकारी यांनी ‘यात्रा मैदान, भक्तनिवास’ ही भव्य व अनेक वर्षांपासून कोणत्याही वापरात नसलेली इमारत यासाठी निश्चित केली होती. त्याला अनुसरून आ.पाटील यांनी काल दि.२० मे रोजी पाहणी केली यावेळी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजापूरचे तहसीलदार श्री.तांदळे, मुख्याधिकारी श्री.लोकरे, नगरसेवक विशाल रोचकरी, अभिजित कदम, आनंद कंदले आदी उपस्थित होते.
सदरहु इमारतीमध्ये एकुण १४४ हॉलसह रुम आहेत, त्यापैकी बहुतांश रुमला अटॅच संडास-बाथरुमची सोय असुन पार्कींगची भव्य व्यवस्था आहे. इमारतीची पाहणी केल्यानंतर आ.पाटील यांनी या अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी सदर इमारतिची थोडीफार डागडुजी केली तर येथे  १०० खाटांचा अद्दयावत दवाखाना उभारला जाऊ शकतो असा अभिप्राय दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे यांना देखील सदर इमारतीची पाहणी करून अभिप्राय कळवण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी आज पाहणी केली व मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी सदर इमारत अत्यंत योग्य असल्याचे कळवले आहे.
यावेळी आ.पाटील यांनी या नियोजित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय रोगनिदान करण्यासाठी सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. यासारख्या उच्च दर्जाच्या अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असावे तसेच यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, सी.एस.आर. फंड तसेच दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील व आपण स्वतः ५० लाखांच्या उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. सदर रुग्णालयास महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे नांव देण्यात यावे अशी सूचना देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांची असलेली कमतरता व या क्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी हे नियोजित रुग्णालय हे टर्शरी केअर सेंटर बनवण्याचा आपला मानस असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आपण सोलापूर येथील विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून या नियोजित मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात सेवा देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी आठवड्यातील एक दिवस देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आ.पाटील यांनी माहिती दिली. नगर परीषदने या विषयाचे गांभीर्य व महत्व ओळखून येत्या ६ महिन्यांत हे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू व्हावे यासाठी आवश्यक त्या उपययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या.


रुग्णालय उभे करण्यासाठी युद्धपातळीवर  प्रयत्न करा

“येत्या ६ महिन्यांत  हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश आ.पाटील यांनी बैठकीत दिले. या नियोजित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध आहोत व आपण स्वतः ५० लाखांची उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असून मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणी हा मोठा विषय असल्याने याकामी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून सर्व अभिनिवेश बाजूला सारून सर्वांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.”

उमरगा शहरात एका रुग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह

उमरगा – शहरात एक रुग्ण पाॅझिटीव्ह आढळून आला आहे. तो रुग्ण पुणे येथून आला असून त्याच्यावर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण उमरगा शहरातील एस. टी. कॉलनी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात पहिला रूग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता त्यानंतर आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतली होती. त्याच्यासह इतर दोघांवर उपचार करून त्यांना कोरोना मुक्त केले होते. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात मुंबई पुणे या ठिकाणावरून येणाऱ्यांची संख्या वाढली त्यातील काही जण कोरोनाबधीत आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे.

सांगली जिल्ह्यात शुक्रवारपासून जिल्हा अंतर्गत एसटी धावणार

तासगाव प्रतिनिधी
सांगली  जिल्हांतर्गत एसटीची वाहतूक शुक्रवार (ता.२२) पासून सुरु होत आहे. त्याचे तपशीलवार नियोजन करण्याचे काम एसटी विभागाने सुरु केले आहे. एका आसनावर एक प्रवाशी या पद्धतीने प्रवास केला जाईल. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी त्याची माहिती जाहीर केली.

एसटी थांबली की सारं जग थांबल्यासारखं वाटलं. लाल परी रस्त्यावर धावायला लागली की आपलं जग धावायला लागतं. ही लाल परी गेल्या ६० दिवसांपासून बंद आहे. तीची चाकं थांबली आहेत… मात्र आता “हात दाखवेन, पण एसटीनंच जाईन’, असं म्हणणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. एसटीचा स्टार्टर आता लागणार आहे. चाकं पुन्हा धावू लागणार आहे. सिंगल बेल, डबल बेलचा आवाज घुमणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तसे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी वाहतूक शंभर टक्के बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रांर्गत आणि परराज्यातही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गावांना जोडणारी, महानगरांकडे धावणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी एसटी आता पुन्हा धावणार आहे. अर्थात, खूप कडक नियमांसह ती धावेल. त्यात एसटीमध्ये प्रवेश करताना हातावर सॅनिटायझर घ्यावे लागणार आहे. एरवी एसटीची प्रवासी क्षमता ही ५२ ते ५५ इतकी असायची. ती आता निम्म्यावर येईल. एकाच आसनावर एकालाच बसता येईल. त्यामुळे मला “विंडो सीट मिळेल का?’ अशी चिंता करण्याचे कारणच नाही.

अर्थात, या नियमामुळे एसटीचे भारमान एरवीच्या सरासरी भारमानापेक्षा खूपच खाली येणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे दरवाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात, हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अधिकारात आहेत. त्याबाबत कोणते आदेश येतात, याकडे लक्ष असेल.

असे असतील नियम

* केवळ जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु होणार
* एसटीत येताना हातावर सॅनिटायझर
* एका आसनावर एकच प्रवासी बसणार
* एसटीत बसताना मास्कची सक्ती असणार
* स्थानकावर लोकांना अंतर ठेवून बसवले जाणार
* प्रवाशांच्या संख्येनुसार एसटीचे वेळापत्रक ठरणार

आटपाडी तालुक्यात कोरानाचे आणखी नविन दोन रुग्ण

आटपाडी दि.२१(प्रतिनिधी):

आटपाडी तालुक्यात बुधवार दि. 20 रोजी कोरोनाचे आणखी नवीन दोन रुग्ण सापडले आहेत.तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे.आटपाडी नजीकच्या गोंदीरा येथील मरगळेवस्ती व पिंपरी बुद्रुक या गावातील प्रत्येकी एक रुग्ण आहेत.सांगली जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी सहा रुग्णांची भर पडली आहे.
          आटपाडी शहराच्या दक्षिणेकडील गोंदीरा भागातील मरगळेवस्ती येथील 65 वर्षे वयाची व्यक्ती मुंबई(ठाणे)हून दि.17 मे रोजी आली. घराशेजारी झोपडीमध्ये ती व्यक्ती क्वारंटाईन झाली होती. परंतु सार्वजनिक ठिकाणी फिरू लागल्याने शाळेमध्ये क्वारंटाईन होण्यास विनंती करूनही त्या कुटुंबाने नकार दिल्यामुळे शाळेमध्ये लवकर क्वारंटाईन होणेबाबत प्रशासनाने नोटीस दिली. दुसऱ्या दिवशी दि.१८ रोजी रात्री ८.३० वाजता राजारामबापू हायस्कूल येथे क्वारंटाईन केले.त्यास वेगळी खोली देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.19 रोजी सकाळी थोड्या प्रमाणात खोकला येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मिरज येथील कोरोना सेंटरमध्ये पाठवले.बुधवार दि.20 रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरी बुद्रुक येथील अकोल्याहून आलेल्या व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे.
        दरम्यान सांगली जिल्ह्यात बुधवारी नवीन सहा रुग्णांची भर पडली असून कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईहून आलेल्या दोन व्यक्ती, शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेली एक व्यक्ती, मिरज येथील भारतनगर हडको कॉलनीतील एक महिला यांच्यासह आटपाडी तालुक्यातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
      आटपाडी ग्रामपंचायत हद्दीत दोन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सज्ज झाले आहे. तहसीलदार सचिन लंगुटे,गट विकास अधिकारी मधुकर देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, पोलीस व तालुका प्रशासन सतर्कतेने प्रतिबंधक उपाय राबवित आहे.
           बाहेरगावाहून आलेले नागरिकच कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी कोणाशीही संपर्कात न येता योग्य त्या सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.प्रशासनाने ठरवून दिलेले नियम जर पाळले तर कोणालाही कोरानाची लागण होणार नाही,त्यामुळे सर्वांनी आपली,आपल्या कुटुंबीयांची व आपल्या गावाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही घाबरून जाऊ नये,कोरोना संदर्भात कोणतीही आपणास अडचण आल्यास कधीही आपण मेसेज किंवा फोन करा असे आवाहन आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील  यांनी केले आहे.